esakal | वादळात घराचं छप्पर उडालं, तो दिवस कधीच नाही विसरणार- पंकज त्रिपाठी
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaj Tripathi

वादळात घराचं छप्पर उडालं, तो दिवस कधीच नाही विसरणार- पंकज त्रिपाठी

sakal_logo
By
स्वाती वेमूल

काही कलाकारांनी बॉलिवूडमध्ये आपली कारकिर्द थोडी उशिरा सुरू केली. पण दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमची छाप सोडली. अशा अभिनेत्यांमध्ये पंकज त्रिपाठी Pankaj Tripathi हे नाव आवर्जून घेतलं जातं. 'मसान'पासून 'मिमी'पर्यंत या कलाकाराने एकापेक्षा एक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. पंकज हा मूळचा बिहारचा. बिहार ते बॉलिवूड हा त्याचा प्रवास तसा सोपा नव्हता. आज जे यश त्याला मिळालंय, त्यासाठी त्याने बरीच मेहनत केली आहे आणि इतकं यश पदरी पडल्यानंतरही तो स्वभावाने अत्यंत नम्र आहे. २०१९ मध्ये पंकजने मड आयलंड याठिकाणी हक्काचं घर विकत घेतलं. त्यावेळी दिलेल्या एका मुलाखतीत त्याने स्ट्रगलिंगच्या काळातील काही आठवणी सांगितल्या होत्या.

"मी आणि माझी पत्नी मृदुलाने मिळून स्वप्नाचं घर विकत घेतलंय. पण पाटणामधील पत्र्याचं छप्पर असलेलं आमचं घर मी अजूनही विसरलो नाही. एका रात्री खूप जोरात पाऊस पडत होता. वादळी वाऱ्याने आमच्या घराचं छप्परच उडालं होतं. मी आकाशाकडे एकटक पाहत स्तब्ध उभा होतो", अशी आठवण पंकजने सांगितली होती. पुढे तो म्हणाला, "समुद्रकिनारी घर घेण्याचं माझं आणि माझ्या पत्नीचं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यात आम्ही दोघं यशस्वी ठरलो. नवीन घरात गृहप्रवेश केला तेव्हा मृदुला फार भावूक झाली होती."

हेही वाचा: 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये मारली गोळी; खऱ्या आयुष्यात पंकज त्रिपाठीने केली अशी मदत

पंकज त्रिपाठीने 'मसान', 'मिर्झापूर', 'स्त्री', 'मिमी', 'क्रिमिनल जस्टीस', 'सेक्रेड गेम्स' यांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. सुरुवातीला मिळेल त्या भूमिकेला होकार द्यायचं या विचाराने त्याने काम केलं. मात्र आता अत्यंत विचारपूर्वक भूमिकांची निवड करत असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं.

loading image
go to top