नाट्यजाणिवांचे हौशी रंग

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे शतकोत्सवी नाट्यसंमेलन हा एक ऐतिहासिक क्षण आहे.
Drama
DramaSakal

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे शतकोत्सवी नाट्यसंमेलन हा एक ऐतिहासिक क्षण आहे. या क्षणापर्यंत पोहचण्यासाठी नाट्यपरिषदेच्या आजवरच्या पदाधिकाऱ्यांसह छोट्यामोठ्या असंख्य रंगकर्मींनी नाट्यधर्म म्हणून आजवरची संमेलने यशस्वी केली. त्यात मराठी रंगभूमीवरील हौशी आणि प्रायोगिक नाटक करणाऱ्या रंगकर्मींची संख्या मोठी आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, त्यांच्या नाट्यजाणिवेचे हौशी रंग समजून घेणे या निमित्ताने गरजेचे आहे.

रंगभूमीवर काम करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हवी, हे अद्याप अट नाही. राष्ट्रीय नाट्य विद्यालयासह अनेक विद्यापीठांत नाट्यशास्राचे पदवी अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. तिथेही प्रवेश घेण्यासाठी तुमच्या शालेय शिक्षणात नाटक हा विषय होता का, असे विचारण्याची सोयच आपल्या शिक्षण व्यवस्थेत नाही. प्राथमिक ज्ञानाचे शिक्षण नसताना नाट्यशास्राच्या पदवीचे शिक्षण देणारी विद्यापीठे कशाच्या आधारावर प्रवेश देत असतील, असा प्रश्न उपस्थित होतो. त्या प्रश्‍नाचे उत्तर आहे नाटकाची ‘हौस’.

पदवीसाठी किमान उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाणपत्र आणि नाटकाची हौस असणे गरजेचे आहे, तेच कुठल्याही नाटकात काम करण्यासाठीही हौस हीच एक महत्त्वाची पात्रता आहे. या हौशी रंगावरच अख्खी मराठी रंगभूमीची चळवळ पुढे चालली आहे, प्रयोगशील झाली आहे. हा हौशीपणा त्या-त्या कलावंताच्या भवतालाने दिलेला असतो.

तो भवताल घरात नाटक असेल तर कुटुंबातून, मित्र-मैत्रिणींच्या सहवासातून किंवा शालेय जीवनातील स्नेहसंमेलनात सादर होणाऱ्या नाटिकांचा असतो. एकपात्री नाट्यछटा करून पुढे नाटकात काम करण्याच्या आवडीने त्या कलावंताचा प्रवास पुढे जातो. राज्य शासनाची बालनाट्य स्पर्धा, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा आणि या सगळ्यांतून प्रकाशझोतात येऊन पुढे व्यावसायिक नाटकापर्यंत पोहचतो.

त्यातही व्यावसायिक नाटकापर्यंत पोहोचणाऱ्या रंगकर्मींची संख्या फारच कमी असते. उरलेले बहुसंख्य आयुष्यभर उदरनिर्वाहासाठी नोकरी-धंदा सांभाळून हौस म्हणून राज्य नाट्य, कामगार नाट्य, एकांकिका करत वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्या सोबतच नाट्यविषयक उपक्रमांत सहभागी होऊन, ही चळवळ पुढे नेण्यासाठी झटतात, त्यातच आनंद मिळवतात.

हे हौशी नाटकवाले महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यांच्या नाटकात काम करण्याच्या महत्त्वाकांक्षेवरच असंख्य नाटकांच्या स्पर्धा वर्षानुवर्षे मराठी रंगभूमीवर होतात. त्याच स्पर्धांतून त्यांच्या नाट्यजाणिवा समृद्ध होतात. कुठल्याही अद्ययावत सोयी नसल्या, तरी जालना जिल्ह्यातील छोट्याशा गावातील कलावंतांचा समूह त्यांच्या वाट्याला आलेले वास्तव कंदिलाच्या प्रकाशात ‘आकडा’ नावाची एकांकिका विजेच्या समस्येवर सादर करतात.

