Naach Ga Ghuma: "हा चित्रपट म्हणजे घर घर की कहानी"; परेश मोकाशींनी सांगितली 'नाच गं घुमा'ची पडद्यामागील गोष्ट

Naach Ga Ghuma: लेखक आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी 'सकाळ' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्याच्या 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma) या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.
Naach Ga Ghuma
Naach Ga Ghumaesakal

Naach Ga Ghuma: महिलांच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांवर आणि त्यावर आधारित गमती-जमतींवर बेतलेला नाच गं घुमा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे (Mukta Barve), नम्रता संभेराव (Namrata Sambherao), सुकन्या कुलकर्णी (Sukunya Kulkarni Mone), सुप्रिया पाठारे (Supriya Pathare), शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut), मधुगंधा कुलकर्णी (Madhugandha Kulkarni) आदी कलाकारांनी काम केले आहे. मधुगंधाबरोबरच परेश मोकाशीने (Paresh Mokashi) या चित्रपटाचे लेखन केले आहे त्याचबरोबर परेशने दिग्दर्शनाची बाजूही सांभाळली आहे. लेखक आणि दिग्दर्शक परेश मोकाशी यांनी 'सकाळ' ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्याच्या 'नाच गं घुमा' (Naach Ga Ghuma) या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन कलाकार आणि दिग्दर्शकांची नवीन फळी उभी राहात आहे.एकूणच मराठी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहरा बदलत चाललेला आहे. या बदलाकडे तू एक लेखक आणि दिग्दर्शक म्हणून कसे काय पाहतोस..? असा प्रश्न परेशला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं परेशने उत्तर दिलं, " खरं सांगायचे झाले तर या प्रकारचे बदल खूप पूर्वीपासूनच चित्रपटसृष्टीत घडत आलेले आहेत. म्हणजेच व्ही. शांताराम, बाबूराव पेंटर, दादा कोंडके,अनंत माने, जब्बार पटेल, अमोल पालेकर यांसारख्या गाजलेल्या दिग्दर्शकांच्या काळातसुद्धा हे बदल घडत होते आणि ते स्वीकारलेही जात होते. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तसेच आशयाचे चित्रपट नेहमीच मराठी चित्रपटसृष्टीत बनत होते.प्रेक्षक अशा चित्रपटांना उत्तम प्रतिसाद देत होते. त्यावेळ चांगले व छान वातावरण मराठी चित्रपटसृष्टीत होते आणि आताही चांगलेच वातावरण आहे. आताही वेगळ्या धाटणीचे आणि विषयांवरील चित्रपट बनत आहेत. आपले सुदैव आहे की, आजही आपण ती पूर्वीची परंपरा कायम राखली आहे. आपल्याकडे विषयाची टंचाई कधीच नव्हती. आपल्याकडे चांगले साहित्य आहे.संगीत आहे आणि नाटकेही आहेत. त्यामुळे विविध विषयांवरील चित्रपट येत आहेत."

पुढे मुलाखतीत परेशला प्रश्न विचारण्यात आला, "आपल्याकडे मराठी नाटकांना चित्रपटांच्या तुलनेत चांगला प्रतिसाद मिळतो असे दिसते त्याबद्दल तुझं काय मत आहे?" या प्रश्नाचं परेशनं उत्तर दिलं, "रंगभूमी हे खूप वेगळ्या प्रकारचा आनंद देणारं माध्यम आहे. त्यामुळे याची तुलना चित्रपटांशी होऊच शकत नाही. चित्रपट बघणे हा वेगळ्या प्रकारचा आनंद आहे आणि नाटक बघणं हा वेगळ्या प्रकारचा आनंद आहे. आणि या प्रत्येक गोष्टीचा आपल्याकडे वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. आणि हे सगळं असताना कधी कधी कमी जास्त होतंच असतं."

"आता तुझा 'नाच गं घुमा' हा चित्रपट येत आहे. या चित्रपटाची कथा काय आहे ?" असा ही प्रश्न परेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यानं उत्तर दिलं, "ही कथा प्रत्येक घरातल्या गृहिणी आणि तिला मदत करणारी मोलकरीण यांच्यातील खूपच इंटरेस्टिंग आणि गमतीशीर नात्याची आहे. बऱ्याच वेळा काही गृहिणी नोकरी देखील करत असतात. अशा वेळी त्यांना घर आणि ऑफिस अशा दोन्ही बाजू एकटीने सांभाळणं खूपच कठीण होऊन जातं. त्यावेळी त्यांच्या पाठीशी उभी असते ती 'कामवाली बाई' जी त्यांच्या घरातली कामे करण्यास मदत करते आणि त्यांच्या कामाचे अर्धे ओझे कमी होते. जसे 'प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते' असे म्हटले जाते त्याचप्रमाणे प्रत्येक 'यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते' असे म्हणण्यास हरकत नाही."

