नाट्यपंढरी सांगलीचे ‘वारकरी’ डॉक्टर

इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्वतंत्र नाट्य विभाग कार्यरत आहे. १९५६ पासून अगदी आतापर्यंत कलावंत योगदान देत आहेत.
natya pandhari sangli doctors contribution in drama movement miraj medical college
natya pandhari sangli doctors contribution in drama movement miraj medical collegeSakal

सांगलीचा ‘नाट्यपंढरी’ असा लौकिक वृद्धिंगत करण्यात सांगली-मिरजेतील डॉक्टरांचा वाटा मोठा आहे. विशेषत: मिरज वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टरांच्या नाट्य चळवळीचे केंद्र राहिले आहे.

अनेक नाट्यसंस्थांमधून या मंडळींनी कामे केली. इंडियन मेडिकल असोसिएशनचा स्वतंत्र नाट्य विभाग कार्यरत आहे. १९५६ पासून अगदी आतापर्यंत कलावंत योगदान देत आहेत. त्याचा हा धावता आढावा...

- डॉ. विश्राम लोमटे, हौशी नाट्यकलावंत

सां गली परिसरातील वैद्यकीय व्यावसायिक नाट्य क्षेत्रात जे काही योगदान देतात, त्याचं बीज जणू मिरज वैद्यकीय महाविद्यालयात रुजवलं गेलं, असं म्हणता येईल. मिरजेचे त्वचारोग तज्ज्ञ दयानंद नाईक यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील या नाट्य चळवळीवर बराच प्रकाश टाकला. १९५६ पासूनच्या नाट्य चळवळीचा इतिहास मांडला.

ते स्वतः १९७७ मधील महाविद्यालयाचे विद्यार्थी. त्या काळात आजच्या- इतका खासगी वैद्यकीय व्यवसाय विस्तारला नव्हता. त्यामुळे बहुतेक सगळे नाट्य क्षेत्राशी संबंधित डॉक्टर वैद्यकीय महावि‌द्यालयात काम तरी करायचे किंवा शिकत तरी असायचे.

महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनातील नाटक सर्वांच्या आकर्षणाचा विषय असायचे. ते नाटक सांगलीत दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात व्हायचं. प्रसिद्ध नेत्रविशारद भैय्यासाहेब परांजपे यांनी

१९५६ मध्ये ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील डॉ. सतीश याची भूमिका केली होती. त्यांच्यासोबत डॉ. मधू आपटे यांची कर्मभूमी भावे नाट्य मंदिर होती. त्यांनी ‘काळोख देत हुंकार’ या नाटकात अभिनय केला होता. ते नाटक राज्य नाट्य स्पर्धेतील तिन्ही केंद्रांमधून पहिले आले होते.

१९७६ च्या शाम सरोडकर, जुन्नरकर, रमेश वै‌द्य, रायते असे अनेक डॉक्टर्स नाटकात रस घेऊन काम करीत होते. त्यांच्या विद्यार्थिदशेत ते आले आणि शिक्षकी पेशाच्या निमित्तानेही ते इथेच होते. त्यामुळे त्या वेळचा महाविद्यालयाचा माहोलच मुळी एकजिनसी होता.

आपल्या सांगलीचे प्रसिद्ध कान, नाक, घसातज्ज्ञ एस. आर. पाटील, तर कान, नाक, घसा विषय शिकवताना ‘फोनेशन’ म्हणजे उच्चार शिकवताना शब्दांवर कुठे, कसा भार किंवा जोर दिल्यावर अर्थ बदलतात हे शिकवायचे. खरं तर ते नाक, कान, घसा हा विषय शिकवत होते; पण त्यांना नाटकाची जाण असल्यामुळे तो विषय ते मुलांपर्यंत उत्तम पोहोचवायचे.

चंद्रशेखर खानविलकर, चारुदास भागवत, संजय ओक, शैलेंद्र नवरे, अजित कुलकर्णी, मकरंद खोचीकर, विक्रम काळुसकर, अविनाश पाटील, विश्राम लोमटे या साऱ्याच आजच्या प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिकांनी नाट्य क्षेत्रात मुशाफिरी केली आहे.

डॉ. खोचीकर नेपथ्य, प्रकाश योजना या नाटकाच्या अन्य तांत्रिक आघाड्यांवर मदत करायचे. आज लेखक म्हणूनही परिचित असणारे संजय ओक ‘मिरज वैद्यकीय’चेच विद्यार्थी. उत्तम नाट्य कलाकार, लेखक, वक्ते, विचारवंत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व, प्रशासक अशा भूमिकेत ते परिचित आहेत. डॉ. ओक यांनी ‘रविवारची कहाणी’ या एकांकिकेचे लेखन केले होते. अभिनयही केला होता.

