esakal | 'येऊ कशी..'मधील 'मोमो'च्या भूमिकेतून बाहेर येणं अवघड- मीरा जगन्नाथ
sakal

बोलून बातमी शोधा

mira jagannath

'येऊ कशी..'मधील 'मोमो'च्या भूमिकेतून बाहेर येणं अवघड- मीरा जगन्नाथ

sakal_logo
By
स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' Yeu Kashi Tashi Mi Nandayla ही मालिका आणि त्यातील सर्व व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. यातील एक लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणजे 'मोमो'. या मालिकेत ‘मोमो’ ही विनोदी भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ Mira Jagannath हिचं प्रेक्षक चाहत्यांकडून कौतुक झालं. या भूमिकेनं तिला ओळख मिळवून दिली. मोमो आणि मीरा यांच्यात काय साम्य आहे, सेटवरचा अनुभव कसा होता, अशा काही प्रश्नांची तिने मनमोकळेपणे उत्तरं दिली आहेत. (mira jagannath about her role as momo in yeu kashi tashi mi nandayla slv92)

१. मोमो ही भूमिका साकारताना तुझ्यात काय बदल करावे लागले?

- माझ्या सहकलाकारांशी बोलताना किंवा अगदी माझ्या पालकांशी बोलतानाही मी मोमो बोलते तसेच उच्चार करते. मला तसंच बोलायची सवय झाली आहे. घरी गेल्यावरही तसं बोलले, की भूमिकेतून बाहेर ये गं, असं सगळे सांगतात. ही भूमिका चाहत्यांना आवडतेय हे कळलं, की भूमिका साकारायला आणखी मजा येते. ऑडिशन दिलं तेव्हा अमेरिका रिटर्न मुलगी एवढीच तिची ओळख होती. हळूहळू ती भूमिका फुलत गेली.

२. मोमो आणि मीरामध्ये किती फरक आहे?

- मी तिच्याएवढा मेकअप कधीच करत नाही आणि तशी अजिबातच नाही, त्यामुळे ही भूमिका साकारणं हे माझ्यासाठी आव्हान होतं.

३. सहकलाकारांमध्ये तुझ्या जवळचं कोण आहे?

- मालिकेचा पहिला दिवस होता आणि माझं चित्रीकरण शुभांगी गोखले आणि अदिती सारंगधर या कसलेल्या कलाकारांसोबत होतं. भीती वाटली. त्यांनी खूप धीर देत समजून घेतलं. तिथं अदिती माझी एवढी काळजी घेत होती, की मला आईची आठवण यायची. मी तिच्याजवळ रडायचेही. तिनं खूप समजून घेतलं. तिचा सल्ला नेहमीच माझ्यासाठी मोलाचा आहे. शुभांगीताई समोर आल्यावरही मला आईची आठवण येते.

हेही वाचा: हिमाचल प्रदेशात मितालीची भटकंती; मित्रांसोबत घेतेय ट्रिपचा मनमुराद आनंद

४. त्यांच्यासोबत एखादी आठवण जी तुला प्रेक्षकांसोबत शेअर करायला आवडेल?

- घरापासून दूर असताना आम्ही हॉटेल रूममध्येच किचन तयार केलं होतं. अदितीचं चित्रीकरण सुरू असेल, तेव्हा मी जेवण तयार करायची आणि एरवी ती करायची.

५. मुंबई बाहेर शूटिंग करण्याचा अनुभव कसा होता?

- तशी मी खूप उत्साही आहे. मुंबईत गेल्या चार वर्षांपासून मी एकटी राहत आहे. चित्रीकरणासाठी बाहेरच्या राज्यात आल्यावर आम्ही बायोबबलमध्ये काम करत आहोत. घराच्या बाहेर असणं किंवा काम झाल्यावरही घरी जायचं नाही; तर रूममध्ये जायचं, हा विचारही तणावात नेणारा होता. आधी हे प्रकरण खूप त्रासदायक वाटलं. एकमेकांना धीर देत आम्ही काम करत आहोत. कुणी पालकांपासून, तर कुणी मुलाबाळांपासून दूर आहे. इथं आल्यावर चौकटीबाहेरचं आयुष्य जगणं काय असतं, हे कळतंय. आता बाहेर प्रवास करायची नितांत गरज आहे. योग, जॉगिंग आणि योग्य आहार असं गणित आम्ही सहकलाकारांनी जमवलं आहे. अदिती आणि मी दोघीही फिटनेसप्रेमी असल्यानं ते जमून जातं.

loading image