Film: मराठी, हिंदी चित्रपटांना पुन्हा सुगीचे दिवस! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Film-Industry

Film: मराठी, हिंदी चित्रपटांना पुन्हा सुगीचे दिवस!

पुणे : कोरोनाची सर्वाधिक झळ सोसणाऱ्या मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि चित्रपटगृहांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस येऊ लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यातील बहुतांश ठिकाणची चित्रीकरणस्थळे ‘हाऊसफुल’ झाली आहेत. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसिरीज, दाक्षिणात्य चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती दिली जाऊ लागली आहे. तर दुसरीकडे प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटही ‘बॉक्‍स ऑफिस’वर चांगलाच गल्ला जमवू लागली आहेत. त्यामुळे चित्रपट उद्योगावर अवलंबून असणाऱ्या हजारो कलाकार, तंत्रज्ञ, कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न आता सुटू लागला आहे.

कोरोनामुळे विविध क्षेत्रांसह चित्रपटसृष्टीलाही सर्वाधिक फटका बसला. हाताला काम नसल्यामुळे हजारो कलाकार, तंत्रज्ञ व कामगारांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्याने चित्रपटसृष्टीनेही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे चित्रीकरण अपूर्ण राहिलेले चित्रपट व नव्याने येऊ घातलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरु झाले आहे.

हेही वाचा: ग्रामपंचायतीमध्ये नोंद नसताना १०० टक्के करवाढ; सामान्यांची फसवणूक

अशी आहे स्थिती...

  • मागील दोन वर्षात २०० हून अधिक मराठी चित्रपटांनी घेतले सेन्सॉर प्रमाणपत्र

  • बहुतांश मराठी चित्रपट येत्या काही दिवसात प्रदर्शित होण्याच्या रांगेत

  • दर आठवड्याला ४ ते ५ मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता

  • हिंदीबरोबरच मराठी चित्रपटांचाही ‘बॉक्‍स ऑफीस’वर दबदबा

  • राज्य सरकारच्या १०० टक्के प्रेक्षक उपस्थितीच्या निर्णयाचा सकारात्मक परिणाम

१२५

राज्यातील मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहे

५४ हजार

मराठी चित्रपट महामंडळ सभासद संख्या

५२७

एकपडदा चित्रपटगृहे

सुमारे ५ लाख

चित्रपट उद्योगावर अवलंबून असणारे

‘पुण्यापाठोपाठ नाशिक शूटिंग डेस्टीनेशन’

हिंदी, मराठी मालिका, चित्रपट, वेबसीरीजच्या चित्रीकरणासाठी पुण्यापाठोपाठ आता नाशिक आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे. नाशिकला असणारे धार्मिक महत्त्व, औद्योगिक, कृषी क्षेत्रामुळे निर्मात्यांकडून तेथे चित्रीकरण करण्यास प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. नवे व वेगळे शूटिंग डेस्टीनेशन’ म्हणूनही नाशिककडे पाहिले जात आहे.

चित्रीकरणस्थळे हाऊसफुल्ल

मुंबई व सभोवतालच्या परिसरात हिंदी मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील फलटण, वाईसह अन्य काही गावांसह पुण्यात हिंजवडी आयटी पार्क आदी ठिकाणी हिंदी चित्रपट, वेबसीरीजचे चित्रीकरण सुरु आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण भोर, पानशेत, सासवड या ठिकाणी सुरु आहे.

कोरोनानंतर मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली. त्यामुळे अनेक मराठी चित्रपटांनी चांगले उच्चांक गाठले आहेत. राज्यातील चित्रीकरणही वाढले असून अनेक निर्माते नवे चित्रपट तयार करी आहेत.

- सादिक चितळीकर, वितरण व्यवस्थापक, झी स्टुडिओ

कोरोनाविषयीची लोकांमधील भीती कमी झाल्याने चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रीकरणही पुन्हा सुरु झाले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील चित्रपट उद्योगाला अंदाजे एक हजार कोटी रुपयांचा फटका बसला.

- मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांकडून सर्वाधिक चित्रीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सातारा, पुणे, नाशिकसह अन्य शहरांमध्ये चित्रीकरण वाढले आहे. वेबसीरीजचेही चित्रीकरण सुरु आहे. मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसादही मिळत आहे.

- संजय ठुबे, कार्यकारी निर्माता

Web Title: Marathi Hindi Cinema Film Industry Theater Houseful

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Film IndustryFilms