ऑन स्क्रीन : जय जय जय जय हे : एक थप्पडीची धडा देणारी गुंज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jay jay jay jay hey movie

ऑन स्क्रीन : जय जय जय जय हे : एक थप्पडीची धडा देणारी गुंज

‘थप्पड की गुंज’ या वाक्यानं गाजलेला, तसेच नुकताच तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा हिंदी चित्रपट पाहिल्याचं सिनेरसिकांना नक्कीच आठवत असणार. एक थप्पड माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकू शकते. ‘जय जय जय जय हे’ हा मूळ मल्याळम् चित्रपट अशाच एका थपडीमुळं बदललेल्या आयुष्याची गोष्ट सांगतो. महिला सबलीकरण हा विषय तुफान विनोदी पद्धतीनं, मात्र हवा तो संदेश देण्यात कुठंही न चुकता सादर केल्याबद्दल दिग्दर्शक विपिन दासचं कौतुक. दर्शना राजेंद्रन आणि बसिल जोसेफ या दोन मुख्य कलाकारांच्या चेहऱ्यावरचे मिनिटा मिनिटाला बदलणारे भाव व चित्रपटाचं संगीत केवळ अनुभवण्यासारखं. या सर्वांमुळं हा चित्रपट एक अनोखा अनुभव देतो.

‘जय जय जय जय हे’ची कथा आहे जया आणि तिचा पती राजेशची. पुरुषसत्ताक वातावरणात आणि घरच्यांसह नातेवाइकांनी ‘तुझ्या फायद्यासाठीच...’ असं सांगत लादलेल्या बंधनांत वाढलेल्या जयाला लग्नानंतर हाच अनुभव येत राहतो. तिचा पती राजेश त्याच्या आई व बहिणीच्या भाषेत अत्यंत भोळा, सन्मार्गी आहे. मात्र, आपल्याला हवं ते मिळालं नाही, तर तो चिडतो आणि कानाखाली ठेवून द्यायला मागंपुढं पाहात नाही. जया लग्नानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत २१ वेळा कानाखाली खाते. कधी यू-ट्यूबवर पाहून वाईट पदार्थ केला म्हणून, तर कधी आत्ता घालायची असलेली जीन पॅन्ट धुवायला घेतली म्हणून...या वागण्याला वैतागलेली व आपलं स्वत्व परत मिळण्याच्या प्रयत्नात असलेली जया ऑनलाइन कराटेचा क्लास करते आणि त्यांच्या घरातील वातावरण पूर्ण बदलतं... जया एवढी बदलेल, याचा अंदाज नसलेला राजेश आपल्या घटस्फोटित चुलत भावाचा सल्ला घेतो. ‘मूल झाल्यावर बायका बदलतात...’ या विश्‍वासावर तो जयाशी जुळवून घेऊ पाहतो. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवायला तयार असलेली जया त्याला आणखी भन्नाट धडे शिकवते...

महिला सबलीकरणावर आपण अनेक सिनेमे पाहिले आहेत, मात्र विनोद किंवा ब्लॅक ह्युमरचा वापर करीत या विषयाला थेट हात घालणारे सिनेमे विरळाच. एखादी महिला सर्व गोष्टी हातात घेऊ पाहते, तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावतातच. अगदी तिच्या घरचेही ‘आम्ही तुझ्यावर हे संस्कार केले नाहीत,’ असं म्हणत अंग काढून घेतात. समाजातलं हे वास्तव कथा सुरुवातीलाच टिपते. जयाचं धाडस अतिरंजित दाखवलं असलं, तरी दिग्दर्शकाचा उद्देश अन्याय सहन करणाऱ्या महिलांसमोर एक पर्याय ठेवण्याचा दिसतो. हे दाखवताना जयाच्या तोंडी कुठलीही अर्वाच्य भाषा किंवा अगदी संवादही येणार नाहीत, याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. त्याऐवजी समालोचनाच्या माध्यमातून नवरा-बायकोतील युद्ध दाखवत त्यात आणखी मजा आणली आहे.

कलाकारांचा अभिनय जमेची बाजू आहेच. अशा प्रकारचा विनोद दाखवण्यासाठी देहबोली आणि चेहऱ्यावरचे भाव यांमध्ये अपेक्षित बदल सर्वच कलाकारांनी नेमके केले आहेत आणि त्यामुळं विनोद आणि संदेश योग्य पद्धतीनं पोहोचतात. एकंदरीतच, एका थप्पडीची धडा देणारी गुंज नक्कीच अनुभवावी अशी.

(हा चित्रपट डिस्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये पाहता येईल.)