नंदुरबार जिल्हयाची मोहर सिनेसृष्टीत उमटणार..."काश' लघूपटाची आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलसाठी निवड 

धनराज माळी
Saturday, 18 July 2020

डॉक्टरांनी आपला व्यवसाय सांभाळत डॉक्टर व रूग्ण यांच्या नात्यावर भाष्य करणारा हिंदी लघुचित्रपट तयार केला. या लघुपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मुंबई व कोलकाता येथे होणा-या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात "काश'ची निवड झाल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह संचारला आहे.

नंदुरबार : शहरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. सुजीत पाटील लिखित व दिग्दर्शित "काश' या हिंदी लघूपटाची कोलकता व मुंबई येथे होणा-या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलसाठी निवड झाली आहे. नंदुरबार जिल्हयाची मोहर सिनेसृष्टीत उमटणार आहे. 
डॉक्टरांनी आपला व्यवसाय सांभाळत डॉक्टर व रूग्ण यांच्या नात्यावर भाष्य करणारा हिंदी लघुचित्रपट तयार केला. या लघुपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मुंबई व कोलकाता येथे होणा-या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात "काश'ची निवड झाल्याने डॉक्टरांमध्ये उत्साह संचारला आहे.डॉक्टरांनी स्वत: या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. यात डॉ. राजकुमार पाटील,डॉ. रोशन भंडारी, डॉ प्रकाश ठाकरे,डॉ. जय देसाई, डॉ. खूशालसिंग राजपूत,डॉ. सचिन खलाने आदींच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. कलावंत रणजितसिंग राजपूत यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन डॉ. सुजीत पाटील यांनीच केले आहे. कॅमेरेमॅन मानसिंग राजपूत यांनी चित्रीकरण केले आहे. चित्रपटाचा खर्च डॉक्टरांनी उभा केला. पाच महिन्यात हा हिंदी लघूपट तयार झाला. यापूर्वी दोन शो नंदुरबारला दाखविण्यात आले. गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईत करण्यात आले. तसेच बंगलोरला चित्रपटाचे एडीटींग झाले आहे. पूनम भावसार या अभिनेत्री म्हणून झळकल्या आहेत. तर सीमा मोडक यांनी गीत लिहिले आहे. सर्वच कलावंत स्थानिक आहेत. शशी हनूवते, अजय वळवी,रवि सूर्यवंशी,डॉ. तांबोळी यांच्या छोटया भूमिका आहेत.डॉक्टरांनी डॉक्टरांच्या समस्येवर निर्माण केलेला हा लघुपट डॉक्टरांना भावतो आहे. दुबई,अमेरिका या देशातील प्रेक्षकांनीही या लघुपटाची प्रशंसा केली. एका जाणकाराने लघूपट पाहिल्याने चित्रपट फेस्टीवलला पाठवा,असा सल्ला दिला.त्यानंतर दिग्दर्शक डॉ सुजीत पाटील यांनी फिल्म फेस्टीवलला चित्रपट पाठवला. यांपैकी मुंबई व कोलकता येथे आंतरराष्ट्रीय फेस्टीवलमध्ये चित्रपटाची निवड झाल्याने नंदुरबारचे नाव आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवलला झळकणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nandurbar doctor production kash hindi laghupat selection international film fare