
Satara : "राज्यकर्ते विलासकाकांसारखे का वागत नाहीत ?" ; मकरंद अनासपुरेंची खंत
कऱ्हाड - विलासकाकांनी पाण्यासंदर्भात केलेले काम मी पाहिले. देशातील पहिला नदीजोड प्रकल्प काकांनी साकारला. माणुस जन्माला का आला ? याचा शोध तो आयुष्यभर घेतो. काही मोजकीच माणसे असतात ते त्यांचे काम करुन जातात आणि नाव मागे ठेवतात.
त्यात काकांचे नाव घ्यावेच लागेल. ज्या परिसरात फक्त कुसळे उगवायची त्यांच्या कल्याणासाठी राजकीय कारकिर्द अविरतपणे वापरणाऱ्या विलासकाकांसारखे राज्यकर्ते जेथे आहे, त्या परिसराचे सोनं झाले आहे.
सर्वच राज्यकर्ते विलास काकांसारखे का वागत नाहीत ? हा प्रश्न पडतो अशी खंत प्रसिध्द अभिनेते आणि नाम फाऊंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केली. \
उंडाळे (जि.सातारा) येथील स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर स्मारक समितीच्यावतीने स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या ४९ व्या स्मृतीदिनी आज यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अनासपुरे यांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्याप्रसंगी ते बोलत होते. समितीचे विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा.गणपतराव कणसे, अॅड. विजयसिंह पाटील आदी उपस्थित होते. पुरस्काराची ५१ हजारांची रक्कम नाम फाऊंडेशनला देत असल्याचे जाहीर करुन श्री. अनासपुरे म्हणाले, विलासकाकांनी उंडाळे भागात केलेल्या पाण्यासंदर्भातील कामे मी पाहिली.
राजकीय नेते असे का वागत नाही हा प्रश्नच आहे. उंडाळकरांच्या तीन पिढ्या कार्यरत आहेत. यापुढेही त्यांच्याकडून ही सेवा घडावी. दादा उंडाळकर यांच्या नावाने दिलेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून तो मला घडवणाऱ्या, मला ज्यांनी उभे केले त्या सर्वांचा आहे.
ज्या भागातून आपण आलो आहोत, त्यांची वेदना वाढत चालली आहे, त्या जाणीवेतुन नाम फाऊंडेशनची स्थापना केली. त्याला आता चळवळीचे रुप आले आहे. अनेकांची दुःख दूर करण्यासाठी आम्ही काम सुरु करुन अनेकांना मदत करत आहोत. त्या कामाचा मोठा आनंद आहे.
खासदार पाटील म्हणाले, विलासकाकांनी या भागात मोठे काम केले. मकरंद अनासपुरे यांनीही नामच्या माध्यमातुन नाना पाटेकरांच्या सहकार्याने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना, त्यांच्या विधवा पत्नींना दिलासा दिला आहे.
त्यांचे हे काम अविरत पुढे सुरु रहावे. त्यांना माझ्या हातुन पुरस्कार प्रदान करता आला याचा मला अभिमान आहे. अॅड. उदयसिंह पाटील यांनी प्रास्तविक केले. प्रा. कणसे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. थोरात यांनी सूत्रसंचालन केले. महादेव ठाकर यांनी आभार मानले.