तीच एकांकिका नाटकवाल्यांची मातृसंस्था असलेल्या नाट्य परिषदेच्या नांदेड येथील संमेलनात सादर होते आणि कालांतराने राजकुमार तागडे नावाचा हौशी रंगकर्मी आपल्या गावातल्या याच कलावंतांना घेऊन ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकातून सर्वदूर पोहचतो.

हौशी रंगभूमीचे योगदान

वर्ध्यातील हरीश इथापेसारखा पेशाने प्राथमिक शिक्षक असलेला नाट्यवेडा ‘रगतरिती’सारख्या नाटकाच्या दिग्दर्शनातून राज्य नाट्य स्पर्धेत चमकतो आणि त्याच्या शेतात ‘ॲग्रो थिएटर’ उभारून शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर भाष्य करणारे ‘तेरवं’ नाटक आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला-मुली आणि संस्थेच्या कलावंतांना घेऊन रंगमंचावर सादर करतो. त्या नाटकाचा प्रयोगही ९९व्या संमेलनात झाला, शंभराव्या संमेलनातही होत आहे.

ॲग्रो थिएटरच्या माध्यमातून अनेक उपक्रम हरीश वर्ध्यासारख्या छोट्या शहरात राबवतो आहे. ठाण्यात झालेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष ‘वस्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांनी ‘बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धा’ आयोजित करून चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या बोलीचे भाषासौंदर्य सर्वदूर पोहचावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

ती संकल्पना प्रसिद्ध नाट्यनिर्माता गोविंद चव्हाण यांनी स्वत: पुढाकार घेऊन चार वर्षे ही स्पर्धा आयोजित केली; पण त्यांचे अकाली निधन झाले. आता त्यांच्या कन्या सुप्रिया हा उपक्रम पुढे घेऊन जात आहेत. या वर्षी सातव्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ५ जानेवारीपासून मुंबईत होत आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सुमारे १६ भाषेतील २४९ एकांकिका आजवर सादर झाल्या आहेत.

हे मराठी रंगभूमीवरील हौशी रंगकर्मींचे महत्त्वाचे संचित आहे, त्याकडे दुर्लक्ष करताच येणार नाही. वेगवेगळ्या हौशी रंगकर्मींच्या संस्था राज्यभर पदरमोड करून एकांकिका स्पर्धा आयोजित करतात. त्या स्पर्धांमधून अनेक नवे रंगकर्मी मराठी रंगभूमीवर येतात. महाराष्ट्र शासनाची राज्य नाट्य, बाल नाट्य, संस्कृत, संगीत नाट्य आणि व्यावसायिक नाट्य स्पर्धा आपले सांस्कृतिक वैभव आहे. जगभरात ६० वर्षे अशा स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असावे.

प्रशिक्षण, कार्यशाळा गरजेच्या

राज्य नाट्य आणि एकांकिका स्पर्धा रंगकर्मींसाठी नाट्यजाणिवा रुजवणारी पहिली पायरी आहे. शासनाने आणि नाट्यपरिषदेने राज्यभरात होणाऱ्या अशा नाट्यस्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या स्पर्धा नसत्या, तर आजच्या अनेक प्रतिष्ठित कलावंतांचे रंगमंचावर प्रवेश करण्याचे स्वप्नच राहिले असते, याची जाणीव ठेवून या स्पर्धा जगवणे आपण आपली जबाबदारी समजली पाहिजे.

आज मनोरंजनाची अनेक माध्यमे आली आहेत, तरीही रंगभूमीच व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी शालेय अभ्यासक्रमात चित्रकलेप्रमाणे नाट्यशिक्षणाचा समावेश करणे गरजेचे आहे. त्याची गरज अनेकदा बालनाट्य चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कांचन सोनटक्के यांनी विस्ताराने मांडली आहे.

