पस्तीसाव्या वर्षी पूर्ण केला सांस्कृतिक केंद्राचा अभ्यासक्रम...!

संभाजी गंडमाळे
Tuesday, 30 April 2019

अभिनयाची हौस काही स्वस्थ बसू देत नव्हती. पण, संधी कुठे आणि कशी मिळणार?, हा प्रश्‍न. अखेर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि स्वतःला अपडेट करूनच या क्षेत्रात आलो.

- मुकुंद खुपेरकर

मी रहायला पापाची तिकटी परिसरातील कुंभार गल्लीत. घरात दिवसभर सोनारकाम आणि सायंकाळनंतर शेगाव कचोरी स्टॉल. दोन्ही माध्यमातून संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. पण, अभिनयाची हौस काही स्वस्थ बसू देत नव्हती. पण, संधी कुठे आणि कशी मिळणार?, हा प्रश्‍न. अखेर वयाच्या पस्तीसाव्या वर्षी भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि स्वतःला अपडेट करूनच या क्षेत्रात आलो...मुकुंद खुपेरकर सांगत असतात आणि एखादी गोष्ट करायचा संकल्प केला की कष्टाच्या जोरावर तो सिद्धीसही नेता येतो, याची प्रचिती ते देत राहतात. 

खरं तर सोनारकाम आणि कचोरीच्या स्टॉलमुळे सर्व काही सुरळीत चाललेले असताना केवळ हौसेखातर हा माणूस नाटक, दूरचित्रवाणी मालिका, सिनेमात आला. पण, व्यवसायाकडेही फारसे दुर्लक्ष होवू दिले नाही. वेळेचे योग्य व्यवस्थापन करूनच ते शुटींगला उपस्थित राहतात. या क्षेत्रातले त्यांचे काम म्हंटले तर ते केवळ गेल्या चार वर्षातले. ‘बाप माणूस’ या मालिकेत त्यांना पहिली संधी मिळाली. पण, रोल खूपच छोटा होता. तरीही निराश न होता त्यांचा पुढचा प्रवास सुरूच राहिला. ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्याचे मग त्यांनी सोनं केले. याच दरम्यान, याच मालिकेत त्यांचा दहा वर्षाचा मुलगा सिद्धेशलाही अभिनयाची संधी मिळाली. सध्या ‘जीव झाला येडापीसा’ या मालिकेतही त्यांना कॉर्पोरेटरची भुमिका मिळाली आहे. प्रत्यय नाट्य संस्थेच्या ‘कबीर’ आणि ‘ते दिवस’ या नाटकातही त्यांनी काम केले. 

‘विठ्ठला शपथ’ या चित्रपटात उदय सबनीस, मंगेश देसाई या कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली. त्याशिवाय ‘शिवगड पोलिस स्टेशन’, ‘एक गाव पुढे आहे’ या चित्रपटातही भूमिका मिळाल्या. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील ‘कर्मवीरायण’ या चित्रपटातूनही ते रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. आजवर त्यांनी दोन लघुपटही स्वतः तयार केले आहेत. ‘नाटक’ हा पहिला तर ‘घुसमट’ हा त्यांचा दुसरा लघुपट. विविध महोत्सवात हे लघुपटही उल्लेखनीय ठरत आहेत. 

इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. पण, जिद्द सोडून नाही दिली तर कलापूर नक्कीच पाठिशी उभं राहतं. हिमांशू स्मार्त, संजय हळदीकर, भरत दैनी आदींच्या मार्गदर्शनामुळे मी घडत गेलो. परिसरातील नवोदित कलाकारांना संधी मिळावी, या उद्देशानेच लघुपट निर्मिती करतो. 
- मुकुंद खुपेरकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukund Khuperkar interview in Amhi Kolhapuri