esakal | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा ‘टीझर’

बोलून बातमी शोधा

marathi movie chandramukhi teaser released on social media
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘चंद्रमुखी’चा ‘टीझर’
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला आहे. गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु होणाऱ्या ‘हिंदू संवत्सराचा’ आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. ‘उंचावणाऱ्या नव्या आशांचे’ प्रतिक म्हणजे गुढी आणि याच गुढीच्या पलीकडून येणारी आशेची किरणं, कोरोनाच्या भीषण अनुभवांच्या पलिकडचं जग आपल्याला दाखवतील. हे ही दिवस जातील, फक्त गरज आहे संयमाची असा सकारात्मकतेचा संदेश देऊन हा टीझर प्रदर्शित करण्य़ात आला आहे.

या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट – ‘अजय अतुल’ यांचे संगीत गुणगुणत राहावं असं आहे. निर्माते अक्षय बर्दापूरकर व त्यांचा भारतातील पहिला-वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म – ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे ‘फ्लाईन्ग ड्रॅगन’ हे सह-निर्माते आहेत. ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांच्या पाठोपाठ आता ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या निर्मितीतही ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ निर्माते म्हणून एकत्र आहेत. या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद आहेत चिन्मय मांडलेकर यांचे. संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी, अजय-अतुल चं अस्सल मातीतलं मराठमोळं संगीत आणि प्रसाद ओक चं दिग्दर्शन...!!!

आजचा गुढीपाडवा नक्कीच गोड झाला आहे. गुढीच्या या गोड गाठीची, भरजरी शेल्याची, मोहक वासाच्या फुलांची गुंफण म्हणजेच ‘चंद्रमुखी’आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्लॅनेट मराठीच्या युट्युब चॅनेलवर रिलीज झालेला ‘चंद्रमुखी’चा टीझर प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींना त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर उपाययोजनाही केल्या जात आहे. यासगळ्या परिस्थितीचा फटका निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. त्यामुळे चित्रपट, मालिकांचे चित्रिकरण रखडले आहे.