सविताचं यशस्वी माध्यमांतर!; 'सविता दामोदर परांजपे'

हेमंत जुवेकर 
रविवार, 2 सप्टेंबर 2018

सविता दामोदर परांजपेचं नाटक ते सिनेमा हे माध्यमांतर यशस्वीपणे झालंय. नाटक म्हणून ते सादर होताना रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात त्याने निर्माण केलेला थरार ते नाटक पाहिलेल्या अनेकांना आठवत असेल.

एकांकिकेचं नाटक होणं यात आता फारसं नाविन्य राहिलेलं नाही. नाटकाचा सिनेमा होणं यात मात्र ते आहे. सविता दामोदर परांजपे या सिनेमाबद्दल म्हणूनच प्रचंड कुतुहल होतं. 

एकांकिकेचं नाटक होतानाही बदल होतातच, पण ते बदल झाले तरी ते सादर मात्र त्याच माध्यमातून होणार असतं. पण नाटकाचा सिनेमा होताना ते माध्यमांतर असावं लागतं, तसं नाही झालं तर फक्त नाट्यप्रयोगाचं शुटींग ठरू शकतं. 

सविता दामोदर परांजपेचं नाटक ते सिनेमा हे माध्यमांतर यशस्वीपणे झालंय. नाटक म्हणून ते सादर होताना रंगमंचाच्या मर्यादित अवकाशात त्याने निर्माण केलेला थरार ते नाटक पाहिलेल्या अनेकांना आठवत असेल. रिमाने सादर केलेल्या व्यक्तिरेखेची ती जादू होतीच, त्याचबरोबर राजन ताम्हाणेंचं दिग्दर्शन, प्रकाशयोजना यांचाही त्यात मोठा वाटा होता आणि अर्थातच शेखरं ताम्हाणेंचं लेखनही कारणीभूत होतंच त्यासाठी. 

हा सिनेमा त्या नाटकाच्या कथेवर आधारित असला तरी सिनेमासाठी त्याचं स्वतंत्र लेखन शिरीष लाटकरांनी उत्तमच केलंय. त्यांच्या मदतीने स्वप्ना वाघमारे जोशी यांनी नाटकाची कथा वेगळ्या पद्दतीने सादर केलीय. नाटकात केवळ संवादाच्या माध्यमातून सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी इथे प्रत्यक्षात सांगता आल्यात त्यांना. पण या अध्याऋत धरलेल्या गोष्टी मांडण्याचं काम अतिशय कठीण. कारण सांगण्यातून प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली प्रतिमा वेगवेगळी असू शकते. ती प्रत्यक्षात उतरवताना कमअस्सल वाटण्याची शक्यता असते. पण स्वप्ना जोशींनी ते परिणामकारकरित्या केलंय. चित्रपटाचा वेगही त्यांनी उत्तम राखलाय. (शेवटच्या सत्रात मात्र तो थोडा उणावल्यासारखा वाटतो. कदाचित, तिथे आलेल्या गाण्यामुळेही तसं वाटत असावं) तरीही एकूणात सिनेमा परिणामकारक वाटतो.
  
एका सुखी जोडप्याच्या संसारात बायकोच्या आजारपणामुळे आलेलं वादळ हा याचा मुख्य विषय. तो आजार शारिरिक आहे, मानसिक आहे की आणखी काही याचा उलगडा होत नसल्याने हताश झालेला नवरा मग आपल्या एका नातेवाईकाला बोलावतो. त्याला ती पझेस्ड वाटते. या जोडप्याची मैत्रिणीच तिच्यात वस्तीला असते. तिला जायला सांगितल्यावर ती तयार होतेही पण एक विचित्र मागणी पूर्ण झाली तरच... ज्यामुळे या कुटुंबात वादळ उठतं...
 
या नाटकाचा सिनेमा करताना याचा भूतपट होणार नाही याची दक्षता दिग्दर्शिकेने पुरेपुर घेतलीय. या साऱ्या व्यक्तिरेखांचं माणूसपण त्यातून दिसाव हा प्रयत्नही दिसतोच. त्यामुळेच यातले कलाकार महत्वाचे होते. सुबोध भावेने बायकोवर अतीव प्रेम करणारा, तिच्या आजारपणामुळे हताश बनलेला आणि तिच्या विचित्र मागणीमुळे कोंडमारा झालेला नवरा आणि त्याची तगमग चांगलीच मांडलीय. बाकी कलाकारांची साथही उत्तमच आहे त्यांना, पण यातलं सरप्राईज पॅकेज आहे ते तृप्ती तोरडमल.  

यापुर्वी रंगभूमीवर (तरुण तुर्क म्हातारे अर्क सारख्या नाटकातून) काम केलं असलं तरी तिथे अभिनयाचा कस लागला नव्हता. रिमा लागूंनी `पझेस्ड` केलेली ही भुमिका तृप्तीने उत्तमच साकारलीय. निलेश मोहरीर आणि अमितराज यांचं संगीतही चांगलंय, पण यात तशी गाण्यांना फार जागा नव्हतीच. जॉन अब्राहम निर्माता असल्याने निर्मितीमुल्य श्रीमंत आहेतच, तांत्रिक बाजूही उजव्या आहेत. 

एक स्वतंत्र कलाकृती म्हणून आणि नाटकाचं माध्यमांतर म्हणूनही सविता दामोदर परांजपे पहावी अशीच आहे. सिनेमाच्या शेवटी सविता माध्यम यशस्वीपणे बदलते, त्याच्यासारखंच नाटकातून सिनेमापर्यंतचं माध्यमांतरही यशस्वी झालंय असं नक्की म्हणता येईल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi Movie Review Savita Damodar Paranjape By Hemant Juvekar