रिव्ह्यु: पुरुषीपणाला सणसणीत उत्तर "गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल"

टीम ई सकाळ
Monday, 10 August 2020

वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गुंजनला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. विशेषतः पुरुषी वर्चस्वाचा तिला करावा लागणारा सामना याचे प्रभावी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.

मुंबई- 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' हा चित्रपट एका दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या भारतातील पहिल्या महिला फ्लाईट लेफ्टनंटची गोष्ट आहे. हा चित्रपट म्हणजे गुंजनच्या (जान्हवी कपूर) अथक संघर्षाची, जिद्दीची कथा आहे. जो तुम्हाला नक्किच भारावून टाकेल. असं कुठलं क्षेत्र नाही जे महिलांनी काबीज केले नाही. वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या गुंजनला वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते. विशेषतः पुरुषी वर्चस्वाचा तिला करावा लागणारा सामना याचे प्रभावी चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे. गुंजनला विमानात ट्रेनिंग देण्यासाठी बरोबर नेलं तर ती रडेल, घाबरली तर काय करायचं? असा प्रश्न बरोबरच्या अधिकाऱ्यांना पडत असे. 'टिपिकल मेन्स मेंटलिटी' यावर गुंजनने मार्ग शोधला होता. तो काय होता यासाठी 'गुंजन द कारगिल गर्ल'च्या वाटेला जावे लागेल. 

हे ही वाचा: सुशांतचे कुटुंबिय संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा    

गुंजनचा प्रवास हा सोपा नाही. तो खडतर वाटेने, संकटांनी भरलेला आहे. सतत येणाऱ्या अडचणींना खंबीरपणे तोंड देण्याची ताकद गुंजनमध्ये आहे. त्याच्या आड येणाऱ्याना सडेतोडपणे सुनावण्यास गुंजन मागेपुढे पाहत नाही. प्रथम महिला आयएएफ अधिकारी कशी झाली ? त्याचा धगधगता संघर्ष आता पडद्यावर रसिकांना पाहता येणार आहे. फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येत्या 12 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मुख्य भूमिकेत असलेल्या जान्हवी कपूरसाठी हा चित्रपट किती "लकी" ठरणार याबाबत उत्सुकता आहे. रियल लाईफ स्टोरी 'रील' लाईफच्या माध्यमातून रसिकांसमोर येणार आहे. यानिमित्ताने एक आगळीवेगळी ध्येयगाथा आणि प्रेमकथा रसिकांना पाहता येणार आहे.

यापूर्वी बॉलिवूडमध्ये इन्ट्री केल्यानंतर 'सूर' सापडण्यासाठी धडपडत असलेल्या जान्हवीच्या करिअरची फ्लाईट टेक ऑफ होणार का ? याबद्दल तिच्या चाहत्यांना वेध लागले आहे. जान्हवीचा 'धडक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटल्याने तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलला सामोरे जावे लागले होते. 'धडक' मधून तिने हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. जान्हवी बरोबर पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांच्या प्रभावी अभिनयाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. शरण शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून गुंजन शर्मा यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचा शोध चित्रपटातून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. 

१९९९ च्या कारगिल मधील एका दृश्यापासून हा चित्रपट सुरू होतो. दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवून देखील पुढे बारावी पर्यंतच्या पदविका पदवीपर्यंतची किमान पात्रता पात्रता आवश्यक असतानाही गुंजनला हवाई दलात प्रवेश मिळत नाही. आर्थिक अडचण मोठा अडसर ठरते. वैमानिक होण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये भरण्याची क्षमता नसताना काही करून आपल्याला वैमानिक व्हायचेच ही गुंजन इच्छा तिला स्वस्थ बसू देत नाही. प्रवेश मिळाला तरी प्रशिक्षण संस्थेत असणाऱ्या 'पुरुषीपणाला' तिला टक्कर द्यावी लागते. 'लैगिंक' अत्याचाराचा अनुभवही तिला घ्यावा लागला. हे सगळं तिनं सोसलं, भोगलं आणि सहनही केलं. लैंगिकतेचे बरेचसे संदर्भ चित्रपटात येत राहतात. वेगवेगळ्या प्रसंगानुरूप त्याचे अर्थ बदलतात. हे समजून घेण्यासाठी जाणकार प्रेक्षक, रसिक यांनी चित्रपट जरूर पहावा. 

पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी यांचा अभिनय सुंदर झाला आहे. जान्हवीचा पडद्यावरील वावर सहज वाटतो. एखाद्या पुरुषाला त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जितका संघर्ष करावा लागतो त्यापेक्षा अधिक स्त्रीला करावा लागतो. कामाच्या ठिकाणी मुकाट्याने सहन करावा लागणारा लैंगिक छळ याविषयी कुणाकडे तक्रार करायची ? यात वरिष्ठ अधिकारी, शिकवणारे शिक्षक, मित्र असतील तर काय बोलणार ? यासगळ्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य या चित्रपटात करण्यात आले आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद तर लहानपणापासून सुरू होतो. मुलीला वेगळी खेळणी, मुलाला वेगळी, त्याने पायलट व्हावे तर मुलीने छान स्वयंपाक करावा. याचे शिक्षण घरातून होते. या भेदावर टिप्पणी करणारे विविध प्रसंग चित्रपटात आहेत. जे विषयाचे गांभीर्य कमी होऊ देत नाहीत.

संकलन- दिपाली राणे-म्हात्रे

movie review gunjan saxena the kargil girl review janhvi kapoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: movie review gunjan saxena the kargil girl review janhvi kapoor