फार्माकॉलॉजीचे आमचे शिक्षक डॉ. माधव मुतालिक, फिजिऑलॉजीच्या प्रमुख डॉ. वसुंधरा क‌ट्टी, डॉ. पटवर्धन, अॅनॉटॉमीचे डॉ. हेरेकर, जहागीरदार उभयता, डॉ. राजेंद्र भागवत, डॉ. बिंदूसार पलंगे, डॉ. विकास कुऱ्हेकर आदींना मूलतः नाटकाची आवड.

ते सारेच नाटकांना प्रोत्साहन देणारे. ही सारी मंडळी स्वतः नाटक बघायला यायची. १९८८ मध्ये डॉ. दयानंद नाईक यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तीन पैशांचा तमाशा’त मी स्वतः तीन भूमिका केलेल्या. तासगावचे डॉ. विजय जाधव, लहान मुलांचे सर्जन डॉक्टर संतोष पाटील, कोल्हापूरच्या पूर्वाश्रमीच्या डॉ. अर्चना नरगुंदे, सध्या साताऱ्यातील भूलतज्ज्ञ डॉ. समीर सोहनी यांच्यासह जवळपास ३८ जणांचा चमू सक्रिय होता.

हे सर्वजण ‘मिरज वैद्यकीय’चेच वि‌द्यार्थी होते. त्यांच्यानंतर ‘सूर्याची पिल्ले’ या नाटकात विश्वास फडके, समीर गुप्ते, पद्मनाभ जोशी, दिनकर देसाई या ‘मिरज वैद्यकीय’च्या विद्यार्थ्यांनी काम केले होते. या टीमने ‘रंग उमलत्या मनाचे’ नाटक बसवले होते. त्यातसुद्धा माझी भूमिका होती.

तेव्हाचे मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी आता आपल्या सांगलीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. विद्यार्थिदशेनंतर त्यांनी आपल्या व्यावसायिक काळातही सांगलीसह अन्यत्र नाटकाचे वेड कायम ठेवले आहे.

नुकतेच दिवंगत झालेले संपूर्ण सांगली परिसराला परिचित असणारे माधवनगरचे डॉ. मुकुंद फडणवीस नाट्यशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्ती होते. ते तर स्वतः मेकअप म्हणजे रंगभूषा याचा कोर्स करून आले होते.

याशिवाय त्यांचा विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचा विशेष अभ्यास होता. त्यांनी ‘ऑथेल्लो’, ‘हॅम्लेट’ ही नाटके मराठीत अनुवादित केली होती. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, नाट्य निर्माते, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत या नाटकाच्या सर्वांगावर त्यांची हुकूमत होती.

त्यांच्याप्रमाणे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. विलास कुलकर्णी देखील सांगलीच्या नाट्यक्षेत्रातील आदरणीय व्यक्ती होते. त्यांनीही खूप नाटके बसवली व त्यात कामेही केली. विश्वास दाते, श्रीकांत वसवाडे, सारिका कुल्लोळी,

सीमा साठे, मिरज वैद्यकीय महाविद्यालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सध्या कार्यरत असणाऱ्या ज्योती रोकडे, अमर पागे, श्रीनिकेतन काळे, शिल्पा दाते, दंत रोग तज्ज्ञ डॉक्टर मेधा लिमये अशी मंडळी आजही नाटकाशी संबंधित उपक्रमात आजही सहभागी आहेत.

आम्हा सर्व हौशी मंडळींच्या ‘डॉक्टर्स ड्रामा ग्रुप’ तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित पु. ल. देशपांडे यांचं ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक आम्ही बसवलं होते. त्याचे जवळजवळ १३ प्रयोग सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सोलापूर, पुणे, इस्लामपूर येथे झाले आहेत.

या नाटकाला स्पर्धेतही पारितोषिके मिळाली आहेत. त्यानंतर पु.लं.चेच ‘सुंदर मी होणार!’ हे नाटक मी बसवले होते. या नाटकात सीमा साठे यांनी केलेली दीदी राजेंची भूमिका सांगली परिसरातील सर्व लोकांना भावली. तेही नाटक खूप सुंदर झाले होते. परंतु कोरोनामुळे या नाटकाचे जास्त प्रयोग करता आले नाहीत. त्यानंतर आम्ही ‘कुर्यात पुन्हा टिंगलम’ हे नाटक सध्या बसवले आहे. त्याचेही जवळजवळ दहा प्रयोग होत आले आहेत.

याही नाटकाला स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत. प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. सामाजिक जाणीवेचे भान ठेवून डॉक्टर्स ड्रामा ग्रुपच्या माध्यमातून सध्या मी अशी नाटके बसवतो व निरनिराळ्या सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी याचे प्रयोग करतो. हे प्रयोग करताना आम्ही कलाकार कोणतेही मानधन घेत नाही.

