ऑन स्क्रीन : तांडव - राजकारण, समाजकारणाचा ‘मेलोड्रामा’

ऑन स्क्रीन : तांडव - राजकारण, समाजकारणाचा ‘मेलोड्रामा’

राजकारण आणि त्याच्या जोडीला समाजकारण या भारतासारख्या महाकाय देशात सतत घडणाऱ्या गोष्टी. या दोन्हींत गल्लत झाल्यास किंवा दोन्ही एकमेकांना भिडल्यास मोठा संघर्ष निर्माण झाल्याची अनेक उदाहरणं आपण गेल्या काही वर्षांत पाहिली आहेत. ‘तांडव’ ही अॅमेझॉन प्राइमवरील वेबसीरिज असाच संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न करते. मात्र, राजकारणातील उगाच ‘लार्जर दॅन लाइफ’ दाखवलेली पात्रं आणि समाजकार्यात स्वार्थ शोधणारे विद्यार्थी या दोन्ही गोष्टी अति मेलोड्रामाच्या अंगानं सादर केल्यानं दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा हा प्रयत्न वरवरचा ठरतो. 

‘तांडव’ची कथा देशाची राजधानी दिल्लीत दोन वेगवेगळ्या स्तरांवर घडते. समर प्रताप (सैफ अली खान) हा देशाच्या पंतप्रधानांचा मुलगा राजकारणाची सर्व सूत्रं आपल्या हातात घेण्यासाठी आसुसलेला असतो. निवडणुकांचे निकाल लागून त्याचे वडील देवकीनंदन (तिग्मांशू धुलिया) पुन्हा पंतप्रधान होणार, ही नक्की असतं. मात्र, समर विचित्र चाल खेळून त्यांचे मनसुबे उधळू पाहतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरीकडे, राजधानीतील विद्यापीठात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंब्यावरून संघर्ष सुरू होतो, ‘आझादी’ची मागणी केली जाते. यात आघाडीवर असतो शिवा शंकर (झिशान अयुब) हा तरुण, तडफदार विद्यार्थी नेता. आपल्या भाषणानं लोकांना एकत्र करण्याचं त्याचं तंत्र समरच्या नरजेत भरतं. वडिलांना पदावरून खाली खेचण्याचा डाव समरवर उलटलेला असतो व आता त्याला पुन्हा नव्यानं सुरवात करण्यासाठी गरज असते शिवासारख्या उगवत्या नेत्याची. गुरूपाल (सुनील ग्रोवर) याकामी समरला विविध प्यादी पुढं सरकवत मदत करीत राहतो व संघर्ष पेटत राहतो. समरच्या पक्षातील वरिष्ठ नेत्या अनुराधा (डिंपल कापडिया) त्याला अडचणीत आणण्याची कोणतीही संधी सोडत नसतात व पंतप्रधान बनण्याच्या मार्गातील अडथळे दूर करताना तो मेटाकुटीला येतो...

कथेच्या ओघात अनेक गोष्टी लेखक-दिग्दर्शकानं गृहित धरल्यानं त्यांची पकड ढिल्ली पडली आहे. विशेषतः देशाचा पंतप्रधान निवडीचे निर्णय पत्रकार परिषदेत होणं, त्यांच्या सुरक्षेतील ढिलाई, मोठ्या नेत्याला स्वतःचं स्थान टिकवण्यासाठी विद्यार्थी नेत्याची गरज पडणं या गोष्टी पटत नाहीत. विद्यार्थी चळवळीची दृश्ये दाखवतानाही असाच अतिरेक झाला आहे. समर आणि शिवाला एकत्र आणण्यासाठी गुरूपाल करीत असलेले छक्केपंजेही एका टप्प्यानंतर कंटाळवाणे ठरतात. पहिल्या भागाचा शेवट दुसऱ्या भागाबद्दलची उत्सुकता वाढविण्यातही फारसा यशस्वी ठरत नाही. 

सैफ अली खानची हाय प्रोफाइल नेत्याची भूमिका साकारताना पंचाईत झाली आहे. अभिनयातील सातत्य ठेवणं त्याला जमलेलं नाही. झिशान अयुबनं साकारलेला विद्यार्थी नेता जोरदार असला, तरी त्याच्या पात्राच्या लिखाणात त्रुटी असल्यानं प्रभाव पडत नाही. सुनील ग्रोवर गंभीर भूमिकेत चांगली छाप पाडतो. तिग्मांशू धुलिया, डिंपल कापडिया यांसह अनेक नावाजलेल्या कलाकारांना छोट्या भूमिकांत वाया घालवलं आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com