मुलाखतीत परेशला प्रश्न विचारण्यात आला, "या चित्रपटाची कथा तुला कुठे व कशी मिळाली?" या प्रश्नाचं परेशनं उत्तर दिलं, "या चित्रपटाची कथा मला माझ्या घरातूनच म्हणजेच माझी पत्नी मधुगंधाकडूनच मिळाली. तीसुद्धा एक वर्किंग वूमन आहे त्यामुळे तिला आलेले अनुभव यावरूनच मला चित्रपटाची कथा सुचली. मग मी आणि मधुगंधाने ती अधिक खुलवली. तसे बघायला गेलो तर ही 'घर घर की कहानी' आहे. जी खूपच गमतीशीर आहे."

"बऱ्याचदा तुझ्या चित्रपटात गाणी खूप कमी प्रमाणात असतात. तर या चित्रपटात किती गाणी आहेत?" असाही प्रश्न मुलाखतीत परेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं परेशनं उत्तर दिलं, "या चित्रपटात चार गाणी आहेत. कारण ही स्त्रियांची गोष्ट आहे आणि त्यांचं गाण्यांशी एक वेगळे नातं असतं. त्यांच्या भावनेचा उत्कर्ष एखाद्या गाण्यातून होतो किंवा काही प्रसंग देखील तुम्ही गाण्यांमधून दाखवू शकता तर हा सुद्धा प्रयोग मी या चित्रपटातून नव्याने केला आहे. कारण मी आत्तापर्यंत माझ्या चित्रपटांमध्ये खूप कमी गाणी वापरली आहेत. केवळ त्या प्रसंगाची एक गरज म्हणून. पण या गाण्यांमुळे या चित्रपटातली गंमत अजून वाढत गेली. आणि दिवंगत संगीतकार नरेंद्र भिडे यांचा मुलगा तन्मय भिडे या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पण करतो आहे."

"या चित्रपटातील कलाकारांची निवड करताना तू कशा प्रकारचे निकष लावले होतेस? असाही प्रश्न परेशला विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनं उत्तर दिलं,"चित्रपटाची कथा लिहून झाल्यावर जेव्हा एक दिग्दर्शक म्हणून मी पात्रांचा विचार करत होतो तेव्हा मला बरीच नावे सुचली. पण त्या सगळ्यांमध्ये कोणत्या दोन अभिनेत्रींची जोडी परफेक्ट ठरेल याचा विचार करता करता मी मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव या दोघींची निवड केली. त्यानंतरही कुठलं पात्र कोणाला द्यायचं याचा निर्णय मी लगेच घेतला नव्हता. त्या आधी रिहर्सल झाली, स्क्रीप्टचं वाचन झालं. त्यानंतर ही पात्रे ठरली. यात मुक्ता आणि नम्रता या दोघींनी खूप छान प्रकारे या सगळ्याला साथ दिली."

या चित्रपटाची निर्मिती स्वप्नील जोशीनं केली आहे. याबद्दल परेश म्हणाला, "वाळवी या चित्रपटाच्या वेळेस स्वप्नील सोबत चांगली मैत्री झाली. त्यानंतर जेव्हा मी संकल्पना त्याच्याकडे मांडली तेव्हा त्याला ही संकल्पना आवडली. त्याने या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. मग अशा गमतीजमतीमध्ये चर्चा चालू असताना तो म्हणाला की मी निर्माता होतो. मग अशा प्रकारे तो या प्रोजेक्टशी जोडला गेला. स्वप्नीलबरोबरच मी आणि मधुगंधा तसेच शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई , तृप्ती पाटील असे आम्ही मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन हा चित्रपट बनवीत आहोत."

या चित्रपटाचा जॉनर कोणत्या प्रकारचा आहे? असा प्रश्न परेशला मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नाचं परेशनं उत्तर दिलं,"हा मिश्र प्रकारचा जॉनर आहे. म्हणजे कौटुंबिक, भावनिक आणि कॉमेडी अशा प्रकारचा हा चित्रपट आहे आणि त्यात ही भावनिक, कॉमेडी हे त्यातले मुख्य रस आहेत. आणि ही अर्थातच प्रत्येक कुटुंबाची गोष्ट आहे."

पुढे मुलाखतीत परेशला प्रश्न विचारण्यात आला, "या चित्रपटाच्या शीर्षकावरून हा महिला प्रधान चित्रपट आहे ते स्पष्ट होत आहे. एक दिग्दर्शक म्हणून तुझं याबाबतीत काय मत आहे?" या प्रश्नाचं परेशनं उत्तर दिलं, "नक्कीच महिलांची बाजू या चित्रपटाच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या प्रत्येकाच्या घरात काम करणारी बाई ही असतेच. पण तिचा विचार सहसा केला जात नाही. त्यामुळे घरकाम करणारी महिला आणि तिची मालकीण अशा दोघींच्या आयुष्यातील विविध प्रसंग, त्यांच्या भावभावनांचा विचार या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com