esakal | ऑन स्क्रीन : द एम्पायर : लांबलेला ‘बाबरनामा’
sakal

बोलून बातमी शोधा

The Empire Movie

ऑन स्क्रीन : द एम्पायर : लांबलेला ‘बाबरनामा’

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

इतिहासातील गाजलेल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल ऐकायला, पाहायला सर्वांनाच आवडतं. मात्र, त्या व्यक्तीशी आपली सांस्कृतिक नाळ जुळलेली नसल्यास हे पाहणं खूप वरवरचं ठरतं आणि त्याला लार्जर दॅन लाइफ दाखवण्याचा प्रयत्नही हास्यास्पद वाटतो. ‘एम्पायर ऑफ द मुघल’ या अॅलेक्स रुदरफोर्ड यांच्या कादंबरीवर आधारित व निखिल अडवानी दिग्दर्शित ‘द एम्पायर’ या हॉटस्टारवरील बेवसिरीजची हीच पंचाईत झाली आहे. बाबरच्या बालपणापासूनची कथा, त्याची मानसिकता, लढवय्या वृत्ती आणि पानिपतसारख्या लढायांच्या वेळची त्याची विजिगिषू वृत्ती दाखवण्यात वेळ खर्ची घालण्यात आला आहे. लांबलेली कथानक, घुसडलेली गाणी आणि प्रसंगांतील तोच तोपणा यांमुळं ही मालिका पकड घेत नाही.

बाबर (कुणाल कपूर) हा लहानपणापासून वजीर खान (राहुल देव) याच्याकडून लढाईचे धडे घेत असतो. त्याची आजी शाह बेगमला (शबाना आझमी) बाबरच्या वडिलांची दर्यादिली मान्य नसते व राज्य करताना केवळ ते वाढविण्याचाच विचार करायचा असतो, अशी तिची धारणा असते. त्यातूनच ती बाबरला त्या पद्धतीनं प्रशिक्षण देते. वयाच्या १४व्या वर्षापासूनच बाबर युद्धकलेत व राज्याच्या विस्तार करण्यात पारंगत होतो, मात्र त्याच्यातही वडिलांप्रमाणंच लोकांना मदत करणं, राज्य करताना नागरिकांसाठी कोणताही त्याग करण्याची वृत्ती अंगभूतच असते. फरगाना हा आपला प्रांत वाचविण्यासाठी तो प्रयत्नांची शिकस्त करतो. शैबानी खान (डिनो मोरिया) त्याला कायम आव्हान देत राहतो, नागरिकांना वाचविण्यासाठी त्याला आपली बहिण खानजादा बेगमला (दृष्टी धामी) पणाला लावावं लागतं. राज्याच्या विस्तारासाठी तो काबूल काबीज करतो व नंतर त्याचं लक्ष हिंदुस्तानकडं जातं...

बाबरला लार्जर दॅन लाइफ दाखवण्यात दिग्दर्शकानं मोठा वेळ खर्च केल्यानं आणि अतिशय संवादी पद्धतीनं त्याचं सादरीकरण केल्यानं कथा शेवटपर्यंत पकड घेत नाही. पात्रांची मोठी गर्दी असल्यानं (बाबरचे नातेवाईक, मित्र, अनेक बायका) कोण कोणाचा कोण ही समजून घेण्यात बराच वेळ जातो. त्यात जवळपास प्रत्येक भागात एक (अर्थहीन) गाणं घुसडल्यानं कथा अधिकच कंटाळवाणी होते. आपल्याला ज्ञान पानिपतच्या लढाईसारखे प्रसंग उरकण्यात आले आहेत. कथेचा शेवटही न पटणार.

अभिनयाच्या आघाडीवर कुणाल कपूरची बाबरच्या भूमिकेसाठीची निवड मुळातच चुकल्यासारखी वाटते. तो धिप्पाड किंवा लढवय्या दिसत नाही. त्यात त्याच्या आवाजाचा पोत किरकोळ असल्यानं जरब बसत नाही. भावुक प्रसंगात त्याचा अभिनय जरा बरा वाटत असला, तरी लढायांच्या वेळी केवळ क्लोजअपमध्ये ओरडण्याचं काम देत दिग्दर्शकानं त्याच्या मर्यादा झाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. डिनो मोरियाचा मात्र चांगला प्रभाव पडतो. क्रूर शैबानीच्या भूमिकेत त्याला चांगली संधी मिळाली आहे. राहुल देवही वजीर खानच्या भूमिकेत शोभून दिसला आहे. शबाना आझमी, दृष्टी धामी यांसह अनेक कलाकारांच्या भूमिका मोठ्या असल्या तरी त्यांचा प्रभाव पडत नाही.

एकंदरीतच, भारतीयांच्या दृष्टीनं न-नायकाला मोठं दाखवण्याचा हा प्रयत्न फसला, असंच म्हणावं लागेल.

loading image
go to top