स्वप्नांचा मागोवा घेणारा 'मी पण सचिन'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाईन असलेल्या 'मी पण सचिन' चित्रपटात स्वप्नील जोशी क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी 'मी पण सचिन' या चित्रपटाचं पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर झळकलं होतं. यावरुन या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकताही अनेकांना लागून राहिली होती.

आता या चित्रपटाचा टीझरही सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात स्वप्नील जोशी क्रिकेटपटूची भूमिका साकारताना दिसतोय. खेळ असो, नाहीतर आयुष्य, शेवटचा टप्पा पडल्याशिवाय कधीही हार मानायची नाही, असा प्रेरणादायी संदेश या टीझरमधून देण्यात येत आहे.

गावात राहूनही लंडनच्या लॉर्ड्स ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याचं स्वप्न उराशी बाळगून, त्या मार्गानं प्रयत्न करणाऱ्या स्वप्निलच्या आयुष्यात काही विचित्र घडामोडी घडत असल्याचं या टीझरमधून दिसत आहे. त्यामुळे स्वप्नीलचं हे स्वप्न पूर्ण होतंय, की अधुरं राहतंय, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल. 

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित 'मी पण सचिन' चित्रपट येत्या 1 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. नीता जाधव आणि गणेश गीते या चित्रपटाचे निर्माता असून श्रेयश जाधव यांनी लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इरॉस इंटरनेशनलद्वारे 'मी पण सचिन' या चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरणही केले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mi Pan Sachin Marathi Movie Teaser Launched