esakal | नवा चित्रपट : ऑक्‍टोबर 
sakal

बोलून बातमी शोधा

नवा चित्रपट : ऑक्‍टोबर 

नवा चित्रपट : ऑक्‍टोबर 

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

क्षणभंगुरतेच्या शापाची 'फुले' 

पारिजातकाची फुलं... देखणी, नाजूक, सुवासिक... मात्र त्यांचं आयुष्य अगदीच क्षणभंगुर. अनेकांचं आयुष्य आणि काहींच्या 'प्रेमाचं आयुष्य'ही असंच असतं... एखाद्याच्या आयुष्याची दोरी त्याची काहीही चूक नसताना नकळत तुटू लागते, तर एखाद्याला त्याचं प्रेम सापडेपर्यंत ते हातातून निसटून गेलेलं असतं. पारिजातकासारखंच अल्पायुषी ठरत... ही सल, दु:ख अनुभवल्यावरच त्याच्या वेदनेची तीव्रता समजते. दिग्दर्शक सुजित सरकार 'ऑक्‍टोबर' या चित्रपटातून हा अनुभव देत प्रेमकथांमधील एक 'मास्टर पीस' सादर करतात. अत्यंत तरल, प्रत्येकाला अंतर्मनात डोकावून पाहण्यास लावणारी, प्रेम असल्याची छोटी झलक मिळाल्यास एक हळवी व्यक्ती कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकते याचा अदमास देणारी चित्रपटाची कथा अंतर्बाह्य हेलावून टाकते. वरुण धवनचा अभिनय व बनिता संधू या अभिनेत्रीनं पदार्पणातच केलेली कमाल यांमुळं अंतर्मनाला जाऊन भिडते... 

दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये शेफ बनण्यासाठीचं प्रशिक्षण घेणारा दानिश वालिया ऊर्फ डॅन (वरुण धवन) एक मनमोकळा युवक आहे. आपल्या भावना तो थेट व्यक्त करतो आणि त्यामुळंच त्याला कामावर काही अडचणीही येतात. शिउली (बनिता संधू) त्याच्याबरोबरच शिकते आहे, मात्र त्यांच्यात फारसा संवाद नाही. हॉटेलमधील डिसेंबरच्या पार्टीदरम्यान शिउली तिसऱ्या मजल्यावरून अपघातानं पडते आणि कोमामध्ये जाते. पडण्याच्या आधी तिनं 'डॅन का नाही आला,', एवढीच विचारणा केल्याचं डॅनला समजतं आणि तो कोमात गेलेल्या शिउलीमध्ये गुंतत जातो. करिअरकडं दुर्लक्ष करून ती बरं होण्यासाठी झटत राहतो.... 

सुजित सरकारांना एका प्रेमकथेतून प्रत्येकाचाच स्वत:शी सुरू असलेला संघर्षही दाखवायचा आहे. शिउलीसाठी करिअर पणाला लावणाऱ्या डॅनला त्याचे मित्र विचारतात, 'ती तर तुझी कोणीच नव्हती. तुमचं प्रेमही नव्हतं. मग असं का वागतो आहेस...' याचं उत्तर डॅनकडं नसतं...'मी असाच आहे,' एवढंच तो सांगू शकतो. दुसऱ्या प्रसंगात कोमातून किंचित शुद्धीवर आलेल्या शिउलीला डॉक्‍टर समोरच्या लोकांना ओळखायला सांगतात, तेव्हा ती डॅनला ओळख देत नाही. त्यावर डॅन पुन्हा एकटाच तिच्या खोलीत जाऊन 'असं का केलंस,' असं विचारतो. आता ती ओळख देते आणि डॅन म्हणतो, 'इथून पुढंही तू मला सर्वांसमोर अशीच ओळख देऊ नकोस.' या आणि अशा अनेक तरल प्रसंगांची मोठी मालिका म्हणजेच हा चित्रपट. आयुष्यात अशा प्रसंगांना सामोरं गेलेलेच चित्रपटातील या प्रसंगांशी नाळ जुळवू शकतात. (इतरांना ते प्रसंग भिडत नाहीत आणि चित्रपट नीरस वाटू लागतो, हेही खरं.) जुही चतुर्वेदी यांनी डॅनच्या पात्राचं केलेलं लिखाण नेमकं आहे. डॅनची बदलत गेलेली मानसिकता पटवून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. ऑक्‍टोबर महिना आणि फुलणाऱ्या पारिजातकाचा संदर्भ घेत केलेला चित्रपटाची शेवट कायमचा लक्षात राहतो. 

वरुण धवननं थोडंही ग्लॅमर नसलेली, अत्यंत हळव्या डॅनची व्यक्तिरेखा जबरदस्त ताकदीनं पेलेली आहे. या भूमिकेसाठी त्यानं खूप मोठी तयारी केली, हेही खरं. हॉटेलमध्ये त्याच्या वागण्यातून होणारे किंवा हॉस्पिटलमध्ये वेळ जात नसल्यानं नर्सशी बोलताना घडलेल्या विनोदांतील टायमिंग मस्त. शिउलीमध्ये गुंतत गेल्यानं हळवा झालेला त्यानं साकारलेला तरुण अधिक भावतो. नवोदित बनिता संधूला केवळ डोळ्यांतून बोलावं लागलंय आणि त्यासाठी तिनं दाखविलेली परिपक्वता थक्क करते. गीतांजली राव यांनी साकारलेली शिउलीच्या आईची भूमिकाही जमून आली आहे. शंतनू मोईत्रा यांचं पार्श्‍वसंगीतही उत्तम. 

एकंदरीतच, प्रेमकथेच्या पार्श्‍वभूमीवर स्वत:मधील शोध घेण्याचा हा प्रवास संयमानं पाहिल्यास तुम्हाला एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. 

श्रेणी : 4 

निर्माता : रोनी लाहिरी 
दिग्दर्शिक : सुजित सरकार 
भूमिका : वरुण धवन, बनिता संधू, गीतांजली राव.

loading image
go to top