Madhura Welankar: अभिनेत्री मधुरा वेलणकरचा पुन्हा रंगभूमीवर.. येतेय 'मधुरव' घेऊन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhura Welankar starting new theatre play marathi natak madhurav

Madhura Welankar: अभिनेत्री मधुरा वेलणकरचा पुन्हा रंगभूमीवर.. येतेय 'मधुरव' घेऊन..

madhura welankar: सध्या सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील मुख्य अभिनेत्री मधुरा वेलणकर हीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे. या आधीही मधुराने अनेक मालिका, नाटक, चित्रपट अशा सर्वच मध्यमांत दर्जेदार काम केले आहे. त्यामुळे मधुरा वेलणकर कोणत्या कलाकृतीमध्ये काम करणार याकडे सर्वांचे लक्ष असते. तिच्या चाहत्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे मधुरा पुन्हा रंगभूमीवर येत आहे, एक दमदार प्रयोग घेऊन..

(Madhura Welankar starting new theatre play madhurav )

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: ग्रुप सोडला अन् समृद्धीचा खेळ तिलाच नडला.. थेट घराबाहेर!

लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन क्षेत्र पूर्णतः बंद असताना मधुराने "मधुरव"चे कार्यक्रमाचे ऑनलाइन पद्धतीने प्रयोग केले. त्या उपक्रमाला रसिक श्रोत्यांचा भरभरून प्रतिसादही मिळाला होता. त्यामुळे आता  'मधुरव - बोरू ते ब्लॉग' हा कार्यक्रम रंगमंचावर येण्यासाठी सज्ज झाला असून येत्या ३ डिसेंबरला या कार्यक्रमाचा शुभारंभाचा प्रयोग शिवाजी मंदिर, दादर येथे संपन्न होणार आहे.

हेही वाचा: Nana Patekar: विक्रम.. मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो, असेन.. नाना पाटेकर भावूक..

मराठी भाषेच्या जन्मापासून आजपर्यंत भाषेचा झालेला प्रवास, त्यातल्या गमतीजमती-तथ्य यांची गप्पागोष्टी, गायन ,नृत्य, नाट्य,अभिवाचन यातून होणारी दर्जेदार सुरेख गुंफण म्हणजे "मधुरव - बोरू ते ब्लॉग" हा कार्यक्रम आहे. 

तथाकथित लेखक नसलेले पण लिखाणातून व्यक्त होणारे तुमच्यातले (प्रेक्षकांमधले) काही निवडक लेखक त्यांना रंगमंचावर बोलवून त्यांच्या लिखाणाचे सादरीकरण करणे.  त्यांच्याशी  तसेच प्रेक्षागृहातल्या प्रेक्षकांशी संवाद ,प्रश्नमंजुषा- भेटवस्तू असा परस्पर संवादाचा गंमतशीर प्रवाही असा हा कार्यक्रम आहे. दोन तास हसत-खेळत मनोरंजन आणि प्रबोधन, तसंच साहित्याच्या जवळ नेणारा नवनिर्मित, अभिनव आणि पूर्वी न अनुभवलेला, आणि अनेक उत्तम कलाकार आणि तंत्रंज्ञ यांनी रंगलेला नटलेला असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे. 

"मधुरव - बोरू ते ब्लॉग'  ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी भूमिका अभिनेत्री मधुरा वेलणकर पार पाडणार आहे. सदर कार्यक्रमाचे संशोधन लेखन डॉ. समीरा गुजर जोशी यांचे असून नृत्य दिग्दर्शन सोनिया परचुरे, प्रकाशयोजना शीतल तळपदे, नेपथ्य प्रदीप पाटील,पार्श्वसंगीत श्रीनाथ म्हात्रे, वेशभूषा श्वेता बापट, शीर्षकगीत संगीत ह्रुषिकेश रानडे, पार्श्वगायन ह्रुषिकेश रानडे, प्राजक्ता रानडे, अर्चना गोरे यांचे आहे. कलाकार म्हणून अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्यासोबत तरुण पिढीतील नवोदित कलाकार आशिष गाडे आणि आकांक्षा गाडे, जुई भागवत आणि श्रीनाथ म्हात्रे रसिकांच्या भेटीला येणार आहेत.  नवोदित उमदे लेखकही आपले लिखाण madhuravshow@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकतात.

टॅग्स :Madhura Velankar-Satam