esakal | Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'
sakal

बोलून बातमी शोधा

Masaba Gupta,Neena Gupta

Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील अभिनेत्री नीना गुप्ता Neena Gupta यांच्या जीवनावर आधारित 'सच कहूँ तो' Sach Kahun Toh हे पुस्तक 14 जून रोजी प्रकाशित होणार आहे. सध्या सोशल मीडियावर या पुस्तकाबद्दल चर्चा होत आहे. मुलगी मसाबाच्या जन्मावेळी नीना यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. याविषयी त्यांनी पुस्तकात लिहिलं असून त्याचा काही भाग मुलगी मसाबाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मसाबाच्या जन्माच्या वेळी नीना यांच्या बँक अकाऊंटमध्ये फक्त २००० रुपये होते, असं त्यात म्हटलंय. जर सी-सेक्शन डिलिव्हरी झाली तर त्यासाठी १० हजार रुपयांचा खर्च येणार होता. ऐनवेळी त्यांनी हा खर्च कसा उचलला याबाबतचा खुलासा त्यांनी पुस्तकात केलाय. (Masaba Gupta says Neena Gupta did not have 10000 for her C section birth shares from book Sach Kahun Toh)

मसाबाने सोशल मीडियावर या पुस्तकामधील एका पानाचा फोटो पोस्ट केला आहे. 'जेव्हा माझा जन्म होणार होता, तेव्हा आईची आर्थिक परिस्थिती फार बिकट होती. तिच्या बॅंक खात्यात फक्त 2000 रूपये होते. सुदैवाने डिलिव्हरी काही दिवस आधी टॅक्स रिइंबर्समेंटचे दहा हजार रुपये खात्यात जमा झाले आणि माझ्या डिलिव्हरीचा खर्च उचलता आला. आईकडून आणि तिने केलेल्या संघर्षातून मी खूप गोष्टी शिकले', असं तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

हेही वाचा: 'मिसेस मुख्यमंत्री'मधील सुमी 'या' अभिनेत्याला करतेय डेट?

पुस्तकामध्ये नीना यांनी डिलिव्हरीबद्दल लिहिले, 'माझ्या डिलिव्हरीची तारीख जवळ येऊ लागली होती. पण मला त्यावेळी पैशांची चिंता सतावत होती. नॉर्मल डिलिव्हरीसाठी लागणारे दोन हजार रुपये माझ्या खात्यात होते. पण जर सी-सेक्शन डिलिव्हरी झाली तर त्यासाठी अधिकचे १० हजार रुपये लागणार होते. सुदैवाने मला टैक्स रिइंबर्समेंटचे 9000 रूपये डिलिव्हरीच्या काही दिवस आधीच मिळाले होते. सिझर डिलिव्हरी करावे लागणार याची कल्पना मला आधी डॉक्टरांनी दिली होती. त्यामुळे ते पैसे मिळाल्याने माझी खूप मोठी मदत झाली. त्यावेळी माझे वडील खूप चिडले होते. त्यांना डॉक्टर आमच्याकडून जास्त पैसे घेत आहेत असे वाटत होते. अखेर 12,000 रूपये भरून माझे ऑपरेशन झाले.'

हेही वाचा: सिध्दूच्या मुलीला पाहून नेटकरी क्लिन बोल्ड

नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स यांचं रिलेशनशिप ८०च्या दशकात फार चर्चेत होतं. या दोघांनी लग्न केलं नाही. नीना यांनीच मसाबाला लहानाचं मोठं केलं. मसाबासाठी नीना आणि विवियन यांनी नेहमीच काही कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती. मसाबा हे नाव सध्या फॅशन विश्वातील फार प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठमोठ्या कलाकारांसाठी ती फॅशन डिझायनिंग करत असून 'हाऊस ऑफ मसाबा' या नावाने तिचा स्वत:चा फॅशन ब्रँडसुद्धा आहे.