राज्य नाट्यस्पर्धेत पहिल्या पाच नाटकांचा महोत्सव राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करून हौशी रंगकर्मींच्या कलाकृती रसिकांपर्यंत पोचणे गरजेचे आहे. दरवर्षी सुमारे २०० नवी नाटके राज्य नाट्यस्पर्धेसाठी लिहिली जातात, त्यातील बहुतांश संहिता एखाद-दुसऱ्या प्रयोगाचे अल्पायुष्य जगतात. या नव्या नाटकांपैकी निवडक संहितांचे पुनर्लेखन करण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज आहे.

त्यातल्या काही नाटकांच्या वनलाईनचे नाट्यबिज मराठी रंगभूमी समृद्ध करणारे ठरू शकेल. नागपूरच्या ९९व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी अशा नव्या नाटकांच्या राज्यभर दहा नाट्यवाचन कार्यशाळा घेऊन नवे नाटककार, नव्या संहिता शोधण्याचा उपक्रम त्यांच्या कार्यकाळात केला. त्यापुढचे काम झाले नाही, त्यामुळे त्यातले अडथळे दूर केले पाहिजेत.

नवे नाटककार प्रशिक्षण घेऊन उत्तम नाटक लिहितील, असा दावा कुणीच करणार नाही, पण ज्यांनी पहिल्यांदाच काही प्रयत्न केले आहेत, त्यांच्या मांडणीतील तांत्रिक दोष असतील तर ते दूर सारून पुनर्लेखनातून नवा विचार देणारे, आजचे प्रश्न मांडणारे नाटककार नक्कीच सापडू शकतात.

असेच नाटककार शोधण्याचा प्रयत्न गेल्या २० वर्षांत बोधी नाट्य परिषदेच्या सुमारे ५० नाट्यवाचन कार्यशाळांतून प्रेमानंद गज्वी यांनी केला आहे. याशिवाय असंख्य रंगकर्मी नाट्य प्रशिक्षणाच्या कार्यशाळेतून नवे कलावंत शोधण्याचे काम करत आहेत. त्याचे कार्यही मराठी रंगभूमीसाठी महत्त्वाचे आहे.

मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांत अद्ययावत नाट्यगृहांत व्यावसायिक नाटके सादर होतात. काही नाटकांना हाऊसफुल्लचे बोर्ड लागतात. अनेक नाटकांना रसिकाश्रय न मिळाल्याने मोजकेच प्रयोग करून थांबावे लागते. अशीच एक हौशी कलावंतांची व्यावसायिक रंगभूमी पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात झाडीपट्टी नावाने प्रसिद्ध आहे.

साधारणत: दिवाळी ते होळीदरम्यान चार महिन्यांच्या कालावधीत झाडीपट्टी रंगभूमीवर एका नाटकाचे सुमारे शंभर प्रयोग होतात. अशी ५०-६० नाटकं दरवर्षी या रंगभूमीवर सादर होतात, गावखेड्यातले नाट्यवेडे रसिक ती नाटके तिकीट काढूनच बघतात. तिथेही कलावंतांच्या नावावर तिकीट विक्री होते. या नाटकांसाठी नाट्यगृह नाही. गावाशेजारच्या मोकळ्या मैदानात एका बाजूला रंगमंच उभारला जातो.

मैदानाभोवती मंडप बांधला जातो. पडद्याचीच मेकअपरूम, पडद्याच्याच विंगा, रंगमंचावर दोनचार माईक टांगले जातात. नाटक रात्री १०-११ वाजता सुरू करतात. पहाटेपर्यंत रंगकर्मी नाटक खेळतात, तेवढ्याच तल्लीनतेने प्रेक्षकही त्या खेळात रमतात. नाटक सुरू असताना अभिनय आवडणाऱ्या कलावंतांना प्रेक्षक बक्षीसही देतात.

एखादा संवाद किंवा गाणे वन्स मोअर करायला सांगतात. नाटक संपल्यानंतर भूमिका आवडल्यास कौतुक करतात आणि आवडली नाही, तर ‘तुम्हाला आज जमलं नाही भाऊ,’ म्हणत तिथेच माप काढतात. या कलावंत-प्रेक्षकांच्या ऋणानुबंधातच ही झाडीपट्टी रंगभूमी जगली आहे, वर्षानुवर्षे जगवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com