esakal | राजू सापते आत्महत्या प्रकरण: 'युनियनचे सर्व सभासद सामूहिक राजीनामे देणार'
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Sapte

राजू सापते आत्महत्या प्रकरण: 'युनियनचे सर्व सभासद सामूहिक राजीनामे देणार'

sakal_logo
By
स्वाती वेमूल

मराठीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येने कलाविश्वात खळबळ माजली आहे. आत्महत्येपूर्वी राजू यांनी एका व्हिडीओद्वारे युनियन पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी एकाला अटक झाली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कलाक्षेत्रातील अनेकांनी त्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी सिनेसृष्टीतील काही मान्यवरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यामध्ये महेश मांजरेकर, पुष्कर श्रोत्री, कांचन अधिकारी, अतुल परचुरे इत्यादी कलाकारांचा समावेश आहे.

"कलाकारांनी राजसाहेबांची भेट घेतली. त्यानंतर आता संबंधित युनियनचे सर्व सभासद सामूहिक राजीनामा देणार आहेत. लवकरच होमकुंड करू. त्या होमकुंडात त्या युनियनचे सर्व सभासद स्वत:चे कार्ड जाळून टाकणार आहे. त्यानंतर लवकरच नव्या संघटनेची स्थापना होईल. ही संघटना राजकीय नसेल. यात महाराष्ट्रात काम करणाऱ्या सर्व भाषिकांचा समावेश असेल. या संघटनेत आम्ही सर्वांचा समावेश करून घेऊ. सर्वांना काम मिळेल आणि सर्वांचं काम सुरळीत होईल. यापुढे कोणीही दादागिरी करणार नाही", अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली.

हेही वाचा: 'यापुढे सेटवर येऊन त्रास दिला तर..'; राजू सापतेंच्या आत्महत्येनंतर मनसे आक्रमक

राजू सापते यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडिओत लेबर युनियनचे पदाधिकारी राकेश मौर्या आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी मनसेकडून 'यापुढे कोणत्याही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे', अशी भूमिका मांडण्यात आली होती. 'उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन शूटिंग बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधावा', असं अमेय खोपकर म्हणाले होते.

loading image