अभिनयाची इच्छापूर्ती 

तेजल गावडे 
बुधवार, 10 मे 2017

"लंचबॉक्‍स' व "एअरलिफ्ट' फेम अभिनेत्री निमरत कौर एकता कपूरची वेब सीरिज "द टेस्ट केस'मध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत अभिनेता अतुल कुलकर्णी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकूनूर करत आहेत. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... 

"लंचबॉक्‍स' व "एअरलिफ्ट' फेम अभिनेत्री निमरत कौर एकता कपूरची वेब सीरिज "द टेस्ट केस'मध्ये आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तिच्यासोबत अभिनेता अतुल कुलकर्णी आणि राहुल देव मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचं दिग्दर्शन नागेश कुकूनूर करत आहेत. यानिमित्ताने तिच्याशी केलेली ही बातचीत... 

मनोरंजन क्षेत्रात वेब सीरिज आणि लघुपट यांची भविष्यात व्याप्ती वाढणार आहे. या दोन्हींच्या माध्यमातून जगभरात पोहचता येतं. कुठेही, हवं तेव्हा वेब सीरिज किंवा लघुपट पाहू शकतो. मला एकता कपूर यांची निर्मिती असलेल्या "द टेस्ट केस' वेब सीरिजचा विषय खूपच मनोरंजक वाटल्याचं अभिनेत्री निमरत कौरनं सांगितलं. त्यात कमांडो महिलेचं पात्र आपल्याला साकारायचंय, हे मला खूप भावलं. त्या वेळी मी अजिबात विचार केला नाही की हा चित्रपट आहे की वेब सीरिज. एका आर्मी ऑफिसरची भूमिका साकारायला मिळतेय, यासाठी मी स्वत:ला खूप नशीबवान समजते, असं निमरत म्हणाली. 

'द टेस्ट केस'मध्ये निमरतने शिखा शर्मा नामक आर्मी ऑफिसरची भूमिका साकारली आहे. आर्मीची पार्श्‍वभूमी असल्यामुळे हे पात्र तिला खूप जवळचं वाटतं. बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी तिला आर्मीमध्ये इंटरेस्ट होता; पण योगायोगानं तिची ही इच्छा या वेब सीरिजच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. या सीरिजमध्ये शिखाला प्रयोगाच्या दृष्टिकोनातून कमांडो ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं. जिथे पुरुषांसोबत तिला प्रशिक्षण दिलं जातं. त्यात एक महिला म्हणून तिला बरंच काही ऐकावं आणि सहन करावं लागतं. या भूमिकेच्या तयारीबाबत निमरतनं सांगितलं की, ""शिखा शर्माच्या भूमिकेसाठी मला तीन ते चार महिने खूप कठोर मेहनत करावी लागली. तसंच मला डाएट करावं लागलं आणि माझ्या आवडत्या पदार्थांकडे मी या दिवसांत अजिबात पाहिलेलं नाही. एक मुलगी आहे तर मला ही गोष्ट जमणार नाही असं बोलणं मला चुकीचं वाटतं. मी आर्मी ऑफिसरचा रोल करतेय, तर मला शारीरिकरीत्या सक्षम व्हायलाच पाहिजे. त्यासाठी ऍथलेटिक पातळीवर प्रशिक्षण घेतलं. अशा पद्धतीचं मला आव्हान स्वीकारावं लागलं.'' 
"द टेस्ट केस' या वेब सिरीजचे बारा एपिसोड्‌स असणार आहेत. साताऱ्यातील एका सैनिकी शाळेत आणि मुंबईत या सीरिजचं चित्रीकरण होत आहे. निमरतनं आतापर्यंतचा चित्रीकरणाचा अनुभव अप्रतिम असल्याचं सांगितलं व म्हणाली की "याकडे आम्ही वेबसीरिजच्या दृष्टिकोनातून पाहत नाही. चित्रपटासारखं आम्ही त्याला महत्त्व दिलंय आणि त्या पद्धतीनं सर्वांनी काम केलंय. निमरतच्या मते कामं आपली निवड करतात आणि आपलं नशीब ज्या ठिकाणी नेतं तेच काम आपण करतो, असं मला वाटतं. प्रोजेक्‍टच्या निवडीबाबत ती सांगते की, सध्या माझं काही काम भारतात सुरू आहे, तर काही परदेशात सुरू आहे. त्यामुळे मी काही काळ परदेशात असते. म्हणून काही प्रोजेक्‍ट मला स्वीकारता येत नाहीत. मला प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून जो विषय भावतो ते प्रोजेक्‍ट मी स्वीकारते.' 

"द टेस्ट केस' वेब सीरिजचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. निमरतला तिच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा! 
 

Web Title: nimrat kaur interview