अभिनेत्री पायल घोष आता रामदास आठवलेंच्या पक्षात

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 27 October 2020

पायलच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 2016 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत दिसली होती. यात तिने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली होती.

मुंबई - अभिनेत्री पायल घोषने अभिनय सोडून राजकीय क्षेत्रात घेतलेली उडी सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. यापूर्वी प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करुन चर्चेत आलेली पायल आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ची उपाध्यक्ष झाली आहे. तिने आपले चित्रपट क्षेत्र सोडून अचानक राजकारणात केलेल्या प्रवेशाने सर्वांना धक्का दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पायल ती  करत असलेल्या वेगवेगळ्या आरोपांसाठी चर्चेत आली होती. तिने केलेले आरोप हे थेट कोर्टापर्यत गेले आहेत. त्यावर सुनावणीही सुरु आहे. तिने आता खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षात प्रवेश केला आहे. अनेक दिवसांपासून ती आठवले यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. दोन दिवसांपूर्वी तिने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) मध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वेगळ्या प्रकारच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा देणारे व्टिट केलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पायलला रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपद देण्यात आले आहे. खासदार रामदास आठवले यांच्यासमवेत असणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र बहुतांशी जणांनी या प्रवेशावर प्रश्न विचारले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पायलच्या करियरबाबत बोलायचे झाल्यास तिने तेलगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती 2016 मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत दिसली होती. यात तिने राधिका ही व्यक्तिरेखा साकारली होती. 2017 मध्ये पायलने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ‘पटेल की पंजाबी शादी’ हा तिचा पहिला चित्रपट होता. यात ऋषि कपूर आणि परेश रावल यांच्याही भुमिका होत्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चालला नाही. यानंतर पायल दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपामुळे चर्चेत आली.

पुढे प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. यासगळ्यात पायलने एका व्हिडीओत अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते. पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला होता. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर.  यालाही प्रतिवादी करण्यात आले आहे.  यावर संतापलेल्या रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Payal Ghosh joins Republican Party of India (A)