esakal | महाराष्ट्राबाहेर होणार मराठी मालिकांचं शूटिंग

बोलून बातमी शोधा

marathi serials
महाराष्ट्राबाहेर होणार मराठी मालिकांचं शूटिंग
sakal_logo
By
स्वाती वेमूल

राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने १५ दिवस कडक निर्बंध लागू केले आहेत. याअंतर्गत राज्यात मालिका आणि चित्रपटांच्या शूटिंगवरही बंदी घालण्यात आली. त्यामुळे आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. आई कुठे काय करते, स्वाभिमान, सांग तू आहेस का आणि मुलगी झाली हो या मालिकांचं शूटिंग सिल्वासा इथं होणार आहे. या मालिकांचे सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्स हे सिल्वासासाठी रवाना झाले असून या आठवड्याअखेरपासून शूटिंगला सुरुवात होणार आहे.

रंग माझा वेगळा आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकासुद्धा पुढील भागांचं चित्रीकरण गोव्यात करणार आहेत. तर फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचं चित्रीकरण राजकोटमध्ये करण्यात येणार आहे. मराठीसोबतच हिंदी मालिकांचंही शूटिंग महाराष्ट्राबाहेर केले जाणार आहेत. कुंडली भाग्य आणि कुमकुम भाग्य या मालिकांचं पुढील शूटिंग गोव्यात होणार असून इमली, अनुपमा आणि मेहंदी है रचने वाली या मालिकांचं शूटिंग हैदराबादमध्ये होत आहे.

हेही वाचा : 'राधे' बाबत भाईजानची मोठी घोषणा

राज्यात बुधवारी कोरोनाचे ६७,४६७ रुग्ण आढळले, तर ५६८ जणांचा मृत्यू झाला. मुंबई, ठाणे या मुंबई महानगर क्षेत्रात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत घट झाली तर नाशिकमध्ये रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्यात सध्या ६ लाख ९५ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत.