VIDEO: सौभाग्याची मंगलघटिका! पाहा सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाचा व्हिडीओ

स्वाती वेमूल
Monday, 1 February 2021

सिद्धार्थ-मितालीच्या लग्नाची धमाल आणि मितालीची साश्रू नयनांनी पाठवणी, लग्नातील लक्षवेधी क्षणांचा व्हिडीओ

मुंबई: लग्नसोहळा.. हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. एकीकडे वधू आणि वर आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करत असतात तर दुसरीकडे वधू-वराच्या कुटुंबीयांची लगबग सुरू असते. हळद, मेहंदी, संगीत या कार्यक्रमांमध्ये मनसोक्त नाचलेले वधूचे आई-वडील आणि नातेवाईक यांच्या डोळ्यांत लेकीची पाठवणी करताना पाणी आवर्जून येतं. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नातील हेच अविस्मरणीय क्षण व्हिडीओच्या स्वरुपात चाहत्यांसोबत शेअर करण्यात आले आहेत. 

24 जानेवारी रोजी सिद्धार्थ-मितालीने लग्नगाठ बांधली आणि याच लग्नसोहळ्याचा व्हिडीओ मितालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. 'सौभाग्याची मंगलघटिका, लग्न होऊन आठवडा झाला आणि या सोहळ्याचे काही क्षण तुमच्यासोबत शेअर करतेय,' असं म्हणत मितालीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. लग्नापूर्वीची लगबग, संगीत कार्यक्रमातील धमाल, भावूक झालेले मितालीचे आई-वडील आणि लग्नाची मंगलघटिका, अशा क्षणांची झलक या व्हिडीओत पाहायला मिळतेय. 

सिद्धार्थ-मितालीचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला. या विवाहसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. लग्नापूर्वी काही वर्षांपासून सिद्धार्थ आणि मिताली एकमेकांना डेट करत होते. दोन वर्षांपूर्वी सिद्धार्थने मितालीला लग्नासाठी प्रपोज केलं आणि तेव्हापासून ही जोडी सोशल मीडियावर चर्चेत आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mitali mayekar siddharth chandekar shared her wedding glimpse watch a video


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mitali mayekar siddharth chandekar shared her wedding glimpse watch a video