योद्धा स्त्रीची भूमिका जगतेय...

तेजल गावडे
मंगळवार, 18 जुलै 2017

तमिळ आणि तेलुगु सिनेसृष्टी, त्यानंतर ‘रोजा’, ‘दिलजले’ आणि ‘फूल और काँटे’ या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री मधु शहा ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘आरंभ’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. यात तिने संभाविजा राणीची भूमिका साकारलीय. त्या निमित्ताने ...

तमिळ आणि तेलुगु सिनेसृष्टी, त्यानंतर ‘रोजा’, ‘दिलजले’ आणि ‘फूल और काँटे’ या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री मधु शहा ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘आरंभ’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय. यात तिने संभाविजा राणीची भूमिका साकारलीय. त्या निमित्ताने ...

तू छोट्या पडद्यावर पदार्पण करायचं का ठरवलंस?
गेली पाच वर्षं मी चार-सहा दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं. त्यातील माझ्या भूमिका खूप चांगल्या होत्या. हिंदीमध्ये बराच काळ काम केलं नाही. कारण मला हव्या तशा भूमिका मिळत नव्हत्या; मात्र ‘आरंभ’ मालिकेत काम करायला मिळालं, यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते. सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे ‘आरंभ’चे दिग्दर्शक गोल्डी बहल आहेत. मला माहीत होतं की, त्यांच्यासोबत काम करताना थोडीफार मोकळीक मिळेल. तसंच त्यांनी मला सांगितलं होतं की, महिन्यातून फक्त पाच ते सात दिवस काम करायचं आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबालाही पुरेसा वेळ देता येईल. हल्ली प्रत्येक कलाकारांना ऑडिशन द्यायला सांगितलं जातं; पण या मालिकेसाठी मला ऑडिशन द्यायला सांगितलं नाही. मला त्यांनी फोन केला आणि भूमिकेबद्दल सांगितलं. त्यांनी माझ्यावर जो विश्‍वास दाखवला की हे पात्र मी चांगल्याप्रकारे करू शकते. त्यामुळेच मी या मालिकेत काम करायला तयार झाले.

या भूमिकेची तयारी कशी केलीस?
आरंभ मालिकेत मी संभाविजा या एका योद्धा स्त्रीची भूमिका साकारलीय. तब्बल २०० वर्षांनंतर द्रविड आणि आर्य या दोन संस्कृतीमध्ये विभागलेल्या जगात प्रेक्षकांना एक शक्तिशाली आणि जाणती राणी राज्य करताना पाहायला मिळणार आहे. यात मी तलवारबाजी करताना दिसणारेय; पण यासाठी कोणतंही प्रशिक्षण घेतलं नाही. दंड मजबूत दिसण्यासाठी मी जास्त जिम वर्कआऊट केलं. जेव्हा मला कळलं की, या मालिकेत माझी एन्ट्री लढाईने होणार आहे. त्यामुळे चित्रीकरणापूर्वी मास्टरजींनी माझ्याकडून तलवारबाजीचा सराव करून घेतला. या भूमिकेसाठी मी वाचनावर जास्त भर दिलाय. कारण यातील भाषा थोडीशी कठीण आहे. त्यात थोडाफार संस्कृतचा वापर केलाय. माझे सीन चित्रीकरणापूर्वीच मला मिळतात. मग, घरी सराव करून सेटवर येते. मी त्या पात्रात स्वत:ला सामावून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय. 

आतापर्यंतच्या चित्रीकरणाचा अनुभव कसा होता?
चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी मला खूप मजा आली. सुरुवातीला मी घाबरत घाबरत सेटवर आले होते. कारण बऱ्याच काळानंतर मी पुन्हा हिंदीमध्ये काम करणार होते. त्यातही थोडाफार संस्कृत भाषेचा वापर आहे. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं दडपण होतं; पण जेव्हा मला लढाईच्या दृश्‍यांचं शूट करताना हातात तलवार दिली, तेव्हा खूप छान वाटलं. तसंच इथे असलेले लोक माझी परीक्षा घेत नव्हते. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्‍वासामुळे माझा आत्मविश्‍वास वाढला. आतापर्यंत मी सहा ते सात दिवस चित्रीकरण केलंय. त्यामुळे आता ही भूमिका मी जगतेय असं वाटतंय. 

या मालिकेतील लूकबद्दल काय सांगशील?
या मालिकेतील गेटअप सांभाळणं थोडंसं कठीण आहे. मला तयार व्हायला दोन-तीन तास लागतात. लेखक आणि दिग्दर्शकाची ही कल्पना असल्यामुळे त्याप्रमाणे माझा लूक व्हायला पाहिजे. त्यामुळे माझ्या स्कीन टोनवरही काम करावं लागतं. माझी बॉडी पेंट केली जाते. मालिकेत मी एन्ट्री करणार आहे, तेव्हा मी मुकुट परिधान केलेला आहे. मुकुट पडणं किंवा त्याला १० ते १२ तास सांभाळणं, थोडं आव्हानात्मक वाटलं.

तुझ्या मुली तुला पहिल्यांदा ‘आरंभ’ मालिकेत काम करताना पाहणार आहेत, तर तू किती उत्सुक आहेस? 
खूपच उत्सुक आहे. पाच वर्षांपासून मी काम करतेय. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत एक चित्रपट करायला जाते, तेव्हा माझी मुलं सर्वांना सांगतात की मम्मी शूटिंगला गेलीय; पण त्यांनी माझं काम आतापर्यंत पाहिलेलं नाही. पहिल्यांदा मी हिंदी मालिकेत काम करतेय. त्यामुळे माझी मुलं पहिल्यांदा मला स्क्रीनवर काम करताना पाहणार आहेत. त्याच्यावर त्यांचं मत व्यक्त करतील. त्यामुळे मी खूप नर्व्हस आहे आणि तितकीच उत्सुकही आहे. त्यांना मी इम्प्रेस करेन की नाही हे मला पाहायचंय. 

हिंदीमध्ये तुला कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करायला आवडेल?
मला मणिरत्नम यांच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल. कारण त्यांच्यासोबतचा माझा चित्रपट हिट ठरला होता. 

वेब सीरिज या माध्यमाबद्दल काय सांगशील?
वेब सीरिजच्या माध्यमातून वेगवेगळे विषय मांडू शकतो. हे माध्यम प्रभावी आहे; तसेच याचा प्रेक्षकवर्गही जास्त आहे. हे खूप चांगलं माध्यम आहे.

Web Title: manoranjan madhu shaha interview