मणिकर्णिका; झाशीच्या राणीचा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

चित्रपटाच्या घोषणेपासूनच मणिकर्णिका बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपटाच्या कथानकावरून त्याला आधी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट अर्ध्यावर सोडला. जेव्हा कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तेव्हा अभिनेता सोनू सूदनेही काढता पाय घेतला. कंगनाच्या वारंवार हस्तक्षेपामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत यामध्ये झाशीच्या राणीची मुख्य भूमिका साकारत आहे.

कंगनाच्या अदा, तिची तलवारबाजी, तिचा करारी बाणा, भव्य सेट सगळेच नुसते अप्रतिम आहे. कंगनाचा हा ट्रेलर अंगावर शहारे आणतो. कंगना आणि कंगना हीच या ट्रेलरची जान आहे. अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी अशा अनेकांची झलक ट्रेलरमध्ये दिसते. पण खरा भाव खावून जाते ती कंगना. हा ट्रेलर भन्साळींच्या ऐतिहासिक चित्रपटांची आठवण करून देतो, शिवाय कंगनाच्याही मोहात पाडतो. मणिकर्णिका ते देशसेवेत आपले प्राण पणाला लावणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई हा संपूर्ण प्रवास या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. तलवारबाजी करणारी, मांडीवर बाळाला घेऊन राजगादी सांभाळताना, घोडदौड करणारी झाशीची राणी यामध्ये पाहायला मिळत आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच मणिकर्णिका बऱ्याच कारणांमुळे चर्चेत राहिला. चित्रपटाच्या कथानकावरून त्याला आधी विरोध करण्यात आला. त्यानंतर दिग्दर्शकांनी चित्रपट अर्ध्यावर सोडला. जेव्हा कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली, तेव्हा अभिनेता सोनू सूदनेही काढता पाय घेतला. कंगनाच्या वारंवार हस्तक्षेपामुळे त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. हा चित्रपट 25 जानेवारी 2019 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मुंबईत एका भव्य सोहळ्यात हा ट्रेलर लॉन्च केला गेला. या इव्हेंटमध्ये कंगना नऊवारीत पाहोचली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. यानंतर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च केला. क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. पण तोपर्यंत क्रिश आपल्या दुस-या प्रोजेक्टमध्ये बिझी झालेत. त्यांच्या अनुपस्थित चित्रपटाचे काम कोण पुढे नेणार हा प्रश्न असताना कंगनाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नेमक्या याच दिवशी हृतिक रोशनचा ‘सुपर 30’ रिलीज होणार असल्याने बॉक्सऑफिसवर हृतिक विरुद्ध कंगना असा सामना पाहायला मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manikarnika The Queen Of Jhansi Trailer Released