
'तू लढ हेमांगी'; अंतर्वस्त्रांबाबतच्या पोस्टला कलाकारांचा पाठिंबा
सोशल मीडियावर मुलींना त्यांच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्री हेमांगी कवीने Hemangi Kavi सडेतोड उत्तर दिलं आहे. हेमांगीने सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित तिचे विचार बेधडकपणे मांडले आहेत. तिच्या या पोस्टवर सध्या कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत असून अनेक मराठी कलाकारांनी तिला पाठिंबा दिला आहे. 'घरात किंवा बाहेर अंतर्वस्त्र घालायचे की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो', असं हेमांगीने या पोस्टमध्ये लिहिलंय. हेमांगीच्या एका व्हिडीओवर तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स पोस्ट केल्या होत्या. त्याच ट्रोलर्ससाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली आहे. (marathi celebs supports hemangi for her recent post about trolling slv92)
कलाकारांचा पाठिंबा
हेमांगीच्या या पोस्टचं कौतुक 'मुळशी पॅटर्न'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलंय. 'विचार म्हणून खतरनाक, लेखन म्हणून वरचा दर्जा, साहित्य म्हणून कालातीत, तू लढ हेमांगी', अशी कमेंट त्यांनी या पोस्टवर केली. अभिनेत्री रसिका आगाशे, वीणा जामकर, प्रिया बेर्डे, मानसी जोशी यांनीसुद्धा तिला पाठिंबा दिला आहे.
हेही वाचा: अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांना हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

हेमांगीची पोस्ट-
'लोक काय म्हणतील म्हणून लाजेखातर का होईना ब्रा वापरायची की नाही हा सर्वस्वी त्या बाईचा चॉईस असू शकतो. मग ती घरी असो किंवा सोशल मीडियावर किंवा कुठेही. त्यावरून जज करण्याचा, त्याबद्दल घाणेरड्या चर्चा किंवा गॉसिप करण्याचासुद्धा ज्याचा त्याचा चॉईस. अंतर्वस्त्रांचा लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या इमेजचा जो काही संबंध जोडला जातो, त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचा आहे हे लक्षात येतं. गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात', असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.