esakal | Godse I गांधी जयंतीदिनी महेश मांजरेकरांकडून 'गोडसे' सिनेमाची घोषणा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh Manjrekar

गांधी जयंतीदिनी महेश मांजरेकरांची 'गोडसे' सिनेमाची घोषणा!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : आज २ ऑक्टोबर, राष्ट्रपिता महात्मा गांधींची जयंती. आजच्या या विशेष दिनी प्रयोगशील दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आपल्या नव्या हिंदी सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा नथुराम गोडसेशी संबंधीत आहे, ज्यानं महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली होती. संदीप सिंग आणि राज शांडिल्य हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

संदीप सिंग यांच्या लिजंड 'ग्लोबल स्टुडिओ' आणि राज शांडिल्य यांच्या 'थिंकिंग पिक्चर्स' या चित्रपट निर्मिती कंपन्यांद्वारे गोडसे सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. तर मराठमोळे प्रयोगशील अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. लिजेंड ग्लोबल स्टुडिओसोबत मांजरेकर यांचा दिग्दर्शक म्हणून हा तिसरा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' आणि 'व्हाईट' नावाचे चित्रपट केले होते. दरम्यान, आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.

'गोडसे' सिनेमाबद्दल निर्माता-दिग्दर्शक म्हणतात....

'गोडसे' सिनेमाबद्दल निर्माता संदीप सिंग म्हणतात, "नथुराम गोडसेबद्दल अद्याप जे समोर आलेलं नाही ती गोष्ट आम्ही या सिनेमाद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. गोडसे आणि गांधीजी यांच्याबद्दल आपल्याला विविध गोष्टी ऐकायला मिळतात. पण महेश, राज आणि मी यातील तथ्ये समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासातील विस्मृतीत गेलेल्या 'या' व्यक्तीबद्दलची माहिती सिनेमॅटिकपद्धतीने आम्ही आजच्या पिढीसमोर आणणार आहोत"

दुसरे निर्माते राज शांडिल्य म्हणाले, "आजच्या काळात आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भिन्न विचारसरणी आणि वैयक्तिक मतं व्यक्त करण्याला प्रोत्साहन देतो. त्यामुळे हा काळच नथुराम गोडसेवर सिनेमा करण्याचा योग्य काळ आहे असं आम्हाला वाटलं"

महेश मांजरेकर म्हणाले, "नथुराम गोडसेची कथा ही कायमच माझ्या हृदयाजवळ राहिली आहे. अशा प्रकारचा सिनेमा करण्यासाठी त्यानंच मला मोठं धैर्य दिलं आहे. मला नेहमीच थेट भिडणारे आणि तडजोड न करता विषय हाताळायला आवडतात. 'गोडसे' सिनेमाही माझ्या या तत्वात बसणारा आहे. गांधीजींवर गोळ्यांचा वर्षावर करणारी व्यक्ती या पलिकडे गोडसेला लोक जास्त ओळखत नाहीत. या सिनेमाची कथा पडद्यावर दाखवताना आम्हाला कोणालाही राष्ट्रभक्त किंवा कोणाच्याही विरोधात बोलायचं नाही. हा सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षखचं ठरवतील कोण योग्य आणि कोण अयोग्य?"

'गोडसे' सिनेमात कलाकार कोण? कधी होणार रिलिज?

'गोडसे' हा सिनेमा नथुराम गोडसेच्या जीवनावर अधारित असून ज्यानं महात्मा गांधी यांची हत्या केली होती. या सिनेमाची सहनिर्मिती विमल लाहोटी, जय पंड्या आणि अभय वर्मा यांनी केली आहे. सध्या या सिनेमाच्या कथेवर काम सुरु असून अद्याप कलाकारांची निवड झालेली नाही. 'गोडसे' सिनेमाच्या शुटिंगला जून २०२२ नंतर सुरुवात होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top