ऑन स्क्रीन : स्कूप : ‘बातमी’मागच्या थराराची गोष्ट!

‘स्कूप’ची कथा २०११ मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे.
Scoop Series
Scoop Seriessakal

पत्रकारांच्या विश्‍वात स्कूपला, एक्सक्ल्यूझिव्ह किंवा विशेष बातमीला खूप मोठं महत्त्व असतं व त्यासाठी प्रत्येक पत्रकार जिवाचं रान करीत असतो. हंसल मेहता या हर्षद मेहताच्या आयुष्यावरील ‘स्कॅम ९२’सारखी वेब सिरीज यशस्वी करून दाखवलेल्या दिग्दर्शकानं ‘स्कूप’मध्ये एका सत्यघटनेचा बहुआयामी आढावा घेतला आहे. खिळवून ठेवणारं कथानक, माध्यमं, तुरुंग आणि न्यायालय या तीन ठिकाणी घडणारे थरारक प्रसंग, कलाकारांचा अभिनय, नेमकं संकलन आणि चांगला शेवट यांच्या जोरावर ‘स्कूप’ ही ‘नेटफ्लिक्स’वरील वेब सिरीज अविस्मरणीय अनुभव देते.

‘स्कूप’ची कथा २०११ मध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित आहे. ज्योतिर्मय डे या एका टॅब्लॉइड दैनिकाच्या पत्रकाराची अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं गोळ्या घालून हत्या घडवून आणली आणि त्याचा आळ प्रतिस्पर्धी दैनिकांनी पत्रकार जिग्ना व्होरा या क्राइम रिपोर्टरवर आला. याच जिग्नाचं आत्मचरित्र ‘बिहाइंड द बार्स इन भायखळा - माय डेज इन प्रिझन’वर ‘स्कूप’ची कथा बेतली आहे.

कथेत घटस्फोटिता व आपल्या आठ वर्षांच्या मुलाबरोबर राहणारी क्राइम रिपोर्टर जागृती पाठक (करिश्मा तन्ना) अंडरवर्ल्डसंदर्भातील बातम्या देत अल्पावधीत प्रसिद्ध झाली आहे आणि ती मोठ्या पदावरही पोचली आहे. प्रतिस्पर्धी दैनिकातील क्राईम रिपोर्टर जयदेव सेनशी (प्रसन्नजित चटर्जी) जागृतीचे खटके उडत असतात. जागृतीला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची मुलाखत घेऊन त्याला शहरातील गॅंगवॉरच्या घटनांबद्दल प्रश्‍न विचारायचे असतात.

मोठ्या प्रयत्नांनी तिला ही मुलाखत मिळते, ती प्रसिद्ध होते व जागृती सहलीसाठी कुटुंबाबरोबर काश्‍मीरला निघून जाते. इकडं छोटा राजनचे गुंड जयदेवची हत्या करतात. ही बातमी कळताच जागृती सहल अर्धवट टाकून मुंबईत परतते आणि या खुनामागच्या घटनांचा मोगावा घेत बातम्या देऊ लागते. तिचा बॉस इम्रान सिद्दीकी (मोहम्मद झिशान अयुब) तिला सबुरीचा सल्ला देतो.

पोलिस आयुक्त हर्षवर्धन श्रॉफ (हरमन बावेजा) तिला बातम्यासांठी झुलवत ठेवतो, मात्र छोटा राजनची एक ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती लागते आणि जागृतीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागतो. जागृतीला महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखणाऱ्या कायद्यांतर्गत (मोक्का) अटक होते आणि तिची ससेहोलपट सुरू होते. तिला किती काळ तुरूंगात राहावे लागते, तिथं काय हाल होतात, या कायद्यातून तिची कोण आणि कशी सुटका करतो याची उत्तरं खिळवून ठेवणारा शेवट देतो.

कथेत नाट्य ओतप्रोत भरलेलं आहे आणि कथा व पटकथा लेखक, तसंच संकलकानं तिचं सोनं केलं आहे. हंसल मेहतांनी ‘स्कॅम ९२’मधील हर्षद मेहताप्रमाणंच या कथेतील जागृती हे पात्रं रंगवलं आहे. करिअर किंवा व्यवसायात यशाचं शिखर गाठण्यासाठी कायद्यातल्या पळवाटा शोधणं एका टप्प्यावर किती महाग पडू शकतं, हे या दोन्ही कथांतील पात्रांमधील साम्यस्थळ.

जागृतीला पहिल्या पानावर झळकणाऱ्या ‘बायलाइन’ची नशा असते व त्यासाठी ती सर्व मार्ग चोखाळू पाहते. त्याचा फटका तिला बसतो आणि शेवटी तुरुंगात ती, ‘मी ‘स्कूप’च्या मागं लागून अनेक चुका केल्या,’ हे मान्यही करते. त्याचवेळी माध्यमांमधील गळेकापू स्पर्धा, पोलिसांकडून तपास सोपा करण्यासाठी बळीचा बकरा शोधणं, तुरुंगातील अव्यवस्था व तिथलं राजकारण, न्यायव्यवस्था अशा अनेक गोष्टींवर कथेच्या ओघात भाष्य केलं जातं. कथेचा शेवट व त्याच्या जोडीला जिग्ना व्होराचं कथन कथेला वेगळ्या उंचीवर नेतं.

करिश्मा तन्नाला सर्वाधिक संधी आहे. निर्भीड पत्रकार, मुलाची काळजी करणारी आई, तुरुंगात अडकल्यानंतरची असहायता हा प्रवास तिनं छान टिपला आहे. मोहम्मद झिशान अयुबनं संपादकाच्या भूमिकेत शोभून दिसतो. हरमन बावेजाचं अनेक वर्षांनी झालेलं दर्शन सुखकारक. छोट्या भूमिकांत प्रसन्नजित चटर्जी, देवेन भोजानी लक्षात राहतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com