lockdown- 'नाडियादवाला ग्रॅण्डसन्स'ने घेतला मोठा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नाडियादवाला ग्रॅण्डसन्सतर्फे त्यांच्या कामगारांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे, जवळपास चारशे कामगारांना ही मदत करण्यात येणार असून त्यांना बोनसही देण्यात येणार आहे. 

मुंबई- हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक यशस्वी चित्रपट देणाऱ्या नाडियादवााला ग्रॅण्डसन्स एन्टरटेन्मेंट आणि नाडीयादवाला फाऊंडेशन यांच्यातर्फे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता फंडाला मदत देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर नाडियादवाला ग्रॅण्डसन्सतर्फे त्यांच्या कामगारांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे, जवळपास चारशे कामगारांना ही मदत करण्यात येणार असून त्यांना बोनसही देण्यात येणार आहे. 

हे ही वाचा: कुछ कुछ होता है सिनेमाबद्दल पहा करण जोहरचा मुलगा काय म्हणतोय?

सध्या कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. लाॅकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पडद्यामागे काम करणाऱ्या अनेक कामगारांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. कामगारांच्या काही संघटना तसेच काही कलाकार व प्राॅडक्शन हाऊसेस त्यांना मदतीचा हात देत आहेत. काही कलाकार पंतप्रधान मदत निधी किंवा मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करीत आहेत. हिंदीबरोबरच मराठी कलाकारही मदतीकरिता पुढे सरसावले आहेत. यशराजसारख्या मोठ्या बॅनर्सने आपल्या कामगारांनामदत देण्याचे ठरविले आहे. बालाजी टेलिफिल्मच्या सर्वेसर्वा एकता कपूरने आपला एक वर्षांचा पगार कामगारांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात कोरोनाचे आलेले मोठे संकट पाहता सगळ्यांनी मदत करण्याचे ठरविले आहे.

नाडियादवाला ग्रॅण्डसन्स या बॅनर्सतर्फे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्यात येणार आहेच शिवाय मोशन पिक्चर्स ऍण्ड टीव्ही प्रोड्युसर्स वेल्फेअर ट्रस्ट, श्री भैरव सेवा समिती फिल्म इंडस्ट्री वेल्फेअर ट्रस्ट तसेच नाडियादवाला ग्रॅण्डसन्सबरोबर जोडले गेलेले कामगार यांना प्रत्येकी दहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम बोनस म्हणून देण्यात येणार आहे. या बॅनरतर्फे घरीच राहा आणि सुरक्षित राहा असाही संदेश देण्यात आला आहे. 

सोनी पिक्चर्स करणार मदत
कोरोना विषाणूच्या संकटाशी लढण्यासाठी सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया मनोरंजन क्षेत्रातील रोजंदारी कामगारांसाठी 10 कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार आहेत. याशिवाय सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया 'स्वदेस कोविड फंडा'साठी देखील मदत करत आहे. यासोबत ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा काही रोजंदारी कामगारांपर्यंत सोनी पिक्चर्स नेटवर्क पोहोचणार आहे आणि त्यांना अन्न-धान्य खरेदी करण्यासाठी कूपन्सचे वाटप करणार आहेत. हे कूपन्स ते कोणत्याही रिटेल स्टोअर्समध्य़े जाऊन वापरू शकतात.

nadiyadwala grandsone took a big dicision


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nadiyadwala grandsone took a big dicision