esakal | नवा चित्रपट : मॉन्सून शुटआउट 
sakal

बोलून बातमी शोधा

Poster of Monsoon Shootout

नवा चित्रपट : मॉन्सून शुटआउट 

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

'मॉन्सून शुटआउट' या चित्रपटाबद्दल त्याचा ट्रेलर पाहिल्यावरच उत्सुकता निर्माण झाली होती. या इंटरऍक्‍टिव्ह ट्रेलरमध्ये पोलिसांनी गुंडाला मारल्यास काय होईल किंवा न मारल्यास काय होईल, असे दोन पर्याय होते व त्यानुसार तो ट्रेलर बदलतो! प्रत्यक्ष चित्रपटात एकाच घटनेकडं तीन वेगळ्या दृष्टिकोनांतून पाहण्यात आले असून, त्याचे तीन वेगवेगळे परिणाम काय होतील याचा थरार मांडला गेला आहे. अभिनय, संगीत, संकलन व अमित कुमार यांचे दिग्दर्शन यांमुळे हा प्रयोग खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. 

'मॉन्सून शुटआउट'ची कथा सुरू होते मुंबईमध्ये. आदिची (विजय वर्मा) पोलिस खात्यात नेमणूक झाली असून, अगदी सुरवातीलाच वरिष्ठ अधिकारी शेख (नीरज काबी) त्याला एका गॅंगस्टरच्या मागावर घेऊन जातात. शिवा (नवाजुद्दीन सिद्दीकी) आदिच्या तावडीत सापडतो आणि हातात बंदूक असलेला आदि त्याला गोळी मारण्याआधी विचारात पडतो. कोणता मार्ग निवडायचा...योग, अयोग्य की मध्यम मार्ग...आता कथेचे तीन तुकडे पडतात. पहिल्या तुकड्यात आदि शिवाला सोडून देण्याचा निर्णय घेतो, मात्र हा निर्णय त्याच्यावर उलटतो. वरिष्ठ त्याला दोषी धरतात, तर शिवा आपल्या वृत्तीनुसार वागत आदिलाच धडा शिकवतो.

चित्रपट पुन्हा त्याच प्रसंगावर येतो आणि या वेळी आदि शिवाला गोळी घालतो. याचा फटका आदिला थेट बसत नसला, तरी या वेळी कोणताही पुरावा नसताना शिवाला मारल्याचं शल्य त्याला बोचत राहतं आणि शिवाच्या कुटुंबाच्या बाबतीत दुर्दैवी घटना घडतात. कथा पुन्हा त्याच प्रसंगावर येते आणि या वेळी आदि मध्यम मार्ग स्वीकारत शिवाला ताब्यात घेतो. याचा परिणामही फार चांगला नसतो...या निर्णयानंतर काय होतं याचा थरार आपल्याला शेवटी पाहायला मिळतो. 

कागदावर मनोरंजक वाटणारी ही गोष्ट नवोदित दिग्दर्शक अमित कुमार यांनी उत्तम मांडली आहे. कथा गुंतवून ठेवते, विचार करायला लावते. पोलिस, राजकारणी व गुंड यांच्या सोटेलोट्याबद्दलही सांगते. गुन्हेगारी कथा व पार्श्‍वभूमीवरचा मुंबईतला पाऊस 'सत्या'ची आठवण करून देतो. मात्र, घटना पटापट घडत गेल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ वाढतो. रात्रीची मुंबई दाखवत फिरणारा कॅमेरा, भेदक संगीत आणि संकलनाच्या जोरावर (फक्त 92 मिनिटं) चित्रपट खिळवून ठेवतो. अरिजित सिंगच्या आवाजातील एकमेव गाणंही लक्षात राहतं. हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात मध्येच दाखवला गेला होता, प्रदर्शित इतक्‍या उशिरा का झाला हा प्रश्न आहेच. 

विजय वर्मानं छान काम केलं आहे. थंड चेहऱ्यानं गंभीर प्रसंगांना सामोरं जाण्याची त्याची अभिनयाची पद्धत अमिताभच्या अँग्री यंग मॅनची आठवण करून देते. नवाजुद्दीनला त्याला शोभणारी भूमिका मिळाल्यानं तो भाव खाऊन जातो. चित्रपटाचं चित्रीकरण अनेक वर्षांपूर्वीचं असल्यानं सध्या त्याच्या देहबोलीत दिसणारा आत्मविश्‍वास या चित्रपटात थोडा कमीत दिसतो. तनिष्ता चॅटर्जी नेहमीप्रमाणे आपली छाप पाडते. इरावती हर्षे, नीरज काबी, गीतांजली थापा या सर्वच कलाकारांनी छोट्या भूमिकांत जीव ओतून काम केलं आहे. 

एकाचा घटनेचे 'त्रिनाट्य' दाखविणारा वेगळा प्रयोग, अभिनय, संगीत आणि कॅमेरा यांसाठी एकदा पाहायला हरकत नाही. 

श्रेणी : 3.5 
 

निर्मिती : गुणित मोंगा, अनुराग कश्‍यप 
दिग्दर्शक : अमित कुमार 
भूमिका : विजय वर्मा, नवाजुद्दीन सिद्दीकी, तनिष्ता चॅटर्जी, नीरज काबी, इरावती हर्षे आदी.

loading image
go to top