अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, 'अग्गंबाई सासुबाई'च्या शूटींगला ब्रेक

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 23 September 2020

काही दिवसांपूर्वी सुबोध भावे, रोहित राऊत, अभिजीत केळकर यांच्यासोबतंच मराठीतील अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातंच आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.

मुंबई- कोरोनाचा कहर दिवसेदिंवस वाढत चालला आहे. नुकताच कोरोनामुळे ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वागबावकर यांना जीव गमवावा लागला. शूटींग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या निधनानंतर मालिकांच्या शूटींग्स आणि शूटींग दरम्यान पाळल्या जाणा-या नियमांवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. काही दिवसांपूर्वी सुबोध भावे, रोहित राऊत, अभिजीत केळकर यांच्यासोबतंच मराठीतील अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातंच आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.

हे ही वाचा: अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम, चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी १५ सप्टेंबरला कोविड-१९ ची टेस्ट केली असता त्या पॉझिटीव्ह आढळून आल्या. त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती. सध्या त्या होम क्वारंटाईन आहेत. निवेदिता यांनी वेळीच कोरोनाची टेस्ट केल्याने सेटवरील कोणालाही कोरोनाची लागण झाली नाहीये. सेटवर शूटींग करतेवेळी सगळे नियम पाळले जात होते त्यामुळे सेटवरील सगळ्या कर्मचा-यांनी कोरोनाची टेस्ट केली असता ती निगेटीव्ह आढळून आली आहे. तसंच घरात देखील अभिनेते अशोक सराफ आणि इतर सदस्यांची टेस्टही निगेटीव्ह आली आहे. 

अभिनेत्री निवेदिता सराफ यांची 'अग्गबाई सासुबाई' ही मालिका सध्या सुरु आहे. मालिकेचं शूटींग १५ सप्टेंबरपासूनंच थांबवण्यात आलं आहे. या मालिकेचं शूटींग मुंबईतील अंधेरीतील स्टुडिओमध्ये सुरु होतं. येत्या दोन दिवसात पुन्हा शूटींग सुरु होईल मात्र महिन्याच्या शेवटपर्यंत निवेदिता होम क्वारंटाईनंच असतील. निवेदिता यांचं वय ५५ आहे त्यामुळे सध्यातरी त्या शूटींगसाठी येणार नसल्याची माहिती झी मराठीच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

'अग्गबाई सासूबाई' मालिकेमुळे निवेदिता सराफ यांना आसावरी कुलकर्णी या पात्रामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यांची चांगलीच फॅनफॉलोईंग वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या या बातमीमुळे चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण आहे. मालिकेचे  बरेचसे एपिसोड आधीच शूट करुन तयार असल्याने टेलिकास्टमध्ये कोणत्याही प्रकारचा ब्रेक लागणार नाहीये. 

marathi actress nivedita saraf tests positive for covid 19


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi actress nivedita saraf tests positive for covid 19