पिंक गर्ल तापसी

संतोष भिंगार्डे 
बुधवार, 18 जानेवारी 2017

"पिंक' ठरला लॅण्डमार्क

अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत... 

"पिंक' ठरला लॅण्डमार्क

अभिनेत्री तापसी पन्नूचं "पिंक' चित्रपटातील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी सगळीकडे खूप कौतुक होतंय. आता ती सगळ्यांच्या चांगलीच परिचयाची झाली आहे. "रनिंग शादी डॉट कॉम' व "द गाझी ऍटॅक' हे तिचे आगामी प्रोजेक्‍ट्‌स आहेत. या चित्रपटातही ती वेगळ्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत... 

"पिंक' चित्रपटानंतर तुझ्यातल्या अभिनेत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तुला स्टारडम मिळालं आहे. याकडे तू कोणत्या दृष्टिकोनातून पाहतेयस? 
- मला वाटत नाही की माझ्या वागण्यात किंवा बोलण्यात काही फरक झाला आहे. मी पहिल्यांदा जशी होते तशीच आताही आहे. माझ्या नेहमीच्या कार्यपद्धतीत काहीही बदल झालेला नाही. मात्र अन्य काही मंडळी माझ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहेत. ते अधिक गंभीरपणे माझ्याकडे पाहतात. मुळात स्टारडम हा प्रकार काय असतो, हे मला माहीत नाही. मी जेव्हा जन्माला आले तेव्हा घरच्यांसाठी मी स्टारच होते. मात्र "पिंक'नंतर लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. 

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करताना कसं वाटलं? 
- सुरुवातीला मनामध्ये प्रचंड भीती आणि दडपण आलं होतं. कारण मी काही ऍक्‍टिंगचा कोर्स वगैरे केलेला नव्हता किंवा कोणत्याही प्रख्यात इन्स्टिट्यूटमधून आलेले नव्हते. ऍक्‍टिंग मी बघून बघून शिकले. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारासमोर उभं राहायचं तर मला घामच फुटला होता. ते काय म्हणतील? त्यांच्याकडून काही तरी नकारात्मक प्रतिक्रिया येईल, असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. त्यांच्याबरोबर काम करताना मज्जाच आली. ते एखाद्या सीनवर किती आणि कशा पद्धतीने मेहनत घेतात, हे मला समजलं. खरोखर त्यांनीच आम्हाला सांभाळून घेतलं. 

"पिंक'नंतर तुला कशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या? 
- खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. खूप पत्रं, मॅसेजेस आणि मेल आले. लहान असताना माझ्या शाळेतील एका शिक्षिकेने मला तू ऍक्‍टिंगसाठी प्रयत्न कर, असा सल्ला दिला होता. पण मला तेव्हा ऍक्‍टिंगमध्ये करिअरच करायचं नव्हतं. त्यामुळे ती बाब मी म्हणावी तशी गंभीरपणे घेतली नव्हती. त्याच टीचरने "पिंक' पाहिल्यानंतर मला पत्र पाठवलं आणि माझं अभिनंदन केलं. तुझ्याबाबतीत मी तुला दिलेला सल्ला आता खरा ठरला आहे, असं त्यांनी पत्रात म्हटलं. का कुणास ठाऊक, तेव्हा त्यांना माझ्यामध्ये काय दिसलं हे मला माहीत नाही. पण त्यांनी तेव्हाच माझ्यातील गुण हेरले होते. एका चाहत्याने मला मेल केला. त्यामध्ये तुमचा "पिंक' हा चित्रपट मला खूप खूप आवडलाय. माझी पत्नी सध्या प्रेग्नंट आहे आणि तिला मूल होईल तेव्हा तिला किंवा त्याला "पिंक' चित्रपटच पहिला दाखवेन. "पिंक'मुळे कौतुकाचा वर्षाव झाला आणि अजूनही होतोय. 

हे यश तू कशा पद्धतीने एन्जॉय केलंस? 
- खरं सांगायचं तर त्या चित्रपटामुळे माझ्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्‍वास आला. सुरुवातीला एखादा चित्रपट ऑफर झाला की त्याला नाही म्हणताना मनात एक प्रकारची भीती वाटायची. पुन्हा चित्रपट कधी ऑफर होईल की नाही, असं वाटायचं. परंतु आता एखादी स्क्रीप्ट मला आवडली नाही तर मी नकार देऊ शकते. हा सगळा बदल एका चित्रपटामुळे घडला. हा चित्रपट माझ्यासाठी लॅण्डमार्क ठरलाय. 

