इस जीवन की यही है... 

अतुल क. तांदळीकर
रविवार, 17 मे 2020

रस्त्यावर घराकडे निघालेल्या लोकांच्या भावनांशी मिळतं-जुळतं गाणं बघितलं.यावेळी राजेश खन्ना, शशी कपूर, टीना मुनीम अभिनित 'अलग अलग' चित्रपटातील गाणं बघूया. 

जळगाव : सध्याचा काळ मोठा कठिण आहे. कुणाचा मृत्यूशी संघर्ष तर कुणाचा जगण्याशी...यामूळे एक गोष्ट नक्कीच उजळ झाली ती म्हणजे माणसाची संवेदनशीलता.जसा रस्त्यावर जगण्यासाठी माणूस धडपडताना दिसतो तसाच त्याचा संघर्ष जगातील काना-कोपऱ्यातील इस्पितळात देखील सुरू आहे.यावेळचं गाणं यांच संवेदनांना,बोलतं करणारं आहे,मागील गाण्यात आपण रस्त्यावर घराकडे निघालेल्या लोकांच्या भावनांशी मिळतं-जुळतं गाणं बघितलं.यावेळी राजेश खन्ना, शशी कपूर, टीना मुनीम अभिनित 'अलग अलग' चित्रपटातील गाणं बघूया. 

हे गाणं बघतांना माणसाच्या आयुष्यातही अनेक कथानकं निर्माण होत असतात हे जाणवत राहतं आणि या आपल्या जगण्याची तीच कथा गीतकार आनंद बक्षी यांनी अतिशय मर्मिकरित्या शब्दबध्द केली असल्याचे लक्षात येते.माणसाचा मृत्युशी संघर्ष वेदनादायी असतो, तो कधी कधी जगण्याशी झगडताना तितकाच आव्हानात्मक असतो.हे आव्हान कसं पेलायचं,वेदनांशी मैत्री कशी अपरिहार्य असते,यातून सुटका कशी करायची, हे सर्व या गीतकाराने ही जीवनाची व्याख्या सोप्या शब्दात मांडताना स्पष्ट केली आहे. आर.डी. अर्थात राहुल देव बर्मन यांच्या कल्पक चालीमुळे आणि लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजामुळे ती सहज समजून येते, यामूळे जीवनाचा अर्थ तर उलगडतोच पण मरण्याचं महत्व देखील अधोरेखित होत जातं. 

कौन रहा है,कौन रहेगा 
कोई हमेशा कब रहता है 

या दोन ओळी दरम्यानचं मर्म म्हणजे जीवन.चित्रपटातील कथानकाला सुसंगत ते पाहतांना योग्य वाटत असले तरी प्रत्यक्षात देखील या गाण्यातील अर्थ प्रत्येकाच्या जगण्याशी लागू होत असतो ही जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.साहित्य जगण्याला बळ का देतं असा प्रश्न कुणी केला तर त्याचं उत्तर हे गाणं असं देता येईल.आजकालच्या पिढीला साहित्य वाचन फारसे रुचत नाही पण किमान गाण्यातून तरी त्यांनी जगण्याची मौज शिकण्याचा प्रयत्न केला तरी हरकत नाही. 

आशा-निराशेचा लपंडाव 
हे जीवन जगायचं आहे ते कळलं,उमजलं, समजलं की आपण जिंकलो,वेदना सोबत असतांना या ओळी खूप धीर देत असतात, या प्रतिभावन्त गीतकाराच्या या काव्याचा उपयोग निर्देशक शक्ती सामंत यांनी चतुराईने केला आहे, सहसा मनुष्याचा जीवन-मरण संघर्ष हा इस्पितळात उपचार घेताना असतो, त्याच्या मनात केवळ हे दोन घटक घुटमळत असतात तेथे आशा-निराशेचा लपंडाव त्याला श्वासाचं महत्व पटवून देत असतो,शक्तीदांनी नेमकी येथेच आपली कल्पकता फुलविली, इस्पितळातील रुग्णांसमवेत हे मार्मिक गाणं चित्रित करून त्याचं महत्व अधोरेखित केलं.अभिनेत्री टीना मुनीम ने ते उत्तमरीत्या सादर करून त्या रुग्णालयातील रुग्णाची मनं जिंकताना प्रेक्षकांची देखील मनं जिंकली आहेत इतकं हे छान गाणं आहे. 

इस जीवन की यही है कहानी 
आनी जानी यह दुनिया बहते दरिया का पानी 

आपल्या जगण्याच्या कथानकाची अशी मार्मिक सुरवात करून या गीतकाराने पुढे सर्व गाण्यात माणसाला जिवंत केलं आहे,त्याला जगण्याचं बळ दिलं आहे,मरणापासून त्याला दूर नेलं आहे. 

आने वाला पल कहता है 
जाने वाला पल कहता है 
कौन रहा है,कौन रहेगा 
कोई हमेशा कब रहता है 
रह जाती है याद निशानी 

या ओळीत उलगडून सांगण्यासारखं फार काही नाही अगदी सोपं आहे,आपल्या घरातील कुणी हे जग सोडून गेला असेल, त्याची सतत येणारी आठवण म्हणजे हा या ओळीतील अर्थपूर्ण क्षण. 

मेलडी मेकर्स 
- हे गाणं ज्या शब्दांनी सजलं ते गीतकार आनंद बक्षी म्हणजे लाजवाब. 
- लतादिदींकडून ते उत्तम चालीत गाऊन घेणारे राहुल देव बर्मन यांचा संगीतमेळ अप्रतिम 
- निर्देशक शक्ती सामंत यांनी आपला आवडता कलाकार राजेश खन्ना यांनी निर्माण केलेल्या या चित्रपटातील प्रत्येक प्रसंग जिवंत केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon entertenment life tina munim song