1300 नर्तकांसह "मर्द मराठा' गाणे चित्रित

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

"पानिपत' या आगामी चित्रपटात एकाच वेळी 1300 नर्तक थिरकणार आहेत.

मुंबई : "पानिपत' या आगामी चित्रपटात एकाच वेळी 1300 नर्तक थिरकणार आहेत. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील महत्त्वाचे पर्व असलेल्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईवरील या सिनेमातील "मर्द मराठा' या गाण्यात हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. मराठी आणि हिंदी भाषेचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. "मर्द मराठा' या गाण्यात मराठमोळा साज अनुभवायला मिळणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पारंपरिक लेझीम तर आहेच, त्याचबरोबर बैलांचा पोशाख परिधान केलेले नर्तक असतील. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील काही कलाकारांचे लक्षवेधी लूक समोर आले होते. नुकतेच या चित्रपटाचे पहिले गाणे "मर्द मराठा' सादर होत आहे. राजू खान यांनी नृत्यदिग्दर्शित केलेल्या या गाण्यात अभिनेता अर्जुन कपूर, मोहनीश बहल, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे, कृती सेनन हे कलाकारांबरोबर तब्बल 1300 नर्तक एकत्र नृत्य करणार आहे. विशेष म्हणजे केवळ 13 दिवसात या गाण्याचे चित्रीकरण कर्जत येथील शनिवारवाड्याच्या रिल लाईफ सेटवर करण्यात आले. गायिका अंजली गायकवाड आणि गायक ए. आर. अमीन यांनी हे गाणे गायले असून संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mard maratha songs shoot