
आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि मनोवेधक नृत्यकलेने मोहून टाकणाऱ्या पूजा सावंतचा आज वाढदिवस... जाणून घेऊया कसा राहिलाय तिचा प्रवास...
मराठी चित्रपट सृष्टीत अनेक नव्या दमाचे कलाकार सध्या आपली कला सादर करत आहेत. सौंदर्याने आणि आपल्या खास अदाकारीने भूरळ पाडणाऱ्या अनेक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत आहेत. मात्र, अभिनयातील आपल्या खास शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री तशा विरळाच! अभिनयाच्या या कलेच्या जोडीला जर नृत्यकलेची साथ असेल तर मग क्या बात! असा दुर्मिळ संयोग प्रेक्षकांच्या मन:पटलावर कायमचा घर करुन राहतो. आपल्या अशाच चतुरस्त्र अभिनयाने आणि मनोवेधक नृत्यकलेने मोहून टाकणाऱ्या पूजा सावंतचा आज वाढदिवस... जाणून घेऊया कसा राहिलाय तिचा प्रवास... जाणून घेऊया कसा राहिलाय तिचा प्रवास...
अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या अभिनयाने आणि नृत्यशैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मन जिंकले आहे. आज पूजाचा वाढदिवस असून तिच्या फॅन्सनी सोशल मिडीयावर तिला भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा - 'काय म्हणावं या बाईला,सगळ्या अंगावर लिहिलं आय लव यु...'
व्हायचं होतं प्राण्यांची डॉक्टर
पूजाचे बालपण मुंबईत गेले. बालमोहन विद्यालय या शाळेत तिने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयातून विज्ञान शाखेसाठी पूजाने प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असतानाच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड निर्माण झाली. कॉलेजमधील अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला. पण अभिनयात तिला करियर करायचे नव्हते. पूजाला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. प्राण्यांची सेवा करायची आवड तिला होती.
अशी झाली पिक्चरमध्ये एंट्री
'मटा श्रावण क्वीन' या स्पर्धेमध्ये आईच्या हट्टामुळे तिने सहभाग घेतला व या स्पर्धेत ती विजेती झाली. या स्पर्धेतच तिला सचित पाटील या कलाकाराने पाहिले. तिचा अभिनय आणि नृत्य शैली पाहून 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटासाठी सचितने पूजाला ऑफर दिली. 'क्षणभर विश्रांती' या चित्रपटामधून पूजाने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.
चित्रपट सृष्टीत पूजाची सुसाट घोडदौड
त्यानंतर 'एका पेक्षा एक', 'जल्लोष सुवर्ण युगाचा' यासारख्या शोमधून पूजा प्रेक्षकांच्या भेटीस आली. 2010 मध्ये 'तुम मिले' हा पूजाचा पहिला हिंदी चित्रपट होता. 'आता ग बया' या कॉमेडी चित्रपटात पूजाचा हटके अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळाला. तिच्या दगडी चाळ, झकास, बस स्टॉप, निळकंठ मास्तर, सतरंगी रे यासांरख्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
मिळाला दादासाहेब फाळके पुरस्कार
'लपाछपी' या चित्रपटातील तिचा अभिनय कौतुकास पात्र ठरला. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिला 'दादा साहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या 149 व्या पुण्यतिथी निम्मित 21 एप्रिल 2018 रोजी वांद्रे येथील सेंट ॲड्रयूज ऑडीटोरियम येथे तिचा हा गौरव करण्यात आला. सध्या, पूजा 'महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर' या शोचे परिक्षण करत आहे.