Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhamaka movie
Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

Movie Review; प्रेक्षकांच्या भावनेचा बाजार मांडणाऱ्या चॅनेलचा 'धमाका'

नमस्कार मी अर्जुन पाठक भरोसा न्युज चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मी जे काही सांगेल ते खरंच सांगेल. अशी टॅग लाईन घेऊन अर्जुन (कार्तिक आर्यन) न्युज चॅनेलमध्ये काम करतो. काही कारणास्तव त्याच्याकडून प्राईम टाईमचं बुलेटिन काढून घेण्यात येतं. त्यामुळे आता त्याला रे़डिओ जॉकीचे काम दिले आहे. त्याचा त्याला राग आहे. आपल्यासारख्या अनुभवी अँकरला अशाप्रकारची वागणूक देणं त्याला पसंत नाही. नेहमीप्रमाणे त्या दिवसाची सुरुवात आपल्या ठरलेल्या कार्यक्रमानं करतो. तो दिवस आणि तो कॉल त्याच्या आयुष्यात मोठा धमाका करणार असतात. हे त्याला त्यावेळी माहिती नसतं.

अर्जुनची पत्नी ही देखील सौम्या (मृणाल ठाकूर) त्याच चॅनेलमध्ये रिपोर्टरच्या भूमिकेत आहे. अर्जुनला रघुबीर नावाच्या एका व्यक्तीचा फोन येतो. त्यामध्ये तो मी आता सी लिंक पूल उडवणार आहे अशी भाषा करु लागतो. सुरुवातीला अर्जुनला हा प्रँक कॉल वाटतो. त्याचा त्यावर काही विश्वास बसत नाही. मात्र खरोखरीच जेव्हा तो पूल उद्धवस्त होतो त्यावेळी तो सुन्न होऊन जातो. आपल्या हाती ब्रेकिंग न्युज लागली आहे. त्याचा वापर करुन आपली गेलेली प्राईम टाईमची सीट आपण पुन्हा मिळवू शकतो असा विचार करुन बॉसला फोनवरुन त्याची माहिती देतो. तिकडून परवानगी आल्यावर धमाका वेगळ्या पद्धतीनं आपल्यासमोर येऊ लागतो.

माध्यमं आणि त्यांचा प्रभाव हे आता प्रेक्षकांच्या दृष्टीनं काही नवीन राहिलेलं नाही. ते जे काही आपल्यापुढे 24 बाय 7 सादर करत असतात त्याचा कशारितीनं प्रेक्षकांवर परिणाम होतो यावर वेगवेगळी संशोधनं प्रसिद्ध झाली आहेत. टीआरपीच्या नावाखाली अनेकदा सर्वसामान्य प्रेक्षकांच्या भावनांशी जेव्हा खेळ सुरु होतो तेव्हा त्यातून कशाप्रकारच्या प्रतिक्रिया बाहेर येतात हेही आपल्यापैकी अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. साधारण आठवडाभरापूर्वी अभिनेता कार्तिक आर्यनचा प्रदर्शित झालेला धमाका टीव्ही माध्यमाबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करतो. आणि आपल्याला येणाऱ्या काळात माध्यमं आणखी किती प्रभावीपणे आपलं काम करणार आहेत याविषयी सजगही करतो. काहीवेळा अतिशय नाटकी वाटणारा धमाका आपल्याला माध्यमांच्या बदलत्या स्वरुपाविषयी विचार करण्यास प्रवृत्त करतो एवढं मात्र नक्की.

आम्ही तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. तुम्ही जे सांगता ते ऐकतो. असं रघुबीर अर्जुनला सतत ऐकवतो. त्या मंत्री महोदयांना काही करुन माझ्यासमोर घेऊन या. आणि माझी माफी मागायला सांगा. असा रघुबीरचा आग्रह अर्जुन पूर्ण करतो का, तसं न केल्यानं त्याला कुठल्या परिणामाला सामोरं जावं लागतं हे जाणून घेण्यासाठी धमाका पाहावा लागेल. चित्रपटामध्ये वेग आहे. कथानक काही वेळ प्रेक्षकाला खिळवूनही ठेवतं. मात्र एकच लोकेशन ते म्हणजे न्युज स्टूडिओ त्यामुळे एक तास चाळीस मिनिटांच्या या चित्रपटातून काही वेळानं रटाळपणा जाणवायला लागतो. अतिनाट्यमय प्रसंगांना प्रेक्षकांना सामोरं जावं लागतं. अशावेळी धमाका पाहणं नकोसा वाटायला लागतो. मात्र रघुबीर नावाच्या पात्रानं तो सिनेमा काही वेळ पाहण्यास प्रवृत्त केलं आहे. तो कोण आहे...त्याला काय हवे आहे...त्याच्या अटी काय आहे...याची उत्तर धमाकामध्ये मिळतील.

दिग्दर्शक राम माधवानी यांनी कार्तिक आर्यनला धमाकामधून मोठा ब्रेक दिला आहे. असं म्हणायला हरकत नाही. गेल्या काही काळापासून त्याच्या वाट्याला सोलो मुव्ही असा नव्हताच. त्यामुळे त्यानं जितका चांगला प्रयत्न करता येईल तो या चित्रपटामध्ये केला आहे. मराठी अभिनेत्री अमृता सुभाषनंही आपल्या भूमिकेतून लक्ष वेधून घेतलं आहे. मृणाल ठाकुरला फारसा वाव नाही. ती एका न्युज अँकरच्या भूमिकेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या धमाका चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना काही प्रमाणात भावला होता. त्या तुलनेत चित्रपट तितका प्रभावी नाही. मात्र असं असलं तरी न्युज चॅनेल ज्यापद्धतीनं प्रेक्षकांना भुलवतात त्यामागील त्यांचे अर्थकारण यावर चित्रपटामध्ये थेट भाष्य करण्यात आले आहे.

तुम्ही जे पाहता ते सगळेच सत्य असते असे नाही. काहीवेळा त्याची मोडतोड करावी लागते. हे न्युज अँकरच सांगतो. न्युज आणि सत्यता यांच्यातील भेद धमाकातून आपल्यासमोर येतो. मात्र त्याचा प्रभाव फारकाळ टिकाव धरणारा नाही. हे सांगावं लागेल. बाकी गोष्टींच्याबाबत बोलायचे झाल्यास चित्रपटात प्रभावी संवाद नाही गाणी नाहीत. जे आहे ते सगळं जेमतेम आहे. असं म्हणावं लागेल..

रेटिंग - **1/2

loading image
go to top