esakal | ऑन स्क्रीन : थलैवी : अर्थवट शिजलेली ‘अम्मां’ची थाळी I Thalaivi Movie
sakal

बोलून बातमी शोधा

Thalaivi Movie

ऑन स्क्रीन : थलैवी : अर्थवट शिजलेली ‘अम्मां’ची थाळी

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

तमिळनाडूच्या राजकीय आणि सिनेमाच्या इतिहासातील अर्धव्यू असलेल्या जयललिता यांच्यावरचा थलैवी हा ए. एल. विजय दिग्दर्शित बायोपिक अनेक बाबतींत वेगळा असला, तरी कथेच्या नायिकेपेक्षा इतर पात्रांनाच दिलेलं अधिक महत्त्व व कथा १९९१मध्येच संपवल्यानं पुरेसं समाधान करण्यात अयशस्वी ठरतो.

‘थलैवी’ची सुरवात तमिळनाडू विधानसभेत जयललिता यांच्या अवमानाच्या घटनेनं होतं. ‘मी आता मुख्यमंत्री बनूनच या सभागृहात येईल,’ अशी प्रतिज्ञा करीत जयललिता बाहेर पडतात आणि त्यांच्या बालपणापासूनचा पट कथा उभा करते. जयललिता यांची ओळख त्यावेळचे सुपरस्टार एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्याशी होते. जयललिता यांची समोरच्याला थेट भिडण्याची वृत्ती एमजीआर यांना आवडते आणि दोघांची पडद्यावरची जोडीही हीट ठरते.

जयललिताचं एमजीआर यांच्या जवळ जाणं काही जणांना आवडत नाही, मात्र दोघांची जोडी टिकून राहते. एम. करुणानिधी (नासीर) एमजीआर यांचा उपयोग मुख्यमंत्री बनण्यासाठी करून घेतात, मात्र निवडून आल्यावर त्यांना खड्यासारखं दूर करतात. हा अपमान सहन न झाल्यानं एमजीआर स्वतःचा पक्ष काढून निवडणूक लढतात आणि मुख्यमंत्री बनतात. राजकारणाबद्दल तिरस्कार असलेली जयललिता एमजीआर यांच्यापासून दूर होऊ लागते. ‘तू लोकांची कामं केल्यास लोकही तुझ्यावर प्रेम करू लागतील,’ हा एमजीआर यांचा सल्ला मानून त्या राजकारणात सक्रिय होऊ पाहतात. सर्व जुळून येत असतानाच एमजीआर यांचं निधन होतं व राजीव गांधी यांचीही हत्या होते. या परिस्थितीत आता लोकांसाठी ‘अम्मा’ बनलेल्या जयललिता स्वबळावर सत्ता काबीज करतात. आपल्या आमदारांना ‘तुम्ही माझ्याशी जुळवून घ्याल तर मी तुमची ‘अम्मा’, अन्यथा...’ असा दम भरतात व त्यानंतरची त्यांची कार्यपद्धती कशी असंल याचा अंदाज देत कथा संपते.

चित्रपटाची कथा केवळ जयललिता यांच्या भोवती न फिरता ती एमजीआर आणि इतर पात्रांनाही महत्त्व देते. काहीवेळा हा एमजीआर यांचाच बायोपिक नाही ना, अशी शंकाही येते. मात्र, जयललिता यांच्या बेधडक स्वभावाची ओळख करून देणारे प्रसंग छान जमून आले आहेत. एमजीआर व जयललिता यांच्या चित्रपटांतील प्रसंग व गाणी, दोघांचं फुलत जाणारं नातं, राजकारणामुळं त्यात आलेलं वितुष्ट, त्याचं एकमेकाशी सतत जुळवून घेणं हा कथेचा राजकारणापलीकडचा भाग खिळवून ठेवतो. एमजीआर यांच्या निधनानंतर वेगळ्या जयललिता आपल्याला पाहायला मिळतात व त्या काळातील त्यांची जिद्द दिग्दर्शकानं छान उभी केली आहे. मात्र, विधानसभेतील पहिल्या प्रवेशानंतरची त्यांची अनेक चढ-उतारांनी भरलेली कारकीर्द न दाखवण्याचं प्रयोजन कळत नाही. यात करुणानिधी यांच्या उचलबांगडीसह करण थापर यांच्याबरोबरच्या संघर्षांचा समावेश, त्यांच्या घरावर पडलेले छापे, वादग्रस्त मृत्यू अशा लोकांच्या स्मृतीतील अनेक प्रसंग न दाखवल्यानं ताटावरून अचानक उठवल्याचा फिल येतो!

कंगना राणावत जयललिताच्या यांच्या भूमिकेत शोभून दिसत नाही. राजकीय आयुष्यातील जयललिता उभ्या करताना कंगनाच्या अभिनयातील मर्यादा उघड्या पडतात. अरविंद स्वामी यांनी साकारलेले एमजीआर या चित्रपटाचं सर्वांत मोठं आकर्षण. तारुण्यातील नृत्याच्या प्रसंगापासून राजकारणातील प्रवेशानंतरच्या वेशातील एमजीआर त्यांनी बेमालूमपणे उभे केले आहेत. करुणानिधींच्या भूमिकेत नासीर भाव खाऊन जातात. ‘रोजा’ फेम मधूला फारशी संधी नाही.

loading image
go to top