
पत्नी रुक्मिणी भरतलालला शांत बसु देत नाही. बॅकेकडे जाऊन त्याला कर्ज काढायला सांगते. भरतलाल बॅकेत जातो. आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळाच आकार प्राप्त होतो.
मुंबई - थोडी नव्हे तर तब्बल बारा वर्षे झाली भरतलाल आपण जिवंत आहे असं सगळ्या व्यवस्थेला सांगतो आहे. गावानं तर त्याची टर उडावायला सुरुवात केली पण घरातले सुध्दा काही शांत बसले नाहीत. मात्र काही झालं तरी आपण कागदोपत्री जिवंत आहोत हे सांगण्यासाठीचा त्याचा संघर्ष सर्वसामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यासाठी एकदा का होईना हा चित्रपट पाहणे गरजेचे आहे.
थोडा वेगळा विचार करुन पाहिल्यास असे जाणवेल की, कागद हा निर्जीव आहे. मात्र त्याच्याशिवाय कुणाचं पान हलत नाही. त्याच्या एवढं किंमती दुसरं काही नाही. कुणाला आनंदाची बातमी द्यायची तर कागद, सरकारी काम कागदाशिवाय बात नाही. नात्यातील वेगवेगळ्या बदलांना नवा अर्थ देण्याचं कामही कागदच करतो. भरतलाल आपला साधा भोळा माणूस. कुणाच्या लग्नात वाजंत्री म्हणून काम करावं. त्यात जे दोन पैसे मिळतील त्याच्यावर समाधान मानुन खुश व्हावं. आनंदी राहून संसार करावा ही त्याची धारणा. पण त्याची पत्नी रुक्मिणी त्याला शांत बसु देत नाही. बॅकेकडे जाऊन त्याला कर्ज काढायला सांगते. भरतलाल बॅकेत जातो. आणि त्याच्या आयुष्याला एक वेगळाच आकार प्राप्त होतो.
बँकेत जे काही होते त्यानं भरतलाल पुरता हतबल होऊन जातो. आपल्या नावासाठी एका तलाठ्याकडे गेल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला कागदोपत्री कधीच मारले आहे. त्यामुळे आता भरतलालच्या जगण्याचे एकच लक्ष्य बनले आहे ते म्हणजे कागदावर आपण जिवंत असल्याचे सिध्द करणे. हे सारा प्रवास कागज नावाच्या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. 1 तास 49 मिनिटांचा हा चित्रपट कुठेही बोअर होत नाही. विनोदाची पेरणी करत मुळ विषयापासून न भरकटता आपल्या अंतिम स्थळावर तो येतो. भरतलालच्या भूमिकेत असणा-या पंकज त्रिपाठीनं कमालीचा सुंदर अभिनय केला आहे. त्यानं ज्यापध्दतीनं भरतलाल साकारला आहे त्याला तोड नाही. अख्खा चित्रपट पंकज त्रिपाठीनं आपल्या अभिनयानं तोलून धरला आहे.
भरतलालची कथा ही वास्तव जीवनावर आधारित कथा आहे. हे सुरुवातीलाच दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या आवाजात सांगण्यात येते. संपत्तेची हाव भल्याभल्यांची बुध्दी भ्रष्ट करते. तिथे सर्वसामान्य माणसांची ती काय गोष्ट. व्यवस्थेनं भरतलालच्या जगण्याची क्रुर थट्टा केली आहे. त्याला आता त्याच्या हक्कासाठी लढा द्यायचा आहे. 7 जानेवारीला झी 5 वर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता सलमान खान याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेली कथा ही वास्तवात उत्तर प्रदेशातील आजमगढ जिल्ह्यात राहणा-या गावात घडून गेली आहे. विनोदाच्या माध्यमातून सध्याच्या व्यवस्थेवर करण्यात आलेलं मार्मिक भाष्य डोळ्यात अंजन घालणारे आहे.
कंगणाचा कळस ; थेट टि्वटरवरच टीका म्हणाली, 'तुम्ही चीनचे गुलाम '
एकदा तरी हा चित्रपट पाहावा असा आहे. त्याची पटकथा आणि संवाद इम्तियाज हुसैन यांनी लिहिली आहे. संवाद ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. देशातील त्यावेळचा आणीबाणीचा काळ, पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी घेतलेली शपथ, देशात होत चाललेला सामाजिक, सांस्कृतिक विकास अशा वेगवेगळ्या टप्प्यांचा संदर्भ चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतो.