
सुरुवातीला घरच्यांचा विरोध असला तरी याच बेली डान्समुळे एकेकाळी कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचं नोरा अभिमानानं सांगते.
अप्रतिम बेली डान्स कौशल्यामुळे अभिनेत्री नोरा फतेहीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील 'दिलबर' या रिक्रिएटेड गाण्यामुळे नोरा विशेष प्रकाशझोतात आली. या मूळ गाण्यात अभिनेत्री सुष्मिता सेनने तिच्या घायाळ अदांनी चाहत्यांना भुरळ घातली होती. त्यानंतर रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये नोराच्या डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याआधी नोरा 'बाहुबली'मधल्या एका गाण्यात झळकली होती. पण 'दिलबर' या गाण्याने तिला खरी ओळख मिळवून दिली.
नोरा फतेही ही मोरक्कन-कॅनेडियन अभिनेत्री आहे. २०१४ मध्ये तिने तिच्या करिअरला सुरुवात केली. 'रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 'क्रेझी कुक्कड फॅमिली'मध्ये ती झळकली. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटले होते. 'बाहुबली', 'टेम्पर', 'किक २' यांसारख्या चित्रपटांमध्ये आयटम साँग्स करत नोराने ओळख प्रस्थापित केली.
कॅनडामधून भारतात आल्यानंतर नोरा इथं आठ मुलींसोबत एका घरात राहायची. एके दिवशी तिच्या रुममेट्सनी तिचा पासपोर्ट चोरी केला होता आणि इथे राहायला पुरेसे पैसे उपलब्ध नसल्याने तिला भारत सोडून पुन्हा कॅनडाला जावं लागलं होतं. हिंदी भाषा व्यवस्थित बोलता येत नसल्याने ऑडिशन देणंही तिला कठीण जात होतं. अनेकांचा अपमान सहन करून करिअरमध्ये पुढे आल्याचं नोराने सांगितलं.
हेही वाचा : 'यापुढे मालिकांमध्ये करणार नाही काम'; 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधल्या अभिनेत्रीची घोषणा
नोराचे कुटुंबीय जुन्या विचारसरणीचे आहेत. त्यामुळे नोरा आता जरी 'बॉलिवूडची बेली डान्स क्वीन' म्हणून ओळखली जात असली तरी तिच्या कुटुंबीयांकडून डान्सला विरोध होता. डान्सविषयी प्रचंड आवड असल्याने ती लपूनछपून डान्सचे व्हिडीओ पाहून सराव करायची. सुरुवातीला ती लोकांसमोर डान्स करायला फार घाबरायची. शाळेत अनेकांनी तिच्यावर टीका केल्याने ती खुलेपणाने तिचं नृत्यकौशल्य दाखवू शकत नव्हती. याचा खुलासा तिने 'द कपिल शर्मा शो'मध्ये केला होता. याच बेली डान्समुळे एकेकाळी कुटुंबाचा गाडा चालवण्यास मदत झाल्याचं नोरा अभिमानानं सांगते.