khufiya movie
khufiya moviesakal

ऑन स्क्रीन : खुफिया : गुप्तहेरांची ‘मानवी’ गोष्ट!

विशाल भारद्वाजचे चित्रपट पाहणं एक समृद्ध करणारा अनुभव असतो... त्याच्या सिनेमात तब्बू ज्या प्रकारची भूमिका साकारते ते केवळ अद्वितीय असतं.

विशाल भारद्वाजचे चित्रपट पाहणं एक समृद्ध करणारा अनुभव असतो... त्याच्या सिनेमात तब्बू ज्या प्रकारची भूमिका साकारते ते केवळ अद्वितीय असतं, विशालची तब्बूनंतरची आवडती नायिका वामिका गाबीला तो जसं सादर करतो, त्यालाही तोड नसते...

विशाल असल्यावर गुलजार गीते लिहितात आणि ती त्याची पत्नी रेखा भारद्वाज गाते व तो स्वतः संगीत देतो, हा सगळा अनुभव शब्दातीत असतो... हा सगळा अनुभव नेटफ्लिक्सवरील ‘खुफिया’ हा चित्रपट देतो. चित्रपट अमर भूषण यांच्या ‘इस्केप टू नो व्हेअर’ या कांदबरीवर बेतला आहे व त्याचं चित्रपटात रूपांतर करताना कथा काही ठिकाणी रेंगाळते व शेवटही खूप फिल्मी होतो.

‘खुफिया’ची कथा आहे कृष्णा मेनन (तब्बू) या ‘रॉ’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची. कथा २००४मधील आहे व बांगलादेश पाकिस्तानच्या ‘आयएसआय’बरोबर सलगी साधत असल्यानं भारताकडून ‘ऑपरेशन ब्रूट्स’ आखण्यात येतं. कृष्णाचा ज्युनिअर रवी मोहन (अली फजल) या मोहिमेवर काम करतो आहे, मात्र तो देशाची गुप्त माहिती अमेरिकन गुप्तहेरांना पुरवत असल्याचा संशय कृष्णाला येतो.

रवी व त्याची पत्नी चारू (वामिका गाबी) यांच्या घरावर पाळत ठेवण्याचं काम कृष्णा सुरू करते. बांगलादेशी एजंट हिनाची (अजमेरी हक बधोन) मदत घेत कृष्णा मोहीम पुढं सरकवते, मात्र रवीचं सत्य त्याच्या घरच्यांसमोर येतं. मोठ्या घडामोडी घडत कथा अमेरिकेत जाऊन पोचते व भारताचा अमेरिकेबरोबरचा अणुकरार आणि बांगलादेशातील घडामोडींमधील तिढा स्पष्ट करीत कथेचा शेवट होतो.

चित्रपटात गुप्तहेर कथा सांगितली गेली असली, तरी कथेचा आत्मा त्यातील स्त्री पात्रांच्या आयुष्यातील संघर्ष, देशासाठी कौटुंबिक आयुष्य पणाला लावण्याची त्यांनी धडाडी याचाही आहे. कृष्णाचा पती शशांक पटवर्धनबरोबर (अतुल कुलकर्णी) घटस्फोट झाला आहे व तिची भावनिक गुंतवणूक इतरत्र असताना मुलाला त्याबद्दल सांगण्याची हिंमत तिच्यात नाही.

चारूचं आपल्या लहान मुलावर जीवापाड प्रेम असलं, तरी पतीकडून होणारा देशद्रोह मोडून काढण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी आहे. एजंट हिना, रवीची आई या पात्रांचीही मानसिकता दिग्दर्शक टिपत राहतो. यामध्ये वेगानं पुढं सरकणारी कथा मध्यंतरानंतर काही ठिकाणी रेंगाळते.

मात्र, दिग्दर्शक कथेतील उत्कंठता कुठंही कमी होऊ देत नाही. त्याला गुलजार यांच्या सुरेल गाण्यांची जोड मिळाल्यानं ही गूढकथाही चटका देणारी होते. ‘हमको आज रुलाना हो तो मत आना...’ असे शब्द आणि रेखा भारद्वाज, सुनिधी चौहान, अरिजित सिंह यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला वेगळी उंची मिळवून देतात.

विशाल भारद्वाजच्या चित्रपटांमध्ये तब्बूचा अभिनय वेगळ्या उंचीवर पोचतो व ते इथंही पाहायला मिळतं. कामात व्यग्र अधिकारी आणि त्याचबरोबर कौटुंबिक संघर्षात अडकलेली कृष्णा तिनं ताकदीनं उभी केली आहे. तिनं कथेतील थरार उभा करण्यासाठी केलेला डोळ्यांचा वापर जबरदस्त. वामिका गाबी भारद्वाज याचं तब्बूनंतरचं दुसरं ‘फाइंड’ म्हणायला हरकत नाही.

चारूचं स्वतःत रमणं व नंतर प्राणपणानं लढणं तिनं छान साकारलं आहे. अली फजलनं रवीच्या भूमिकेतला सस्पेन्स चांगला साकारला आहे. बांगलादेशी नायिका अजमेरी हक बधोन, अतुल कुलकर्णी, आशिष विद्यार्थी, नविंद्रा बहल आदी कलाकारांनी त्यांना चांगली साथ दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com