कॉमेडीचा अस्सल पॅटर्न! या दिवशी सुरू होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtrachi hasyajatra new season coming soon promo released on sony marathi

कॉमेडीचा अस्सल पॅटर्न! या दिवशी सुरू होणार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'

गेल्या काही वर्षात सोनी मराठी sony marathi वाहिनीवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (maharashtrachi hasyajatra) या मालिकेने अक्षरशः महाराष्ट्राला वेड लावलं आहे. एकास एक पात्र, उत्तम संहिता आणि ते सादर करणारे इरसाल नमुने म्हणजेच आपले हास्यरथी यांनी आपलयाला खळखळून हसवलं. या मालिकेने विनोदाची आणि यशाची मोठी उंची गाठली आहे. गेली अडीच वर्षे या कार्यक्रमाने आपले अविरत मनोरंजन केले. परंतु मध्यंतरी एक छोटासा ब्रेक घेण्यात आला होता. त्या दरम्यान प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची खूप वाट पाहिली. आता पुन्हा एकदा आपल्या मनोरंजनासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नवा हंगाम घेऊन सज्ज झाली आहे.


(maharashtrachi hasyajatra new season coming soon promo released on sony marathi)

काही दिवसांपूर्वी सोनी मराठी वाहिनीचे कंटेंट हेड अमित फाळके यांनी ‘न्यू सीझन सून…’ असं म्हणत याबाबतची एक पोस्ट शेअर केली होती. कारण या कार्यक्रमाने काही महिन्यांचा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित झाला आणि प्रेक्षक पुन्हा आनंदुन गेले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' लवकरच म्हणजे 15 ऑगस्ट पासून आपल्या भेटीला येत आहे.

वाहिनीने सोशल मिडियावर शेयर केलेल्या प्रोमोमध्ये प्रसाद खांडेकर, वनिता खरात, नम्रता संभेराव, शिवाली परब, दत्तू मोरे हे कलाकार दिसत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम आठवड्यातील चार दिवस प्रेक्षकांना पाहता येणार असल्याचे या प्रोमोतून जाहीर करण्यात आले आहे.

सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे प्रोमो शेअर केला आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी म्हटलं की, “आम्ही सगळे येतोय रिटर्न, घेऊन कॉमेडीचा अस्सल पॅटर्न! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’- चार वार हास्याचा चौकार!” १५ ऑगस्टपासून या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात होईल. सोमवार ते गुरुवार रात्री ९ वाजता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येईल. या कार्यक्रमाने करोना काळातही घरात बसलेल्या प्रेक्षकांना भरभरून हसवले. त्यामुळे हास्यजत्रा हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. आता नव्या हंगामात काय असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे .