
Jug Jugg Jeeyo Movie News: कौटुंबिक नातेसंबंध, नात्या-नात्यामधील मतभेद, लग्नसोहळे, त्यानंतर होणारी गडबड आणि गोंधळ, त्यातून उद््भवणारे वादविवाद वगैरे वगैरे कथानक असलेले चित्रपट आतापर्यंत आलेले आहेत. मात्र दिग्दर्शक राज मेहताने हल्लीच्या काळात वाढत चाललेल्या घटस्फोट प्रकरणांवर हसत-खेळत भाष्य केले आहे. ते करताना कुटुंब किती महत्त्वाचे आहे हेही (Bollywood Movie News) सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे कित्येक नात्यांमध्ये दुरावा येत चाललेला आहे. काहींची अॅरेंज मॅरेज तर काहींची लव्ह मॅरेज होत आहेत. त्यातील काहींचे संसार वर्षानुवर्षे आनंदाने बहरत आहेत तर काहींच्या नात्यांमध्ये काही कारणास्तव दुरावा येत चाललेला आहे. अशा दुरावा आणि अविश्वासाच्या नात्याचा शेवट घटस्फोटामध्ये होत आहे. दिग्दर्शक राज मेहता (Director Raj Mehta) यांनी अशाच घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या जोडप्यांना या चित्रपटाद्वारे चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. या चित्रपटाची कथा हसत-खेळत, नाट्यमय तसेच भावनिक वळणाने जाणारी आहे.
कॅनडात बाऊन्सर म्हणून काम करणारा कुकू (वरुण धवन) आणि एचआर (Anil Kapoor) विभागात मोठ्या पदावर काम करणारी नैना (कियारा अडवानी) यांचे लग्न झालेले असते. खरं तर ते दोघे आयडाॅल लव्हबर्डस असतात. शाळेत असताना त्यांचे प्रेम बहरलेले असते. मोठे झाल्यानंतर ते दोघे लग्नाच्या बंधनात (Kiara Adwani) अडकतात. परंतु लग्नाला पाचेक वर्ष होत नाहीत तोच ते वेगळे होण्याचा निर्णय घेतात. आता आपला हा कठोर निर्णय आपल्या कुटुंबीयांना सांगण्यासाठी ते पंजाबमधील पतियाळा येथील आपल्या गावी येतात. तेथे कुकूची बहीण गिन्नी (प्राजक्ता माळी) हिचे लग्न होणार असते. त्यामुळे आपला हा निर्णय गिन्नीचे लग्न होईपर्यंत कुणाला सांगायचा नाही, असे ते ठरवितात. तरीही एके दिवशी कुकू आपले वडील भीम (अनिल कपूर) यांना आपला निर्णय सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्यावेळी त्याला जे कळते त्याने तो चक्रावून जातो. त्याचे वडील भीम आणि आई गीता (नीतू कपूर) यांच्या लग्नाला पस्तीस वर्षे झालेली असतात.
आतापर्यंत गुण्यागोविंदाने चाललेल्या संसारातून वेगळे होण्याचा निर्णय त्याचे वडील घेणार असतात. आपला हा निर्णय ते कुकूला सांगतात. त्यामुळे कुकू भलताच गोंधळून जातो आणि गडबडतो. त्यातच त्याला नैनाचा भाऊ गुरप्रीत (मनीष पाॅल) एक कल्पना सांगतो. ती कल्पना राबविण्याचा निर्णय कुकू घेतो. त्यातच गिन्नीचे प्रेम दुसऱ्याच एका मुलावर असते. त्यानंतर कशा आणि कोणत्या नाट्यमय घडामोडी घडतात याकरिता हा चित्रपट पाहावा लागेल. चित्रपटाचे नेटके दिग्दर्शन, कलाकारांचा लाजबाब अभिनय, चित्रपटाचे संगीत आणि संवाद या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत.
या चित्रपटामध्ये नात्यातील दुरावा, पत्नी अधिक कमावते म्हणून नवऱ्याचा दुखावला जाणारा अहंकार, लग्नानंतर आई होण्याचे दडपण, लग्नानंतर सगळे काही ठीकठाक होईल असा विचार वगैरे सगळ्याच मुद्द्य़ावर दिग्दर्शकाने हसत-खेळत भाष्य केले आहे. अलीकडच्या काळात पती व पत्नी दोघेही कमावते झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कमाईवरून एकमेकांचा दुखावला जाणारा अहंभाव. त्यांच्यातील अहंकारी वृत्ती, एकमेकांतील रुसवे-फुसवे व हेवेदावे, त्यातूनच निर्माण होणारे अविश्वासाचे वातावरण आणि त्याचा शेवट घटस्फोटापर्यंत...दिग्दर्शकाने सगळेच मुद्दे रंजकतेने मांडलेले आहेत. विनोदी शैलीत हे मुद्दे मांडताना त्याने घटस्फोट घेणाऱ्यांचे चांगलेच कान उघडलेले आहेत. आपले कुटुंब किती आणि कसे महत्त्वाचे हे उत्तमरीत्या पटवून दिले आहे.
अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवानी, मनीष पॉल, प्राजक्ता माळी, टिस्का चोप्रा या सगळ्याच कलाकारांची कामगिरी नेत्रदीपक झाली आहे. वडील आणि मुलाच्या भूमिकेतील अनिल कपूर आणि वरुण धवन यांनी कमाल केली आहे. त्यांचे पडद्यावरील पिता-पुत्राचे बाँडिंग अफलातून आहे. त्यांच्या संवादातून चांगलीच करमणूक होते. वरुण व कियारा यांची पडद्यावरील केमिस्ट्री छान जुळलेली आहे. काही सीन्समध्ये वरुण भाव खाऊन गेला आहे. त्याच्या भूमिकेला विविध शेड्स आहेत. कधी भावनिक आणि कधी उत्साही असा कुकू त्याने छान रंगविला आहे. मनीष पॉलची भूमिका लक्षात राहणारी अशीच आहे. त्याचा कॉमेडीचा अंदाज छान आहे.
चित्रपटातील काही संवाद विनोद निर्माण करणारे आहेत. नच पंजाबन हे गाणे लोकप्रिय झालेले आहे. त्याचबरोबर दुपट्टा, रंगी सारी ही गाणी प्रेक्षणीय आहेत. चित्रपटातील वेशभूषा आणि सेट््स भव्य आहेत. मात्र चित्रपटाची लांबी ही काहीशी खटकणारी बाब आहे. चित्रपटाची सुरुवात छान होते. परंतु कथानक म्हणावे तसे वेगाने पुढे सरकत नाही. एक कौटुंबिक तसेच नाट्यमय वळणाने जाणारा, विनोदाची पेरणी करणारा भावनिक असा हा चित्रपट आहे.
चित्रपट - जुग जुग जिओ
दिग्दर्शक - राज मेहता
कलाकार - अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा अडवाणी
रेटिंग -तीन स्टार