'मिसेस श्रीलंका' स्पर्धेच्या मंचावर हंगामा; हिसकावलं विजेतीचं मुकूट

स्वाती वेमूल
Thursday, 8 April 2021

या कार्यक्रमाचं टीव्हीवर थेट प्रसारण केलं जात होतं.

नुकत्याच पार पडलेल्या 'मिसेस श्रीलंका' या सौंदर्यस्पर्धेत प्रेक्षकांना एक अजबच प्रकार पाहायला मिळाला. पुष्पिका डीसिल्व्हाने या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावलं खरं, पण त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आलं. सौंदर्यस्पर्धेच्या मंचावर सर्व प्रेक्षक आणि परीक्षकांसमोर हा प्रकार घडला. २०१९ मध्ये मिसेस श्रीलंकेचं विजेतेपद पटकावणाऱ्या कॅरोलिन ज्युरीने पुष्पिकाच्या डोक्यावरून मुकूट हिसकावून उपविजेतीला दिला. एका युट्यूबरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो क्षणार्धात व्हायरल झाला. 

पुष्पिकाला विजेती घोषित केल्यानंतर कॅरोलिनने आधी तिला मुकूट दिला. त्यानंतर काही वेळाने कॅरोलिन मंचावर पुन्हा एकदा आली आणि पुष्पिकाला अपात्र ठरवत तिच्या डोक्यावरून मुकूट हिसकावून उपविजेतीला दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. पुष्पिका ही घटस्फोटीत असल्याने अपात्र ठरते, कारण मिसेस श्रीलंका ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी असल्याचं कॅरोलिन म्हणते. "तुम्ही विवाहित असायला हवं, घटस्फोटीत नाही असा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे मी याविरोधात पहिलं पाऊल उचलतेय आणि विजेतेपदाचं मुकूट उपविजेतीला सुपूर्द करते", असं कॅरोलिन म्हणाली. यानंतर पुष्पिका तेथून रडत रडत मंचावरून उतरते आणि निघून जाते. कॅरोलिन मुकूट खेचत असताना पुष्पिकाच्या डोक्याला दुखापतदेखील झाली.  

सौंदर्यस्पर्धेचा हा कार्यक्रम श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोतल्या एका थिएटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचं टीव्हीवर थेट प्रसारण केलं जात होतं. या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांनी पुष्पिकाची माफी मागितली. पुष्पिकाने नंतर फेसबुकवर पोस्ट लिहित तिची बाजू मांडली. "केवळ श्रीलंका नाही तर जगभरातील सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वांत अपमानास्पद घटना आहे. पण या घटनेने खचून जाणार नाही. मी घटस्फोटीत महिला नाही. मी अत्यंत जबाबदारीने ही गोष्ट सांगते की मी घटस्फोटीत नाही. जर मी घटस्फोटीत असेन तर त्यांनी तशी कागदपत्रं सादर करावीत", असं पुष्पिकाने लिहिलं.

हेही वाचा : रामगोपाल वर्माचा खेळ, शेवटच्या क्षणी महिमा चौधरीला बसला धक्का

या संपूर्ण घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पुष्पिकाला तिचा मुकूट परत करण्यात आला, अशी माहिती मिसेस श्रीलंका वर्ल्ड स्पर्धेचे संचालक चंडीमल जयसिंगे यांनी 'बीबीसी' या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. "आम्ही खूपच नाराज आहोत. कॅरोलिन ज्युरीने ज्यापद्धतीने मंचावरून पुष्पिकाचं मुकूट हिसकावून घेतलं, ते अत्यंत अपमानास्पद आणि लाजिरवाणं होतं. मिसेस वर्ल्डच्या संस्थेनं याप्रकरणी चौकशी सुरू केली", असं ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrs World 2019 snatches Sri Lankan pageant winners crown off her head Viral video