esakal | "तेव्हा आत्महत्येचा विचार आला होता मनात"; मनोज वाजपेयीचा बिहार ते बॉलिवूडचा संघर्ष

बोलून बातमी शोधा

manoj bajpayee
"तेव्हा आत्महत्येचा विचार आला होता मनात"; मनोज वाजपेयीचा बिहार ते बॉलिवूडचा संघर्ष
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही गॉडफादरशिवाय किंवा ओळखीशिवाय स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणं कठीण असतं असं म्हणतात. छोट्या-छोट्या गावांमधून अनेक कलाकार मोठी स्वप्नं उराशी बाळगून मायानगरी मुंबईत येतात. काहींना इंडस्ट्रीत स्वत:च्या बळावर वेगळी ओळख निर्माण करता येते. तर काहीजण अयशस्वी ठरतात. इंडस्ट्रीत कोणत्याही गॉडफादरशिवाय केवळ दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा असाच एक अभिनेता म्हणजे मनोज वाजपेयी. बिहार ते बॉलिवूड हा त्याचा प्रवास कसा होता, याबद्दल त्याने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. संघर्षाच्या काळात आत्महत्येचाही विचार आला होता, पण त्यावेळी मित्रांनी फार साथ दिल्याचं त्याने सांगितलं.

संघर्षाचा काळ

"बिहारमधल्या एका गावात पाच भावंडांसोबत मी लहानाचा मोठा झालो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमचं आयुष्य खूप साधं होतं. पण जेव्हा कधी आम्ही शहरात जायचो, तेव्हा थिएटरमध्ये सिनेमा नक्की पाहायला जायचो. मी अमिताभ बच्चन यांचा फार मोठा चाहता आहे आणि मला त्यांच्यासारखंच व्हायचं होतं. नऊ वर्षांचा असतानाच माझी अभिनयात आवड निर्माण झाली. पण मोठी स्वप्नं पाहण्याची माझी ऐपत नव्हती. वयाच्या सतराव्या वर्षी मी दिल्ली विद्यापिठात दाखल झालो. तिथे मी नाटकात काम करायचो आणि माझ्या कुटुंबीयांना माहित नव्हतं. एकेदिवशी वडिलांना पत्र लिहून मी त्यांना सांगितलं, मला अभिनयक्षेत्रात काम करायचं आहे. तेव्हा ते माझ्यावर रागावले नव्हते, चिडले नव्हते. उलट त्यांनी माझी फी भरण्यासाठी मला २०० रुपये पाठवले."

आत्महत्येचा विचार

"नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेण्यासाठी मी अर्ज दाखल केला होता. पण माझा अर्ज तीन वेळा नाकारण्यात आला होता. त्यावेळी सतत माझ्या मनात आत्महत्येचा विचार यायचा. माझी मनस्थिती समजून मला साथ देण्यासाठी मित्र माझ्या बाजूलाच झोपायचे. मी आत्महत्या करेन की काय या विचाराने ते कधीच मला एकटं सोडत नव्हते. एकदा एका चहाच्या टपरीवर असताना तिग्मांशू धुलिया मला शोधत तिथे आला होता. दिग्दर्शक शेखर कपूर यांनी मला 'बँडिट क्वीन' चित्रपटाची ऑफर दिली, तेव्हा मी मुंबईत आलो."

मुंबईतला प्रवास

"मायानगरी मुंबईत राहणं काही सोपं नव्हतं. एका चाळीत मी पाच मित्रांसोबत राहायचो. सुरुवातीच्या काळात काही कामच मिळत नव्हतं. एका दिग्दर्शकाने तर माझा फोटोच फाडून फेकून दिला होता. इतक्या संघर्षानंतरही जेव्हा मला पहिला शॉट मिळाला, तेव्हा मला थेट निघून जाण्यास सांगण्यात आलं होतं. मी हिरोसारखा दिसत नाही म्हणून मी चित्रपटांमध्ये काम करू शकत नाही, असं त्यांना वाटत होतं. घराचं भाडं भरण्यासाठी पैसे नसायचे तर कधी साधा वडापावसुद्धा मी खाऊ शकत नव्हतो. पण माझ्या पोटातली भूक मला माझी स्वप्नं पूर्ण करण्याच्या भूकेला मारू शकत नव्हती. अखेर मला महेश भट्ट यांनी संधी दिली. टीव्ही सीरिजसाठी त्यावेळी मला एका एपिसोडचे दीड हजार रुपये मिळायचे. त्यानंतर मला 'सत्या' या चित्रपटाची ऑफर मिळाली. "

'सत्या' हा चित्रपट मनोज वाजपेयींच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी घर विकत घेतलं. "स्वप्न पूर्ण करायची जिद्द असेल तर संघर्ष किती आहे याची पर्वा करायची नाही. त्यावेळी फक्त एका नऊ वर्षांच्या बिहारी मुलाचा विश्वास महत्त्वाचा होता", असं ते अभिमानाने सांगतात.