हल्ली टिझिंगचे प्रकार वाढलेले आहेत. तू दिल्लीची आहेस. तिथे असे प्रकार सर्रास घडत असतात. तुझ्याबाबतीत असा काही प्रकार घडला का? 
- माझ्या बाबतीत असा प्रकार घडला नाही. पण शॉर्टस्‌ कपडे घातले किंवा स्लिव्हलेस घातले की समोरच्या व्यक्तीचं आपल्याकडे पाहण्याचे हावभाव बदलत असतात. हा अनुभव मला दिल्लीत आलेला आहे. कित्येक वेळा अशा कपड्यांमुळे वडिलांनी मला झापलेलं आहे. असे कपडे घालण्याची काय गरज आहे, असे अनेक प्रश्‍न त्यांनी विचारलेले आहेत. त्या वेळी मी ही बाब गंभीरपणे घेतली नाही. परंतु अलीकडच्या काळात छेडछाडीचे प्रकार वाढत चाललेले आहेत. एखाद्या मुलीने शॉर्टस्‌ कपडे घातले की तिला हात लावण्याचा काही जण प्रयत्न करीत असतात. त्यांना मी एवढेच सांगेन की असे काही झाले तर थेट कानशिलात लगावून द्या. माझ्या बाबतीत आता असा प्रकार झाला तर त्याला मी निश्‍चितच मारेन. 

"रनिंग शादी डॉट कॉम' हा चित्रपट तीन वर्षांनी येत आहे. हा चित्रपट रखडण्याची नेमकी कारणे काय आहेत? 
- हा चित्रपट न्यू कमरचा होता म्हणून तो रखडला असं मला वाटतं. कारण जेव्हा एखाद्या नवख्या कलाकारांचा चित्रपट प्रदर्शित होत असतो, तेव्हा ती तारीख ठरवताना खूप काळजी घ्यावी लागते. आज वा उद्या असे करता करता एवढा कालावधी गेला आणि आता हा चित्रपट प्रदर्शित होतोय. 

मग या चित्रपटाचा विषय जुना होईल, असं तुला वाटत नाही का? 
- अजिबात नाही. मुळात असा विषय आतापर्यंत हिंदी चित्रपटात आलेला नाही. या चित्रपटाची कथा तीन जणांवर बेतलेली आहे. हे तिघे पार्टनर असतात. तिघे जण पळून जाऊन लग्न करणाऱ्यांच्या लग्नाचं ते प्लॅनिंग करीत असतात. अशी खूप मजेशीर कथा आहे आणि ती विनोदी पद्धतीने मांडलेली आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जेव्हा सुरू होतं तेव्हा सेटवर एके दिवशी शुजित सरकार आले होते. आमच्यामध्ये हाय-हॅलो एवढंच बोलणं होत होतं. तेव्हा त्यांनी या चित्रपटाचं फुटेज पाहिलं आणि "पिंक'मधील मीनल अरोराच्या भूमिकेसाठी मला निवडलं. यावरून हा चित्रपट कसा असेल याचा विचार करा. 

एखाद्या भूमिकेची तयारी करताना त्रास होतो का? 
- अजिबात नाही. मी साऊथमध्ये काम केलंय आणि हिंदीतही काम केलंय. मला कधी कुणी वजन कमी करा, वजन वाढवा असं सांगितलेलं नाही. मी सरदारीण आहे. खाऊन-पिऊन अगदी टमटमीत राहणं पसंत करते. 

आजही साऊथमध्ये काम करतेयस का? 
- हो. दोन्ही इंडस्ट्रीत काम करतेय. माझं या वर्षीचं टाईमटेबल फुल्ल झालेलं आहे. एकदम बिझी आणि बिझी आहे. 

आता चित्रपट स्वीकारताना काय बघतेस? 
- सुरुवातीला दिग्दर्शक कोण आहे ते बघते. त्यानंतर चित्रपटाची कथा काय आहे ती वाचते. माझी भूमिका त्या चित्रपटातून बाजूला केली तर कथेवर काय परिणाम होईल ते पाहते आणि मगच चित्रपट स्वीकारते. आता "रनिंग शादी डॉम कॉम'नंतर "द गाझी ऍटॅक' हा चित्रपटही येत आहे. 

हल्ली बायोपिक येत आहेत. तुला कुणाच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल? 
- सानिया मिर्झावर चित्रपट आला तर नक्कीच मला ती भूमिका करायला आवडेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pink girl Tapasi