'नेटफ्लिक्स'विरोधात ५० लाख डॉलर्सचा मानहानीचा दावा | Netflix | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

netflix

'नेटफ्लिक्स'विरोधात ५० लाख डॉलर्सचा मानहानीचा दावा

नेटफ्लिक्स (Netflix) या जगप्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मविरोधात जॉर्जियाची माजी बुद्धिबळ विश्वविजेतीने तब्बल ५० लाख डॉलर्सचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. 'द क्वीन्स गॅम्बिट' (The Queens Gambit) या वेब सीरिजच्या एका भागात तिची बदनामी केल्याचा आरोप या खटल्यात आहे. बुद्धिबळ ग्रँडमास्टर नोना गॅप्रिंदाश्विली (Nona Gaprindashvili) यांनी सप्टेंबरमध्ये हा मानहानीचा दावा दाखल केला. वेब सीरिजच्या एका भागात पात्राने असा दावा केला आहे की, तिने तिच्या कारकिर्दीत पुरुषांचा कधीही सामना केला नाही. मात्र हाच दावा चुकीचा, कमीपणा आणणारा असल्याचं त्यांनी म्हटलंय. नोना यांनी १९६८ पर्यंत अनेक पुरुष स्पर्धकांचा सामना केला होता. हाच कालखंड नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'द क्वीन्स गॅम्बिट' या सीरिजमध्ये दाखविण्यात आला आहे.

या सीरिजची कथा काल्पनिक आहे असं म्हणत नेटफ्लिक्सच्या वकिलांनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु फेडरल न्यायाधीश व्हर्जिनिया फिलिप्स यांनी गुरुवारी त्यांचा दावा फेटाळला. "सीरिजची कथा जरी काल्पनिक असली तरी तो संवाद नेटफ्लिक्सला बदनामीच्या आरोपापासून दूर ठेवत नाही", असं त्यांनी अधोरेखित केलं.

'द क्वीन्स गॅम्बिट' या वेब सीरिजमध्ये अन्या टेलर जॉयची मुख्य भूमिका आहे. वॉल्टर टेव्हिस यांच्या १९८३च्या कादंबरीवर सीरिजची कथा आधारित असून त्यात जगातील सर्वांत महान बुद्धिबळपटू बनलेल्या एका तरुण अनाथाची कथा सांगण्यात आली आहे. सीरिजमधील बेथ हार्मन हे मध्यवर्ती पात्र काल्पनिक असलं तरी त्यातील अनेक पात्रं ही वास्तविक जीवनातील बुद्धिबळ खेळातील पात्रं आहेत. ज्यामध्ये नोना यांचासुद्धा समावेश आहे.

हेही वाचा: गश्मीरने का सोडली 'इमली' मालिका? अखेर समोर आलं कारण

१९७८ मध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचं ग्रँडमास्टरचं विजेतेपद मिळविणारी नोना ही पहिली महिला आहे. त्या १९६२-७८ पर्यंत महिला जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन होत्या. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पुरुषांच्या अनेक स्पर्धांमध्ये यशस्वीरित्या भाग घेतला आणि दोन विजेतेपदसुद्धा पटकावले. 'द क्वीन्स गॅम्बिट'मध्ये त्यांनी नोना यांचा उल्लेख करताना पुरुषांशी कधीच स्पर्धा न केल्याचं म्हटलंय. हाच उल्लेख अपमानास्पद असल्याचा दावा त्यांनी खटल्यात केला आहे.

Web Title: Netflix Faces 5 Million Dollars Defamation Suit Over False Claim In The Queens Gambit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..