एक तर महावि‌द्यालयात असताना वैद्यकीयच्या वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण घेताना म्हणजे शरीर रचनाशास्त्र, शरीर, शरीर क्रियाशास्त्र, मानसशास्त्र, स्वरायंत्राचा अभ्यास आदींमुळे नाट्यकलेचा प्रवेश तुमच्या शरीरामध्ये सहजतेने होतो, असं म्हणायला हरकत नाही.

प्रत्येक यशस्वी वैद्यकीय व्यावसायिकाच्या अंगी नाट्यकलाही असतेच. त्यामुळेच तुम्ही रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांच्या वेगवेगळ्या मानसिक परिस्थितीमध्ये त्यांच्याशी चांगला संवाद साधू शकता.

डॉक्टर म्हणून तुम्हाला कितीही त्रास झाला असला किंवा थकवा आला असला तरीसु‌द्धा तो झाकून ठेवून, चेहऱ्यावर हसू आणून, जिभेवर साखर ठेवून तुम्ही समाजातल्या निरनिराळ्या लोकांशी, निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या ठिकाणी यशस्वी संवाद साधणे ही कला नाटकामुळे सहज शक्य होते.

नाट्यकला सादर करण्यासाठी लागणारी संवेदनशीलता ही तुम्हाला तुमच्या वैद्यकीय व्यवसायात सु‌द्धा उपयोगी पडते. त्यामुळे नाट्यकला आणि वैद्यकीय व्यवसायातील कसब हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत असेच म्हणावे लागेल.

वै‌द्यकीय व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी ते आवश्‍यक आहे. स्वतःचा व्यवसाय सांभाळून रात्री-अपरात्री नाटकाची तालीम करणे हा अनुभव खरं तर सर्वांना मजा, सुख व समाधान देऊन जातो. वि‌द्यार्थी दशेत असताना किंवा व्यवसायाच्या निमित्तानेसु‌द्धा डॉक्टरांना रात्री-अपरात्री जागरणाची सवय असतेच.

इतर मार्गाने स्वतःचा कामाचा ताणतणाव दूर करण्यापेक्षा नाटकात काम करताना एक वेगळ्या ‘क्रिएटिव्हिटी’ चा आनंद मिळतो व याचे सादरीकरण आपण इतर असंख्य लोकांसमोर जेव्हा करतो व ती मंडळी जेव्हा त्याबद्दल आपले कौतुक करतात त्यामुळे होणारे समाधान व आनंद ‌द्विगुणित होते. डॉ. विश्वास दाते यांनी तर नाटकांमुळे मिळणारा ‘सेलिब्रिटीचा मान’ उच्च कोटीचा असल्याचे मनोगत व्यक्त केले.

जन्म, मृत्यू, आजारपणात होणाऱ्या वेदना, त्रास, त्यातून बरे झाल्यावर होणारे समाधान, सुख, आनंद हे सर्व डॉक्टरांनी याची देही, याची डोळा पाहिलेले असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांबद्दलच्या संवेदनांबद्दल अनुभव संपन्नता व समृ‌द्धता असते.

त्यामुळे एखादी कला सादर करताना डॉक्टरांना याचा फायदा होतो. ही गोष्ट नाट्यकलेलाही लागू पडते. नाटकाचा विषय, आशय समजून घेऊन ते नाटक किंवा पात्र उभे करणे हे डॉक्टर कलाकाराला थोडेसे सोपे जात असावे असे वाटते. याबद्दल डॉ. दयानंद नाईक म्हणाले, ‘‘नाटकाचे अंग असणारा डॉक्टर म्हणूनही यशस्वी होतो. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांना वैद्यकीय व्यवसायातील अनुभव समृद्ध करतात.’’

डॉ. भारत पाटणकरही कलासक्त

मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या १९६७ ते १९७२ च्या तुकडीचे विद्यार्थी असलेले पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते डॉ. भारत पाटणकर यांनीही एक काळ रंगभूमी गाजवली आहे. ॲमॅच्युअर ड्रामॅटिक असोसिएशनच्या नाट्यस्पर्धेत ‘मला निवडून द्या’, ‘खून पाहावा करून’ या नाटकांत कामे करून त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनयाची पारितोषिके मिळवली होती.

डॉ. टंकसाळे, डॉ. करंदीकर असे प्रोत्साहन देणारे महाविद्यालयातील प्राध्यापक होते. डॉ. गालिंदे, प्रमिला दुगे, सुरेखा हंगे, डॉ. नातू, डॉ. कुलकर्णी, डॉ. श्रीहरी मराठे, डॉ. मराठे अशी मंडळी त्यांचे तेव्हाचे सहकारी होते. याचाच फायदा पुढे चळवळीत समग्र नाटक चळवळीत काम करताना झाल्याचे मत डॉ. पाटणकर यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com