Mission Mangal Review: वैज्ञानिकांची यशोगाथा 

संतोष भिंगार्डे
Friday, 16 August 2019

"पॅडमॅन', "टॉयलेट एक प्रेमकथा', "केसरी'... अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट सध्या करताना दिसत आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत आहे. आताच त्याचा प्रदर्शित झालेला "मिशन मंगल' हा चित्रपट भारतीय वैज्ञानिकांची यशाची गाथा सांगणारा आहे.

 नवा चित्रपट : मिशन मंगल
"पॅडमॅन', "टॉयलेट एक प्रेमकथा', "केसरी'... अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट सध्या करताना दिसत आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत आहे. आताच त्याचा प्रदर्शित झालेला "मिशन मंगल' हा चित्रपट भारतीय वैज्ञानिकांची यशाची गाथा सांगणारा आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो)चे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर यांना सलाम करणारा हा चित्रपट आहे. 

24 सप्टेंबर 2014 हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक दिवस ठरला. या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानिक आणि इंजिनियर यांनी मंगळ यान मोहीम यशस्वी करून दाखविली. विशेष म्हणजे या मोहिमेत महिला वैज्ञानिकाचा मोलाचा वाटा होता. कमी बजेटमध्ये मंगळ यान मोहीम फत्ते करणे हे मोठे आव्हान होते. कारण या मोहिमेला खूप खर्च येणारा होता आणि तो आपल्याला परवडणारा नव्हता. अशा वेळी पाच महिला वैज्ञानिकांनी राकेश धवन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करून दाखविली आणि पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी करून दाखविणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला. "जीएसएलव्ही'चे प्रक्षेपण अयशस्वी ठरल्यानंतर वैज्ञानिक राकेश धवन (अक्षय कुमार) मंगळ प्रकल्प विभागात नेमणूक करण्यात येते. तेथे होम सायस्नचा अभ्यास करण्यासाठी तारा शिंदे (विद्या बालन) आलेली असते. त्यावेळी तिला मंगळ मोहिमेची कल्पना सुचते. मग या मोहिमेसाठी ते दोघे एकत्र काम करण्याचे ठरवतात. ही कल्पना इस्त्रोचे प्रमुख विक्रम गोखले यांना सांगतात आणि ही मोहीम यशस्वी करून दाखवू असे आश्‍वासनही देतात. मात्र त्यांच्या या कल्पनेला इस्त्रोमधील इतर वैज्ञानिकांचा विरोध असतो. त्यातच बजेटचा मोठा प्रश्‍न उभा राहतो. त्यामुळे ही मोहीम होईल की नाही असा मुद्दा त्यावेळी उपस्थित होतो. परंतु राकेश आणि तारा यांची जिद्द मोठी असते. त्यांचा आत्मविश्‍वास दांडगा असतो आणि ही मोहीम कोणत्याही स्थितीत यशस्वी करून दाखवायचीच असे ते दोघेही ठरवितात. मग त्याच्या मदतीला येते एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), कृतिका अग्रवाल (तापसी पन्नू), वर्षा पिल्लई (नित्या मेनन), नेहा सिद्धीकी ((कीर्ती कुल्हारी), परमेश्वर नायडू (शरमन जोशी) आणि एच. जी. दत्तात्रेय (अनंत अय्यर) या वैज्ञानिकांची टीम. मग हे सर्वच वैज्ञानिक मंगळ मोहीम कशी पार करतात.. त्यांना कोणकोणती आव्हाने येतात... त्यांना ते कसे तोंड देतात.. याचेच चित्रण या चित्रपटात आहे. 

या मोहिमेत महिला वैज्ञानिकांनी मोठी कामगिरी केली आहे. जगन शक्तीने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे आणि तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरला आहे. यापूर्वी त्याने की ऍण्ड का, इंग्लिश विग्लिश, शमिताभ आदी चित्रपटांसाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आणि स्वतः दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना चांगल्या विषयाला हात घातला व तो पडद्यावर सहज-सोप्या पद्धतीने मांडला त्याबद्दल त्याचे कौतुक. विशेष म्हणजे पटकथा व संवाद लेखक आर. बाल्की यांनी हा विषय सोप्या भाषेत मांडला. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी अशा सगळ्याच कलाकारांची कामगिरी उत्तम. परंतु अधिक कौतुक करावे लागेल ते विद्या बालनचे. तिने साकारलेली ताराची भूमिका ठाशीव आणि उठावदार झाली आहे. इस्रोमध्ये काम करीत असताना एक गृहिणी म्हणून तिची होणारी धावपळ छान टिपण्यात आली आहे. चित्रपटाला संगीत अमित त्रिवेदीचे आहे. परंतु ते फारसे पचनी पडणारे आहे असे वाटत नाही. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी झकास झाली आहे. काही काही दृश्‍यांमध्ये सिनेमॅटोग्राफर्सचे कौशल्य वैशिष्ट्यपूर्ण वाटते. हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून पाहावा असाच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mission Mangal Reviews