
'सत्यवान सावित्री'ची कथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्राला अनेक सण, व्रत-वैकल्य यांची संस्कृती लाभली आहे. त्यातील सौभाग्यवती महिलांचं सौभाग्य साजरं करणारा लोकप्रिय सण म्हणजे - वटपौर्णिमा. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षक लवकरच पाहू शकतील. झी मराठी वाहिनीवर सत्यवान सावित्री (Satyavan Savitri) ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली आहे. या मालिकेत कोणकोणते कलाकार असणार आहेत, याबद्दलची माहिती अजूनही गुलदस्त्यात आहे. पौराणिक कथा या आपल्याला आपल्या मुळांशी जोडून ठेवण्यात खूप मोठं योगदान देतात. त्यामुळे अशीच एक उत्तम पौराणिक मालिका - सत्यवान सावित्री ही सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेबद्दल आतुरता व्यक्त केली आहे.
या मालिकेत सत्यवान आणि सावित्रीची प्रमुख भूमिका कोण साकारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचसोबत झी मराठी वाहिनीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या वाहिनीवर बऱ्याच नव्या मालिका सुरू झाल्या असून त्यापैकी काही मालिकांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळतोय.