
Nagraj Manjule : पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट! नागराज मंजुळे करणार दिग्दर्शन
Nagraj Manjule : फँड्री, सैराट, नाळ, झुंड यासारख्या चित्रपटांमधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटविणाऱ्या नागराज मंजुळेनं एक मोठी घोषणा केली आहे. नेहमीच सातत्यानं वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या नागराजनं एक मोठं शिवधनुष्य हाती घेतलं आहे. तो आता ख्यातनाम पैलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका मराठी वाहिनीनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, नागराजनं कोल्हापूरातील कुस्तीच्या आखाड्यातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे येत्या काळात नागराजच्या या चित्रपटाचे खास आकर्षण असणार आहे. त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकताही लागली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर प्रभावी मांडणी करत प्रेक्षकांना सजग करणारे चित्रपट तयार करण्यात नागराजची ओळख आहे.
Also Read - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
नागराजनं या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे. त्याच्या चाहत्यांनी या प्रोजेक्टसाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पुढच्या महिन्यात नागराजचा घर,बंदुक, बिरयाणी नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच्या ट्रेलरला, गाण्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यानं केलेली घोषणा आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांचे व्यक्तिमत्व चित्रपटाच्या निमित्तानं लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.