अंत पाहणारी कंटाळवाणी शर्यत (नवा चित्रपट - रेस 3)

महेश बर्दापूरकर 
रविवार, 17 जून 2018

सलमानही नेहमीच्या सफाईनं त्याच्या चाहत्यांना अपेक्षित गोष्टी पूर्ण करीत राहतो. अनिल कपूर कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत छान काम करतात. त्यांचा वाट्याला इतर भागांप्रमाणं विनोदी भूमिका न आल्यानं थोडी निराशाही होते.

"रेस' मालिकेतील तिसरा भाग पुन्हा एकदा कुटुंबामधील कलह आणि कुरघोडीचीच गोष्ट सांगतो. यंदाच्या भागात सलमान खानची भूमिका आणि रेमो डिसूझा या नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री, हे वेगळेपण आहे. मात्र, नेत्रदीपक लोकेशन्स, महागड्या कार, अकल्पित हाणामाऱ्या, गाणी आणि अपेक्षित ट्विस्ट यांच्या पुढं हा चित्रपट जात नाही. कथेमध्ये थोडाही दम नसल्यानं चित्रपट खिळवून ठेवत नाही, मात्र सलमान आणि टिमच्या ऍक्‍शनमधून केवळ वरवरचं मनोरंजन करीत राहतो. 

"रेस 3'ची कथा परदेशातील कुठल्याशा लोकेशनवर सुरू होते. समशेर सिंग (अनिल कपूर) आणि त्याचा सावत्र मुलगा सिकंदर (सलमान खान) यांची ही गोष्ट. समशेरची दोन (सख्खी) मुलं सूरज (शाकिब सलीम) आणि संजना (डेझी शहा) यांच्या मनात सिकंदरबद्दल आकस आहे. यश (बॉबी देओल) सलमानला मदत करतो, मात्र जेसिकाचा (जॅकलिन फर्नांडिस) प्रवेश होताच गणितं बदलतात. कुटुंबातील वाद चव्हाट्यावर येतात.

समशेरचा अवैध हत्यारांचा व्यवहार तेजीत असतानाच राजकारण्यांना ब्लॅकमेल करता येईल अशी सीडी त्यांच्या हातात लागते. ही सीडी हस्तगत करण्याचं काम सिकंदरवर सोपवलं जातं, मात्र त्याला आपल्या कामाबरोबरच कुटुंबातील कलहाशीही लढावं लागतं. 
या मालिकेतील पहिले भाग पाहिलेल्यांना त्यातील ट्विस्ट कुठं आणि कसे असतात याचा चांगला अंदाज आहे. या कथेतही तसंच होत राहतं. कोणताही ट्विस्ट प्रेक्षकांना आश्‍चर्यचकित करत नाही. 

चित्रपट अधिक ग्लॅमरस, स्टायलिश आणि वेगवान होण्यासाठी दिग्दर्शक कसब पणाला लावतो, मात्र कथेकडं पूर्ण दुर्लक्ष झाल्यानं प्रेक्षक ही "रेस' कधी एकदा संपते याचीच वाट पाहतो. "फास्ट ऍण्ड फ्युरिअस' मालिकेतील चित्रपटांप्रमाणं महागड्या गाड्या, त्यांचे स्टंट आणि नायकाचं "फॅमिली फर्स्ट' हे पालुपद इथंही वापरलं गेलं आहे. मात्र, त्याचा पुरेसा प्रभाव पडत नाही. सलमानच्या तोंडचे संवाद टाळ्या आणि शिट्ट्या घेऊन जातात, मात्र इतर पात्रं खूपच फिके पडतात. सलमान आणि बॉबी देओलचं (शर्ट काढून केलेलं) द्वंद्व प्रेक्षकांना खूष करतं. जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शहा यांच्यामध्ये असंच द्वंद्व घडवून आणत दिग्दर्शक समतोल साधतो.

मात्र, सलमानला एक गाणं दिल्यावर बॉबीलाही देऊन आणखी समतोल साधण्याचा प्रयत्न हास्यास्पद ठरतो. शेवटही खूपच अपेक्षित व चौथ्या भागाची (धमकीवजा) सूचना देणाराही आहे. त्यात सगळं काही झाल्यावर, "तुम्हाला हे कसं सुचलं,' असा तोंडाचा चंबू करून विचारणारी पात्रं आणि त्याला नायकानं, "मुझे ये दस साल पहलेही पता था,' असं म्हणत सगळी हवा काढून घेणं, हा प्रकारही आहेच... हा चित्रपट केवळ सलमानच्या चाहत्यांसाठीच आहे. त्याच्या एन्ट्रीला, संवादांना, हाणामाऱ्यांना, गाण्याला टाळ्या व शिट्यांच्या गजरात साजरं करणारे चाहते प्रेक्षागृहात असतातच. 

सलमानही नेहमीच्या सफाईनं त्याच्या चाहत्यांना अपेक्षित गोष्टी पूर्ण करीत राहतो. अनिल कपूर कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेत छान काम करतात. त्यांचा वाट्याला इतर भागांप्रमाणं विनोदी भूमिका न आल्यानं थोडी निराशाही होते. बॉबी देओल अक्षय खन्नाची जागा व्यवस्थित सांभाळतो, इतकंच. जॅकलिनच्या वाट्याला अतिग्लॅमरस आणि भावखाऊ भूमिका आली आहे आणि तिनं ती मनापासून केली आहे. इतर कलाकारांना फारशी संधी नाही. सलीम-सुलेमानचं संगीत फारसं श्रवणीय नाही. "अल्ला दुहाही है,' हे रिमिक्‍स त्यातल्या त्यात लक्षात राहतं. 
एकंदरीतच, "कधी संपणार?' असाच घोर लावणारी ही रेस सलमानचे चाहते असल्यासच पाहा. 

निर्माता ः सलमान खान 
दिग्दर्शक ः रेमो डिसूझा 
भूमिका ः सलमान खान, जॅकलिन फर्नांडिस, अनिल कपूर, डेझी शहा, बॉबी देओल आदी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Movie Race 3 Movie Review